पीककर्जासाठी बॅंक घेतेय कोरे धनादेश

मी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शिरपूर शाखेकडून ४५ हजार रुपये पीककर्ज घेतले आहे. बँकेने माझ्याकडून पाच कोरे धनादेश सिक्युरिटी म्हणून घेतले आहेत. - डिगांबर मोतीराम शिंदे, रा. खंडाळा
पीककर्ज
पीककर्ज

शिरपूर जैन, जि. वाशीम ः खरीप हंगाम काही दिवसांवर आलेला असल्याने शेतकरी बॅंकांमध्ये पीककर्जासाठी फेऱ्या मारत आहेत. शेतकरी बँकेकडून पीककर्ज घेऊन शेती खर्चाचे नियोजन करू लागले आहेत. शिरपूर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून मात्र शेतकऱ्यांना जाचक अटी लादून पीककर्ज पुरवठा करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बँकेकडून कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांकडून पाच कोरे धनादेश मागितले जात आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.  शिरपूर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेकडून शेतकरी पीककर्ज घेत आहेत. या वर्षीच्या खरीप हंगामापासून नवीन नियम व जाचक अटी लादून पीककर्ज पुरवठा करण्यात येत आहे. बँकेकडून कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांकडून पाच कोरे धनादेश मागितले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या नवीन नियमामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.  दोन वर्षांपासून काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही कर्जमाफीचे पैसे जमा झालेले नाहीत; तसेच यावर्षी रासायनिक खताचे भाव २०% टक्क्याने वाढले आहेत. हमीभावाने शेतमाल घ्यायला शासन तयार नाही. अशा अनेक अस्मानी-सुलतानी संकटांनी शेतकरी वर्ग वेढला असताना बँकांनीसुद्धा आता शेतकऱ्यांना वेठीस धरण्यास सुरवात केली आहे. बँक पीककर्जासाठी पाच कोरे धनादेश सुरक्षिततता म्हणून घेत आहे. त्यामुळे आता खासगी बँकेप्रमाणे या बँकांना शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचे व पैसे वसूल करण्याचा अधिकार मिळणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड मुदतीच्या आत करावी लागणार आहे.  शेतकऱ्यांचा नाइलाज कर्जाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याकडून वरिष्ठांच्या आदेशानुसार पाच कोरे धनादेश सिक्युरिटी म्हणून मागविण्यात येत आहेत. बदलेला नियम सर्व शेतकऱ्यांना लागू असून, तो शिथिल करणे बँक शाखेच्या अधिकारातील बाब नसल्याचे स्थानिक अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांना हे धनादेश द्यावे लागत आहेत. कर्जफेड करावीच लागेल शेतकऱ्याने कर्जाचा भरणा न केल्यास बँक ५ कोरे धनादेश बँकेमध्ये लावू शकते. धनादेश बाऊन्स झाल्यास कलम १३८ नुसार दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास व धनादेश रकमेच्या दुप्पट रकमेपर्यंत दंड वा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते अशी तरतूद आहे. शेतकऱ्यांची अशा जाचक अटीतून मुक्तता करून दर वर्षीप्रमाणे सुलभ पीककर्ज पुरवठा करण्यात यावा व जातक नियम शिथिल करण्यात यावे, अशी शेतकरीवर्गाकडून मागणी होत आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com