बारामती दूध संघ उत्पादकांची दिवाळी गोड करणार : अध्यक्ष संदीप जगताप

बारामती तालुका दूध संघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार सुमारे १३ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. संघाने गतवर्षीच्या (सन २०१९-२०) आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना सरासरी प्रतिलिटर २७.३७ रुपये असा उच्चांकी दूध दर दिला.
Baramati Dudh Sangh will sweeten the Diwali of the producers
Baramati Dudh Sangh will sweeten the Diwali of the producers

माळेगाव, जि. पुणे ः बारामती तालुका दूध संघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार सुमारे १३ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. संघाने गतवर्षीच्या (सन २०१९-२०) आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना सरासरी प्रतिलिटर २७.३७ रुपये असा उच्चांकी दूध दर दिला. तर या दूधदरातील फरक सध्याला प्रतिलिटर ३५ पैसे शेतकऱ्यांना देण्याच्या उद्देशाने संघाने २ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद केली. तसेच संघाच्या २७५ कामगारांना जवळपास २१ टक्के बोनस देण्यासाठी सुमारे १ कोटी १२ लाख रुपयांची जुळवाजुळव केल्याची माहिती संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.

कोरोना संकटासह अतिवृष्टीमध्ये शेती व शेतीपूरक व्यवसाय अडचणीत आला आहे. त्या पार्श्वभूमीचा विचार करता बारामती दूध संघाशी संलग्न असलेल्या १३ हजार दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. याबाबतची माहिती स्पष्ट करताना अध्यक्ष संदीप जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र रायकर आदी संचालक पत्रकारांशी बोलत होते.

जगताप म्हणाले, की कोरोनासारख्या महामारीत दूध व्यवसाय अक्षरशः कोलमडून गेला आहे. लाॅकडाऊनमध्ये पॅकिंग दूध विक्री ५० टक्क्याने कमी झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात पावडर व बटरचे दर लक्षणीय कमी झाले. या प्राप्त स्थितीमुळे दुधाचे दर कोसळले. अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला. लाॅकडाऊनच्या काळात तर दूध संकलन बंद ठेवण्याची वेळ आली. परंतु अजित पवार यांनी दूध उत्पादकांना संकटात काहीसा आधार देण्याच्या उद्देशाने महानंदाच्या मार्फत प्रतिदिनी १० लाख लिटर दूध खरेदी करणाऱ्या निर्णय घेतला. त्यानुसार ३ एप्रिल ते ३१ जुलै २०२० या कालावधीत अतिरिक्त दूध भुकटीत रुपांतर झाले. त्यामुळे दूध दर २५ रुपये शेतकऱ्यांना मिळू लागला. बारामती संघाचे संकलित होणारे प्रतिदिनी २ लाख १८ हजार लिटर दूधापैकी सरासरी ४० टक्के दुधाचा कोटा महानंदा योजनेत समाविष्ट होत होता.  असे असले तरी संघाने संपूर्ण संकलित दुधाला (३.५ फॅट ८.५ एनएनएफ) २५ रुपये दर दिल्याची नोंद आहे. अर्थात इतरांच्या तुलनेत प्रतिलिटर दोन रुपये अधिकचे दिले आहेत, अशी माहिती जगताप यांनी दिली.       

उत्तम व्यवस्थापनाचा परिणाम दुष्काळात चारा छावण्या उभारणे, अतिवृष्टीत जनावरांसाठी औषधोपचाराबरोबर मूरघास प्रकल्प राबविणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे व अधिकच्या दूध दराची पंरपरा कायम ठेवणे, ग्राहकांना स्वच्छ व निर्भेळ दूध पुरवण्यासाठी संघाने सातत्याने प्रयत्न केला. याचाच अर्थ सामाजिक, आर्थिक हितसंबंधांचे संवर्धन करण्यासाठी बारामती दूध संघ संचालक मंडळ व्यवस्थापनाच्या जोरावर प्रामाणिकपणे काम करीत आहे, असा विश्वास अध्यक्ष संदीप जगताप यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com