चोपडा, यावल भागांत वादळी पावसाने केळी जमीनदोस्त

चोपडा, यावल भागांत वादळी पावसाने केळी जमीनदोस्त
चोपडा, यावल भागांत वादळी पावसाने केळी जमीनदोस्त

जळगाव ः तालुक्‍यातील पूर्वभागात रविवारी (ता. २) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व तुरळक गारपीटही झाली. यात शेकडो हेक्‍टरवरील केळीबागा जमीनदोस्त झाल्या असून, तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांत वृक्ष उन्मळून पडले, तर घरांचे पत्रे उडाले. पंचक येथील रेखा तडवी उडालेला पत्रा अंगावर पडल्याने जखमी झाली. या नुकसानीचे पंचनामे करण्यास सोमवारी (ता. ३) सुरवात झाली. या भागात सुमारे आठ कोटी रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे. पंचनाम्यांना आणखी दोन दिवस लागू शकतील, असे सांगण्यात आले.  चोपडा तालुक्‍यातील पूर्व भागातील लोणी, कमळगाव, चांदसणी, वडगाव बुद्रुक, देवगाव, पंचक, पिंप्री, वर्डी, खर्डी, पारगाव, मितावली, वरगव्हाण, रुखणखेडा यांसह परिसरातील गावांत वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले. पंचक येथे हेमचंद्र पाटील यांच्या तीन एकरातील शेडनेटचे व १० हजार उतिसंवर्धित केळीच्या झाडांचे १०० टक्के नुकसान झाले. लोणी येथील नरेंद्र पाटील यांच्या साडेचार हजार केळीच्या झाडांचे वादळामुळे १०० टक्के नुकसान झाले आहे. यामध्ये शेकडो हेक्‍टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाले असून, यात १० ते १२ गावांत सर्वांत जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. यावलसह तालुक्‍यात दुपारी पाऊस  यावल येथे वादळामुळे वृक्ष उन्मळून पडले. तसेच वीजतारा तुटून यावल शहरातील वीजपुरवठा तीन-चार तास बंद झाला. यावल शहरासह तालुक्‍यातील सातोद, कोळवद, नावरे या भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. नावरे फाट्याजवळील पेट्रोलपंपाचे पत्री शेड वादळात उडाले. याशिवाय चोपडा रोडवर हॉटेल केशरबागजवळ वृक्ष रस्त्यावर कोसळून वाहतूक काही वेळ खोळंबली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळीबागांचे मोठे नुकसान झाले. काही प्रमाणात कांदा पिकाचेही नुकसान होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. तसेच काही शेतांच्या बांधावर वृक्षही पडल्याचे वृत्त आहे. चुंचाळे व साकळी (ता. यावल) येथे जवळपास अर्धा तास जोरदार वादळ होते. डॉ. आंबेडकरनगरातील संजय तायडे व उषाबाई निकम यांच्या घरावरील सर्व पत्रे उडाले. या भागातील वीजताराही तुटल्या; तर घरावरून उडालेले पत्रे डोक्‍याला लागून समाधान रवींद्र सुरवाडे (वय १५) जखमी झाला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वीजखांब उन्मळून तारा तुटल्या. मनवेल रस्त्यावरील झाड पडल्याने वीजपुरवठा बंद झाला होता.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com