रोप एकच...खाली बटाटे, वर टोमॅटो; बारामती केव्हीकेत यशस्वी प्रयोग

शारदानगर (ता. बारामती) - येथील प्रयोगातून जमीनीखाली बटाटे व जमीनीवर टोमॅटो असा अफलातून प्रयोग कृषी विज्ञान केंद्रात साकारला आहे. 
शारदानगर (ता. बारामती) - येथील प्रयोगातून जमीनीखाली बटाटे व जमीनीवर टोमॅटो असा अफलातून प्रयोग कृषी विज्ञान केंद्रात साकारला आहे. 
    बारामती : बारामतीच्या केव्हीकेत जंगली वांग्याच्या खुंटावर टोमॅटो किंवा भोपळ्याच्या खुंटावर कलींगडाचे कलम करून उत्पादन घेतले, मात्र आता त्यापलीकडे जाऊन एकाच पिकातून दोन उत्पादने घेण्याचा अनोखा प्रयोग येथे साकारला आहे. जमिनीच्या खाली बटाटे व जमिनीच्या वर टोमॅटोचो उत्पादन असा हा अनोखा प्रयोग असून यातून पाणी, खतमात्रा, निविष्ठांपासून ते उत्पादन खर्च एकाच पिकासाठी करून त्यापासून दुहेरी उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे.       बारामतीतील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रातील हा प्रयोग यापुढील काळातील शेतीला दिशा देणारा ठरणार आहे. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील तज्ज्ञांच्या बैठकीत याविषयी सूचना केली होती. बटाटा उत्पादक जेव्हा बटाटा लागवड करतात, तेव्हा बटाटे जमीनीच्या खाली लागतात, वरच्या बाजूच्या पानांचा तसा उपयोग होत नाही. मग बटाट्याच्याच वरच्या बाजूला कलम करून दुसरे पीक घेतले तर पाण्याची, खताची, औषधाची बचत करून उत्पादन खर्चात कपात करून दोन पिकांचे उत्पादन मिळवता येऊ शकेल असे त्यांनी सांगितले आणि तज्ज्ञांनी त्यावर उतारा शोधला.     या प्रयोगासाठी पुसेगाव (जि. सातारा) येथून बटाटा मागविण्यात आला होता. या बटाट्याची रोपे तयार झाल्यानंतर इंडो-डच भाजीपाला उच्च गुणवत्ता केंद्रातील उच्च गुणवत्तेच्या टोमॅटोच्या जातीच्या रोपाचे कलम या बटाट्याला केले. दोन्ही पिके ही `धोतऱ्याच्या`(सोलानासी) कुळातील असल्याने ती परस्परांना पूरक आहेत. कृषिक प्रदर्शनावेळी शेतकऱ्यांना फक्त त्यातील टोमॅटोची वाढ दिसली. मात्र जमीनीखालील असलेल्या बटाट्याचा परिपक्वतेचा कालावधी झाला नसल्याने त्यावर कोणी भाष्य केले नव्हते. बुधवारी (ता.३०) बटाट्याची पाहणी केल्यानंतर बटाटा देखील तयार झालेला आहे, हे दिसून आल्याने हा प्रयोग यशस्वी झाल्याची खात्री पटली.     या प्रयोगाच्या यशस्वितेमुळे यापुढील काळात शेतकऱ्याला कमीत कमी क्षेत्रात एकाच वेळी आंतरपिक न करता देखील तेवढ्याच पाण्यात दोन पिके घेता येतील. त्यातून उत्पादन खर्चात बचत साधून उत्पन्नात वाढ करण्याचा दुहेरी मंत्र चोखाळता येऊ शकेल. बटाटा आणि टोमॅटो किंवा वांगे आणि टोमॅटोच्या संकरातून टोमॅटोचे पीक नेहमीच्या पारंपारिक आयुष्यापेक्षा दीड ते दोन महिने अधिक वाढवता येऊ शकेल. शिवाय एरवीची मररोग किंवा मूळकूजासारखी रोगाची लागणही दूर राखता येईल. रोगप्रतिकारकता वाढल्याने आपोआप आयुष्यही वाढू शकेल असे तज्ज्ञांचे मत आहे.     याबाबात माहिती देताना केव्हीकेचे प्रमुख डॉ.सय्यद शाकीरअली  म्हणाले, की  बारामती- ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून हे वेगळे प्रयोग साकारले, ते यशस्वी झाले आहेत. पुढील कामही आव्हानात्मक राहील, परंतू वांग्याची रोगप्रतिकारकता टोमॅटोच्या मदतीला येऊन टोमॅटोचे आयुष्य वाढेल, रोग नियंत्रित राहतील, उत्पादन वाढेल आणि कालावधी वाढल्याने आपोआपच भावातील चढउताराचा फायदा घेता येऊ शकेल. बटाट्याच्या कलमामुळे दुहेरी उत्पन्न साधता येऊ शकेल.     केव्हीकेचे विषयतज्ज्ञ संतोष करंजे व संतोष गोडसे म्हणाले की,  सध्यातरी हा प्रयोगच आहे. मात्र यातून कमाल उत्पादनाची धारणा करता येऊ शकते याचा अंदाज आला आहे. वांगे आणि टोमॅटो किंवा टोमॅटो आणि बटाटा, कलिंगड आणि भोपळा, किंवा मिरची अशा पिकांमुळे शेतकऱ्यांना शाश्वत शेतीसाठी फायदा होऊ शकतो, फक्त यामध्ये आणखी संशोधनाची गरज आहे, तसे झाल्यास भविष्यातील शेती किफायतशीर करण्यासाठी मदत होईल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com