केळीवरील सोंडकिडीचे कामगंध सापळ्याद्वारे व्यवस्थापन

life stages of sondkid, adult
life stages of sondkid, adult

जागतिक पातळीवर केळीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांमध्ये भारत (२९ टक्क्यांपेक्षा जास्त) महत्त्वाचा देश आहे. केळीवर सोंडकिडीचे प्रमाण वाढत चालले असून, ती भविष्यातील मोठी समस्या होण्याचे संकेत मिळत आहेत. या किडींसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये कामगंध सापळे उपयुक्त ठरू शकतात. अनेक केळी उत्पादक देशांमध्ये रायझोम विव्हिल (कंद भुंगेरा किंवा सोंड कीड) ही प्रमुख समस्या आहे. महाराष्ट्रातही केळी पिकामध्ये नुकसान करणाऱ्या किडींपैकी सोंड कीड (शास्त्रीय नाव ः Cosmopolites soedidus) ही एक महत्त्वाची कीड आहे. ओळख

  • कंद भुंगेऱ्याचे प्रौढ काळ्या रंगाचे असून, पानांच्या पापुद्र्यांमध्ये आणि जमिनीत कंदात बुंध्यालगत राहतात. त्यांच्यामुळे मुळांना नुकसान पोचत असल्यामुळे अन्नद्रव्यांच्या शोषणात अडचणी येतात.  
  • पीक निस्तेज दिसते, फूल धारणेस उशीर होतो आणि अन्य रोग व किडीस पीक लवकर बळी पडते. पानांचा आकार लहान होतो. घड कमजोर निपजतात.  
  • या किडीची अळी कंदामध्ये शिरून आतील गाभा पोखरून खाते. प्रादुर्भाव वाढल्यास संपूर्ण कंदाला छिद्रे पडून कंद कमकुवत होतो. नवीन पाने मरणे, जुनी पाने सुकायला लागणे अशी लक्षणे दिसतात.  
  • किडीने पाडलेली छिद्रे, किडीची विष्ठा यामुळेसुद्धा प्रादुर्भाव ओळखता येतो. झाडे कमजोर होतात आणि थोडा वेगाचा वारा आला तरी कोलमडून पडतात. विविध भागांमध्ये १० ते ६० टक्क्यापर्यंत नुकसान होते.  
  • किडीने केलेल्या जखमांमधून बुरशीजन्य रोगाची लागण होऊन नुकसानीची तीव्रता वाढते. या किडीचा प्रसार कीडबाधित सकर्सच्या वापराने होतो.
  • जीवनक्रम

  • आपल्याकडे कंदे भुंगेरे किंवा सोंडकिडे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या किडीला अन्य देशांमध्ये बनाना रुट बोरर, बनाना बोरर किंवा बनाना वेव्हील अशा नावाने ओळखले जाते.  
  • प्रौढ मादी पानांच्या पोंग्यात आणि खोडावर किंवा कंदाच्या जवळ रोज एक अंडे घालते. सहा दिवसांनंतर अंडी उबतात. त्यातून बाहेर पडलेली अळी अळी खोड किंवा मूळ पोखरून त्यात प्रवेश करते.  
  • किडीचा पूर्ण जीवनक्रम हा ३० ते ४० दिवसांचा असून अळी अवस्था १५ ते २० दिवसांची असते. या किडीचे प्रौढ खाद्याशिवाय ही अनेक दिवस जिवंत राहू शकतात.  
  • या किडीच्या सर्वेक्षणासाठी व व्यवस्थापनासाठी गंध सापळे (कॉस्मोल्युर) उपयुक्त ठरू शकतात. या सापळ्याद्वारे या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आहे किंवा नाही, हे समजते. त्यामुळे किडींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करता येतात.
  • कामगंध सापळ्यासाठी लागणारे साहित्य

  • कामगंध (कॉस्मोल्यूर ९० दिवसांची कार्यक्षमता असलेला कामगंध फुगा)  
  • प्लॅस्टिक बादली २ किंवा ५ लीटर  
  • तार  
  • पाणी, गंधविरहीत साबण.
  • सापळा लावण्याची पद्धत

  • प्रथम बादलीच्या तोंडावर मधोमध आडवी तार बांधून घेणे.  
  • तारेच्या मधोमध कामगंध अडकवणे.  
  • बादलीचे तोंड जमिनीच्या पातळीत येईल इतका खोलखड्डा घेणे.  
  • नंतर बादली खड्ड्यामध्ये बसवून बाजूने व्यवस्थितपणे मातीने घट्ट करणे. बादलीत गंधविरहीत साबण मिश्रित पाणी टाकणे.  
  • सोंडकिडीचे प्रौढकामगंधयुक्त बादलीकडे आकर्षित होऊन बादलीत पडतात.
  • प्रमाण आणि काळजी

  • किडीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी हेक्टरी १ सापळा, तर किडीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी ४ सापळे लावतात.  
  • दोन सापळ्यांमध्ये २० मीटर अंतर व सापळे ठेवलेल्या दर दोन ओळींमध्ये २० मीटरचे अंतर असावे.  
  • दर महिन्याला सापळ्यांची जागा १० मीटरने बदलावी.  
  • काही कारणाने जागा बदलणे शक्य नसल्यास सापळ्यांचे प्रमाण दुप्पट करावे.  
  • सापळ्यात आलेल्या किडी वरचेवर गोळा नष्ट कराव्यात आणि बदलून घ्यावे  
  • यामध्ये वापरण्यासाठी तीन प्रकारच्या ल्युर मिळतात. ३० दिवसांची कार्यक्षमता असलेले पॅकेट, ३० किंवा ९० दिवसांची कार्यक्षमता असलेले बबल्स (फुगे). हे फुगे आकाराने फार लहान व वापरण्यास सोपे आहेत. या कार्यक्षमतेनुसार वेळेवर ते बदलावेत.
  • निरिक्षणे

  • दोन खासगी कंपन्यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये केळी पिकामध्ये गंध सापळा वापराचे काही प्रयोग केले. त्यामध्ये खालील शेतकऱ्यांचा समावेश होता.  
  • कामगंध व सापळा लावल्यानंतर सापळ्याकडे आकर्षित होऊन सापळ्यात पडलेली प्रौढांची संख्या मोजण्यात आली. ती खालीलप्रमाणे आढळली.  
  • अशा प्रकारे व्यवस्थित मोजणी केल्यानंतर केळी पिकांमध्ये सोंड किडीचा प्रादुर्भाव नेमका किती प्रमाणात आहे, याचा अंदाज शेतकऱ्यांना मिळू शकतो. गंधसापळ्यांचा अधिक प्रमाणात वापर केल्यास या किडीच्या नियंत्रणासाठी उपयोग होतो.
  • शेतकऱ्याचे नाव व पत्ता बागेचे वय (महिने) लावलेले सापळे पहिल्या आठवड्यात सापळ्यात सापडलेले (एकूण प्रौढ)
    विकास दत्तात्रय महाजन, ऐनपूर, ता. रावेर, जळगाव १७
    महेंद्र विठ्ठल महाजन, नाचनखेडा, बऱ्हाणपूर, (म.प्र.
    अनिल बाळासाहेब चौगुले, आष्टा, सांगली १६
    कृषी विज्ञान केंद्र, बारामती, पुणे

    संपर्कः डॉ. सतीश भोंडे, ९८२२६५०६६१ (निवृत्त अतिरीक्त संचालक, एनएचआरडीएफ नाशिक.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com