‘त्या’ बँकांमधील शासकीय खाती बंद करणार ः जिल्हाधिकारी गुल्हाने

‘त्या’ बँकांमधील शासकीय खाती बंद करणार ः गुल्हाने यांचा इशारा
‘त्या’ बँकांमधील शासकीय खाती बंद करणार ः गुल्हाने यांचा इशारा

यवतमाळ : बँकांच्या आडमुठेपणामुळे शेतकरी कर्जापासून वंचित राहत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ज्या बँकांनी आतापर्यंत २० टक्क्यांपेक्षा कमी कर्ज वाटप केले असेल, अशा बँकांमधील शासकीय खाते दुसऱ्या बँकेत स्थलांतरित करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँकर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार भगत आदी उपस्थित होते. खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले की, जूनअखेरपर्यंत ५० टक्के तर आजपावेतो १०० टक्के पीककर्ज वाटप होणे अपेक्षित होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत ७३ टक्के, तर स्टेट बँक ऑफ इंडियाने ३५ टक्के कर्ज वाटप केले आहे. मात्र, अजूनही जिल्ह्यातील काही बँका २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. जे पात्र सभासद आहेत, त्यांना आतापर्यंत १०० टक्के कर्जवाटप व्हायला पाहिजे होते. मात्र, तसे झाले नाही. पात्र सभासदांच्या याद्या बँकेच्या शाखानिहाय लावणे गरजेचे आहे. तसेच, या याद्या त्वरित तहसीलदारांकडेसुद्धा देण्यात याव्यात. पुढील आठवड्यापर्यंत कर्ज वाटपाची गती वेगाने न झाल्यास संबंधित बँकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. जिल्ह्यात १२ जुलैपर्यंत १ लक्ष ३६ हजार ९१० पात्र सभासदांना ८४५ कोटी ७५ लक्ष रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ही आकडेवारी ३९.१२ टक्के आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा २० टक्क्यांच्या खाली कर्ज वाटप करणाऱ्या बँका सहा असून, यात अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॉर्पोरेशन बँक आणि पंजाब नॅशनल बँकेचा समावेश आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com