पुण्याच्या पाणी वाटपासंदर्भात लवकरच धोरण ः बापट

पुण्याच्या पाणी वाटपासंदर्भात लवकरच धोरण ठरवणार ः बापट
पुण्याच्या पाणी वाटपासंदर्भात लवकरच धोरण ठरवणार ः बापट

पुणे : पुणे शहरासह दौंड, हवेली, इंदापूर तालुक्यांना शेती आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात २१.३९ टीएमसी (७३.३९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा ४.२६ टीएमसीने कमी आहे. आगामी काळात पाणी प्रश्न उद्‍भवण्याची शक्यता असल्याने पुण्यातील पाणीवाटपाबाबत लवकरच धोरण ठरविणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

सोमवारी (ता. २६) विधान भवनात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कालवे सल्लागार समितीची बैठक पार पडली. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह सर्व आमदार उपस्थित होते.

बैठकीत सद्यःस्थितीला उपलब्ध पाणीसाठा व येणाऱ्या काळातील गरज याविषयी आढावा घेण्यात आला. खडकवासला संयुक्त प्रकल्पात सध्या २१.३९ टीएमसी पाणीसाठा असून तो पुढील २३४ दिवस पुण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळेचे येणाऱ्या काळात पाणी काटकसरीने व जपून वापरावे, याबाबत धोरण ठरवण्यात आले. जलसंपदा विभागाची पुणे महापालिकेकडे असलेली ७२ कोटी पाण्याची थकबाकी लवकरात लवकर देण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या.

बेबी कॅनॉलबाबत त्वरित दुरुस्ती करावी, धरणक्षेत्रातील गाळ काढावा. धरणक्षेत्रात आलेले गवत काढण्यात यावे. खडकवासला धरणातून होणारी पाण्याची गळती कमी करावी. पंप लावणाऱ्यावर कडक कारवाई करावी. पुणे महापालिकेबाबत सूचना करताना ते म्हणाले, की महानगरपालिकेने वेळेत कामे पूर्ण करावीत. पाण्याचा होणारा अपव्यय टाळावा. बांधकासाठी लागणाऱ्या पाण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा. बेकायदेशीर नळजोडणी बाबत कडक कारवाई करावी. उपलब्ध पाणीसाठा पुनर्जीवित करावा, अशा सूचना पालकमंत्री बापट यांनी केल्या.

पुण्याला खडकवासला धरणातून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पुणे महापालिकेचा दैनंदिन पाणीवापर ११५० एमएलडीपेक्षा अधिक होत असून, तो सरासरी १३२६ एमएलडीइतका येतो. लोकसंख्येच्या प्रमाणात हा पाणीवापर जास्त आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळी हंगामामध्ये सिंचन आवर्तने देणे शक्य होणार नाही, असे मत मांडण्यात आले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येणाऱ्या काळात गंभीर होऊ नये म्हणून पुण्याच्या पाणीकपातीबाबत धोरण ठरवण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com