मखानापासून बनवा बर्फी, लाह्या अन् चिक्की

विविध पोषकघटकांनी युक्त असलेले मखाना आरोग्यासाठी लाभदायक आहे. यामध्ये कर्बोदके, प्रथिने, फॅट, कॅल्शिअम, फॉस्फरस आणि लोह, जीवनसत्त्व बी-१, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम मुबलक प्रमाणात असतात.
barfi, lahya and chiki preparation from makhana
barfi, lahya and chiki preparation from makhana

दलदलीच्या क्षेत्रात उगवणारे मखाना हे भरपूर पोषणतत्त्वाने असणारे एक जलीय उत्पादन आहे. मखानाला ‘गोर्गोन नट ड्रायफ्रूट म्हणूनही ओळखले जाते. विविध पोषकघटकांनी युक्त असलेले मखाना आरोग्यासाठी लाभदायक आहे. यामध्ये कर्बोदके, प्रथिने, फॅट, कॅल्शिअम, फॉस्फरस आणि लोह, जीवनसत्त्व बी-१, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम मुबलक प्रमाणात असतात. मखाना हृदयासंबंधीचे विकार, किडनी, डायबेटीज, शरीरातील कोलेस्टेरॉल तसेच रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. मखानाच्या कमळाची पुष्पथाली आणि बियांचा वापर खाण्यासाठी केला जातो. कमळाच्या गड्ड्य़ांचा वापर भाजून, तळून किंवा लोणच्यासाठी केला जातो. कमळाला गोल किंवा अंडाकार संत्र्याच्या आकाराएवढे फळ येते. या फळात १० ते २० कवचयुक्त काळ्या बिया असतात. या बियांना भाजून त्यांचा उपयोग गोड पदार्थ, नमकीन, खीर, बर्फी, चिक्की, लाह्या बनविण्यासाठी तसेच विविध भाज्यामध्ये केला जातो. मखानापासून पदार्थ लाह्या  लाह्या तयार करण्यासाठी मखानाच्या बिया मातीच्या किंवा बिडाच्या कढईमध्ये भाजल्या जातात. त्यानंतर दोन ते तीन दिवस सामान्य तापमानाला ठेवून पुन्हा २५० ते ३३० अंश सेल्सिअस तापमानावर भाजल्या जातात. कढईमध्ये तेल टाकून लाह्या भाजून घ्याव्या. त्यामध्ये जिरे पावडर, काळे मीठ, आमचूर, मिरची पावडर टाकून भाजून घेतल्यानंतर चविष्ट लाह्या तयार होतात. वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून अनेक प्रकारे लाह्या बनवता येते. मखाना पावडर  कढईमध्ये मखना आणि तूप टाकून भाजून घ्यावे. भाजल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. तयार पावडर विविध भाज्या, सूप, लाडू, दुधामध्ये वापरता येते. बर्फी मखाना पावडर ७० ग्रॅम, खोबरे खीस ३० ग्रॅम, ड्रायफ्रूट आणि तूप टाकून चांगले भाजून घ्यावे. नंतर त्यात ६० ग्रॅम साखर टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहावे. मिश्रण घट्ट झाल्यानंतर तूप लावलेल्या ताटामध्ये मिश्रणास पसरवून घ्यावे. आणि त्याच्या वड्या पाडाव्यात. खीर  खीर बनवण्यासाठी तुपामध्ये मखाना चांगला भाजून घ्यावा. दुधामध्ये साखर टाकून मंद आचेवर विरघळून घ्यावी. नंतर त्यामध्ये ड्रायफ्रुट पावडर आणि मखाना टाकून ५ ते १० मिनिटे पुन्हा उकळून घ्यावे.  चिक्की प्रथम मखाना भाजून घेऊन त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. कढईमध्ये ५० ग्रॅम गुळाचा पाक बनवून त्यामध्ये बारीक केलेला १०० ग्रॅम मखाना टाकून मिश्रण चांगले एकजीव करावे. मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये पसरवून त्याचे काप करावेत. तयार चिक्की हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवावी. चिक्कीला पौष्टिक बनविण्यासाठी त्यामध्ये शेंगदाणे, राजगिरा, जवस चा वापर करता येतो. संपर्क-  पल्लवी कांबळे, ८३२९३७५३९० (आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com