सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्याचीच चर्चा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   ः २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत राज्यात बारामती मतदारसंघ सर्वाधिक लक्षवेधी ठरला होता. यंदा या मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपकडून दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत रासपचे नेते आणि विद्यमान मंत्री महादेव जानकर यांच्याशी झालेल्या लढतीत सुळे यांचा सुमारे २५ हजार मतांनी निसटता विजय झाला होता. गेल्या निवडणुकीमध्ये असलेली मोदी लाट यंदा ओसरल्याने विजयी मताधिक्य किती असेल, याचीच चर्चा मतदारसंघात आहे. 

बारामती मतदारसंघ पवार कुटुंबीयांसाठी ‘होम पीच’ आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत असलेल्या मोदी लाटेत खासदार सुप्रिया सुळे यांच्यापुढे महादेव जानकर यांनी मोठे आव्हान उभे केले होते. या लढतीत सुळे यांच्या सुमारे २५ हजार मतांनी निसटता विजय मिळविला होता. या मतदारसंघात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला, भोर, वेल्हा या मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघांत अनुक्रमे अजित पवार, दत्ता भरणे (राष्ट्रवादी), राहुल कुल (रासप), विजय शिवतारे (शिवसेना), भीमराव तापकीर (भाजप) आणि संग्राम थोपटे (काॅँग्रेस) असे पक्षीय बलाबल आहे.

यापैकी खडकवासला हा मतदारसंघ शहरी मतदारसंघ असून, या ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. या मतदारसंघात समाविष्ट असलेल्या निम्म्या मतदारसंघांत शिवसेना- भाजप महायुतीचे प्राबल्य असून, निम्‍म्या मतदारसंघात काॅँग्रेस- राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत जानकर यांनी भाजपचे कमळ चिन्ह न घेतल्याने त्यांचा निसटता पराभव झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

यंदा भाजपने कमळ या चिन्हावरच कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे ‘कमळ' चिन्हाचा किती प्रभाव मतदारांवर राहील, यावर सुळे यांचे मताधिक्य अवलंबून आहे. सुळे यांचा मतदारसंघात सातत्याने असलेला जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे, तर कुल या नवख्या उमेदवार असून, त्यांना केवळ भाजप, रासप आणि आमदार पती राहुल कुल यांच्या संपर्कावर अवलंबून राहावे लागणार आहे.  

सुळे आणि कुल या दोघींचे माहेर बारामतीच असून, कुल या कुमारराजे निंबाळकर यांच्या कन्या आहेत. निंबाळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे चुलतभाऊ आहेत. सुनेत्रा पवार यांनीच २००५ मध्ये राहुल आणि कांचन यांचा विवाह जमविला होता. नात्यागोत्यांमुळे बारामतीतील राजकारण यंदा प्रथमच ढवळून निघणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com