कोल्हापूर, सांगली, कोकणात बंदला संमिश्र प्रतिसाद

लखीमपूर येथील शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतांश व्यवहार सकाळी ठप्प राहिले. दुपारी बारानंतर पुन्हा सुरू झाले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात फिरून बंदचे आवाहन केले.
कोल्हापूर, सांगली, कोकणात बंदला संमिश्र प्रतिसाद Bandh in Kolhapur, Sangli, Konkan
कोल्हापूर, सांगली, कोकणात बंदला संमिश्र प्रतिसाद Bandh in Kolhapur, Sangli, Konkan

कोल्हापूर : लखीमपूर येथील शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतांश व्यवहार सकाळी ठप्प राहिले. दुपारी बारानंतर पुन्हा सुरू झाले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात फिरून बंदचे आवाहन केले. शिवसेना कार्यकर्त्यांनी महामार्ग रोको करून घटनेचा निषेध केला. राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. दरम्यान, पोलिसांनी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसह अन्य पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख शिवाजी जाधव, करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील, राजू यादव, युवा सेनेचे मंजित माने यांच्यासह अन्य कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मारला. दरम्यान पोलिसांनी या साऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. बाजार समितीत बहुतांशी भाजीपाल्याची आवक कमी राहिली. कांदा बटाट्याचे ट्रक न आल्याने सौदे होऊ शकले नाहीत. मात्र गुळाचे सौदे सुरू होते. बंदच्या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती, त्यामुळे स्थानिक भागातील शेतीमाल बाजार समितीत आला होता. त्यामुळे उपलब्ध शेतीमालाचे सौदे व्यापाऱ्यांनी काढल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.  इचलकरंजीत जय जवान, जय किसान, अशा जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शहरात आक्रमक पवित्रा घेतला. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध करत महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देत शहरातील व्यवहार बंद करण्यात आले. प्रचंड पोलिस बंदोबस्तात गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी पुतळा चौक या मुख्य मार्गावरून जागोजागी निदर्शने करत मोर्चा निघाला. बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहराला भेट देवून माहिती घेतली. जिल्ह्याच्या इतर भागांत ही सकाळी बारापर्यंत व्यवहार बंद होते.

सांगलीत महाराष्ट्र बंदला प्रतिसाद सांगली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे सोमवारी (ता. ११) पुकारण्यात आलेल्या बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. तर शहरीभागासह ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने दुपारी तीनपर्यंत बंद ठेवली होती. बाजार समितीत शेतीमालाची केवळ २० टक्के आवक झाली असून, लिलाव बंद ठेवले होते. महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. याला प्रतिसाद म्हणून सांगली जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळाला. या बंदला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रमाणात प्रतिसाद मिळाला. बाजार समितीतल किराणामालाचे दुकानांसह अन्य दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. तर बाजार समितीत गूळ, हळद, बेदाणा सौद्यासह फळांचेही सौदे बंद ठवले होते. महाविकास आघाडीने आटपाडी, कडेगाव, शिराळा तालुक्यासह ग्रामीण भागात मोर्चा काढून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जिल्ह्यातील बाजार समित्या, खासगी कृषी बाजार आदी ठिकाणचे शेतीमालाचे लिलाव बंद होते. या दोन जिल्ह्यांतील अनेक भागांतील बाजारपेठेत दुपार एकपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. सांगली शहरात महाविकास आघाडीने सांगलीच्या स्टेशन चौकात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहून भाजपच्या विरोधात घोषणा दिल्या. शहराच्या मुख्य चौकातून निषेध रॅली काढली. काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्यासह या रॅलीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, घटक पक्षाच्या कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता. मंडई येथील शिवाजी पुतळा येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. दरम्यान, पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सिंधुदुर्गात ‘बंद’ला अल्प प्रतिसाद सिंधुदुर्गनगरी : महाविकास आघाडी आणि विविध संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सोमवारी (ता.११) जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला. कणकवली शहरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला, तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांना गुलाब पुष्प देऊन प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली. बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि विविध शेतकरी संघटनानी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. परंतु जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून कमी प्रतिसाद मिळाला. शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी पदयात्रा काढून तहसीलदारांना निवेदने दिली. कणकवलीत मात्र दुकाने सुरू ठेवणे आणि बंद करण्यावरून शिवसेना-भाजप या दोन पक्षांमध्ये चढओढ दिसून आली. कणकवलीत आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पदयात्रा काढत व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. काही व्यापाऱ्यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देखील दिला. परंतु काही व्यावसायिकांनी पदयात्रा गेल्यानंतर दुकाने पुन्हा खुली केली. त्यामुळे काही शिवसैनिक आक्रमक झाले, त्यांनी पटवर्धन चौकातील एक बेकरी बंद पाडण्याचा प्रयत्न  केला. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तेथे धाव घेत स्थिती नियंत्रणात आणली. शिवसेनेकडून दुकाने बंद करण्याचा प्रकार होत असल्याचे लक्षात येताच नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्यासह आणखी पदाधिकाऱ्यांनी बंद झालेली दुकाने उघडण्यास भाग पाडले. ज्या व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली होती. त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यापुढे कुणी दुकाने बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आमचे संरक्षण असेल, अशीही ग्वाही नगराध्यक्ष नलावडे यांनी दिली. जिल्ह्याच्या इतर भागात देखील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पदयात्रा काढली. या वेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणबाजी देखील करण्यात आली. रत्नागिरीत दुपारपर्यंत बंद रत्नागिरी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचारात शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. लांजा, राजापूर तालुक्यांतील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली होती. तर रत्नागिरीत दुपारी एक वाजेपर्यंत आणि चिपळूणात दुपारी बारा वाजेपर्यंत काही दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या बंदचा बाजार समितीच्या भाजी लिलाव प्रक्रियेवर परिणाम झालेला नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी व्यापारी महासंघाला ‘बंद’मध्ये सामील होण्याची विनंती केली होती. त्या विनंतीनुसार रत्नागिरी शहरातील व्यापारी दुकाने दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली, परंतु शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती केली होती. तर काही दुकानदारांनी नकार दिला होता. ती बंद करण्यासाठी सकाळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सर्वत्र फिरत होते. ग्रामीण भागातील दुकाने सुरू होती.  लांजा शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला, काही दुकाने सुरू होती. हा बंद व्यापाऱ्यांना परवडणारा नाही. राजकीय पक्षांच्या विनंतीला मान देऊन बंदमध्ये सहभागी होत आहेत. मात्र यापुढे राजकीय पक्षांनी असे बंद करू नयेत, असे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com