खानदेशात केळीच्या दरात ६० रुपयांनी सुधारणा

खानदेशात केळीच्या दरात ६० रुपयांनी सुधारणा
खानदेशात केळीच्या दरात ६० रुपयांनी सुधारणा

जळगाव  ः खानदेशात केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या रावेर, यावल, मुक्ताईनगर, शहादा, तळोदा (जि. नंदुरबार) भागात केळीचा पुरवठा कमी होत आहे. दर्जेदार केळीच्या दरात क्विंटलमागे मागील तीन दिवसांत ७० रुपयांनी सुधारणा होऊन दर १२१० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. खानदेशलगतच्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातील बाजारात केळीला रविवारी (ता. ५) मागील दोन महिन्यांमधील उच्चांकी १६६१ रुपये प्रतिक्विंटलचे दर जाहीर लिलावात मिळाले.  

बऱ्हाणपूर येथे केळीच्या दरात महिनाभरापासून सुधारणा होत आहे. बऱ्हाणपूर जिल्ह्यातील तापीकाठानजीकच्या नाचणखेडा, बहादरपूर व इतर १० - १२ गावांमध्ये केळीची निर्यात वाढली आहे. पुरवठा कमी आहे. मागणी बऱ्यापैकी आहे. यातच या आठवड्यात मुस्‍लिम बांधवांच्या रमजान महिन्यास प्रारंभ झाल्याने केळीची मागणीही वाढली आहे. बऱ्हाणपूर येथे मागील आठवड्यात प्रतिदिन २१० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक झाली. यावल, रावेर, मुक्ताईनगरात मिळून १८० ट्रक केळीचा पुरवठा झाला. शहादा व तळोदा भागांतील केळीची आखातात निर्यात होत असून, तेथे सहा कंपन्यांनी केळी निर्यातीसाठी काम सुरू केले आहे. त्या भागात दर्जेदार केळी काढणीसाठी उपलब्ध होत आहे. 

फैजपूर (ता. यावल), सावदा (ता. रावेर) भागातून केळीची उत्तरेकडे पाठवणूक जोमात सुरू आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा व काश्‍मिरातून केळीची मागणी वाढली आहे. परिणामी, रावेर भागात नवती केळीचे दर मागील तीन-चार दिवसांत ११४० रुपये प्रतिक्विंटलवरून १२१० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. रावेरात पिलबाग केळीला प्रतिक्विंटल ११३० रुपये दर मिळत आहे. जळगाव भागात नवती केळीला ११७० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत आहेत. 

जळगाव, पाचोरा, जामनेर, भडगाव भागात नवती केळी काढणीसाठी कमी उपलब्ध असून, ती ठाणे, कल्याण, पुणे, छत्तीसगड, नागपूर, राजस्थानात पाठविली जात आहे. नागपूर, छत्तीसगडमधील केळी पिकवणी केंद्रचालक जळगाव व चोपडामधील एजंटच्या माध्यमातून दुय्यम दर्जाची केळी ८०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दराने खरेदी करीत आहेत. चोपडा व जळगाव बाजारात कांदेबाग केळीचे स्वतंत्र दर जाहीर होत असून, कांदेबाग केळी मात्र काढणीसाठी उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली. 

निर्यातीची गती कायम केळीची आखातातील निर्यात रावेर, शहादा भागातून सुरू आहे. शहादा येथून प्रतिदिन किमान १०० मेट्रिक टन, तर रावेर, मुक्ताईनगर भागातून प्रतिदिन १२० ते १४० मेट्रिक टन केळीची निर्यात होत आहे. या केळीला रावेर बाजार समितीने नवती केळीसाठी जाहीर केलेल्या दरांच्या तुलनेत १५० रुपये क्विंटलमागे अधिक मिळत आहेत. सध्या निर्यातीच्या केळीला १३५० रुपये प्रतिक्विंटलचा दर शेतकऱ्यांना जागेवरच मिळत असल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com