बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दर

बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दर
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दर

जळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या दरात मागील पंधरवड्यात क्विंटलमागे सुमारे १५० रुपयांची सुधारणा झाली आहे. मागील आठवड्यात नवती केळीचे दर १४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत स्थिरावले. दरात फारशी घसरण होणार नाही. दर्जेदार केळीचे आगार असलेल्या रावेर, यावल (जि. जळगाव) भागात तुटवडा असल्याचे जाणकारांनी सांगितले. 

नवती केळीचे दर मागील पंधरवड्यात १३७० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले होते. नंतर आठवडाभर दर १३७० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत स्थिर होते. त्यात मागील आठ-१० दिवसांत क्विंटलमागे पुन्हा ३० रुपयांची सुधारणा झाली आहे. सध्या राज्यात श्रावणमास व सणासुदीमुळे केळीला मागणी आहे. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर, जामनेर, चोपडा येथील व्यापाऱ्यांकडून पुणे, कल्याण, ठाणे, नागपूर या भागांत केळीची पाठवणूक वाढली आहे. दर्जेदार केळीला उत्तरेकडील पंजाब, दिल्ली, जम्मू व उत्तर प्रदेशात मागणी आहे.

काही मोठे खरेदीदार दर्जेदार केळीची क्विंटलमागे १०० रुपये अधिक देऊन रावेर, बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथून खरेदी करून घेत आहेत. 

रावेर, यावल, मुक्ताईनगर भागांत पिलबाग केळीचे दरही ९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत स्थिर आहेत. रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर या भागांतील केळीची काढणी संपत आली आहे. या भागात सध्या रोज मिळून २८० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक होत आहे. फैजपूर (ता. यावल), सावदा (ता. रावेर) येथून बॉक्‍समध्ये पॅकिंगच्या केळीसंबंधीचा पुरवठा रखडत सुरू आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही केळीची मागणी अधिक आहे. तेथे दर्जेदार केळीला मागील आठवड्यात लिलावात कमाल १८०० रुपये प्रतिक्विंटलचे दर काही शेतकऱ्यांना मिळाले. तर किमान दर १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. कमी दर्जाच्या केळीचे दरही ८०० रुपये प्रतिक्विंटल एवढे असल्याची माहिती मिळाली. बऱ्हाणपुरात मागील आठवड्यात प्रतिदिन २५० ट्रक केळीची आवक झाली. 

जळगाव जिल्ह्यातील चोपडा, पाचोरा, भडगाव, जळगाव भागांतील कांदेबाग केळीची काढणी दिवाळीनंतर सुरू होईल. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागांतही नवती केळीची काढणी जवळपास आटोपली आहे. शहादामधील ब्राह्मणपुरी, जवखेडा, खेडदिगर भागातही केळीची काढणी संपली आहे. मध्य प्रदेशातील नर्मदा काठानजीकच्या बडवानी व परिसरातही नवती केळीची काढणी संपण्याच्या स्थितीत आहे, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com