केळी बाजार सावरला

‘ॲग्रोवन’ने प्रसिद्ध केलेल्या केळी दरांबाबतच्या वृत्तमालिकेमुळे व्यापाऱ्यांनी ऑनचे दर अर्ली कांदेबाग केळीसंबंधी दिले. आमच्या २२ किलो रासच्या दर्जेदार कांदेबाग केळीला ११०० रुपयांपर्यंतचे दर सहज मिळत आहेत. - श्रीकांत पाटील, केळी उत्पादक, कठोरा, जि. जळगाव
केळी
केळी

जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार किंवा निर्यातक्षम केळीला १३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळाले आहेत. निर्यातक्षम केळीला २५० रुपये प्रतिक्विंटल, असे ऑनचे (जादा) दर मिळत आहे. पिलबाग केळीमधील कापणी जवळपास आटोपली आहे. यावल, मुक्ताईनगर, रावेरातून केळीचा पुरवठा कमी झाला आहे. केळीची जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदी व व्यापाऱ्यांकडून पिळवणूक यासंबंधी ‘ॲग्रोवन’ने मागील महिन्यात प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेची दखल घेत दरांची काटेकोर अंमलबजावणीसंबंधी खरेदीदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे अर्ली कांदेबाग केळीला भावफरकही दिला जात आहे. २५ किलो रासच्या केळीला प्रतिक्विंटल ११५० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. मागील जून व जुलै महिन्याच्या तुलनेत केळीला अधिकचे दर मिळत आहेत. तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा स्थिती बरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनाने बाजार समित्यांना दरांच्या काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना दिल्या असून, संबंधित बाजार समित्यांच्या क्षेत्रात कमी दरात खरेदी झाल्याची तक्रार सिद्ध झाली तर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे व्यापारी मंडळीने सावध भूमिका घेत जे दर जाहीर होत आहेत, ते भावफरकासह देण्यास सुरवात केली आहे. कांदेबाग केळीला क्विंटलमागे १८ रुपये फरक मिळाला. ज्या शेतकऱ्यांच्या केळीची रास २५ पेक्षा अधिक मिळाली, त्यांना हे भावफरक अधिकचे मिळाले. काही व्यापाऱ्यांनी दर्जेदार केळीला भावफरकऐवजी २०० ते २५० रुपये जादा दर क्विंटलमागे दिले आहेत.  मुक्ताईनगर (जि. जळगाव) तालुक्‍यातील अंतुर्ली भागातील केळी उत्पादकांना निर्यातक्षम केळीसंबंधी जादा दर मिळाले. तर जळगाव तालुक्‍यातील किनोद, कठोरा, भोकर भागातील २० ते २२ च्या रासच्या दर्जेदार केळीला भावफरक मिळाले. जादा दरांसह १३०० रुपये प्रतिक्विंटल या दरात केळीची विक्री झाली. पंजाब, दिल्ली व काश्‍मिर येथे या भागातून केळीची पाठवणूक झाली. क्रेटमध्ये केळी भरून वातानुकूलित यंत्रणा असलेल्या १५ टन क्षमतेच्या वाहनातून केळीची वाहतूक झाली. पाचोरा, जळगाव भागातून ठाणे, कल्याण व पुणे भागात केळीची पाठवणूक झाली. यावल व मुक्‍ताईनगर तालुक्‍यांच्या तुलनेत सध्या चोपडा, जळगाव भागातून अर्ली कांदेबाग केळीची कापणी अधिक सुरू आहे. चोपडा, जळगाव व पाचोरा भागात मिळून प्रतिदिन १७० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीचा पुरवठा झाला. तर रावेर, यावल व मुक्ताईनगर मिळून प्रतिदिन २०० ट्रक केळीचा पुरवठा झाला.  छत्तीसगड, नागपूर, ठाणे, कल्याण, पुणे येथे पाठवणुकीच्या केळीला (लोकल) ८०० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. जुनारी बागांमधून ही केळी उपलब्ध होत असून, तीदेखील पुढे कमी होईल. 

पिलबाग केळीला प्रतिक्विंटल ८४० रुपये दर मिळाले. पिलबाग केळीचे दर स्थिर होते. तर कमी दर्जाच्या किंवा जुनारी बागांमधील केळीला ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. गणेशोत्सव, लागलीच नवरात्रोत्सव आहे. रावेर, यावलमधून केळीचा पुरवठा कमी होत आहे. पुढे दर्जेदार केळीचा तुटवडा काही दिवस राहू शकतो. त्यामुळे पाचोरा, भडगाव, जळगाव, चोपडा भागातील कांदेबाग केळीला चांगला उठाव राहील. दरवाढ होण्याची शक्‍यता आहे, असे बाजारपेठेतील जाणकारांचे म्हणणे आहे. 

दरात सुधारणा

  • लोकलच्या केळीला ८५० पासून दर
  • उत्तर भारतातून चांगली मागणी
  • निपाह विषाणूच्या अफवा दूर होऊन दरात सुधारणा
  • गतवर्षीच्या तुलनेत ऑनचे दर १०० रुपयांनी अधिक
  • एकाच क्षेत्रात १५ टन दर्जेदार केळी असल्यास ऑनचे दर २५० रुपयांपर्यंत
  • तांदलवाडी भागातील केळीची यंदा प्रथमच आखातात निर्यात
  • मध्य प्रदेशातील शहापूर, बऱ्हाणपूर, दापोरा, खोपनार, पातोंडी भागात निर्यातक्षम केळीला १४०० रुपये दर
  • प्रतिक्रिया दर्जेदार केळीला यंदा ऑनचे दर अधिक आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत स्थिती बरी आहे. रावेर, मुक्ताईनगरमधून केळीचा पुरवठा कमी झाला आहे. एकाच ठिकाणी १५ ते १६ टन निर्यातक्षम केळी उपलब्ध असली तर व्यापारी २५० रुपये क्विंटलमागे अधिक देत आहेत. १३०० रुपयांपर्यंतचे दर निर्यातक्षम केळीला आहेत. पुढे आणखी दरवाढ होईल, असे वाटते.  - विकास महाजन, केळी उत्पादक, ऐनपूर, ता. रावेर, जि. जळगाव

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com