वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडे

द्राक्ष मण्यांमध्ये गोडी यायला लागल्यावर वटवाघळांकडून फस्त करण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. याची कोणतीही नुकसानभरपाईसाठी पात्र नाही. दररोज किमान ५० ते ६० किलो द्राक्षांचे नुकसान वटवाघळे करत असून, त्यांच्यापासून करावयाच्या उपाययोजनांचा खर्च वाढत आहे. महसूल, कृषी आणि वनविभागाने यावर एकत्रित उपाययोजना कराव्यात. व नुकसानभरपाईसाठी पात्र करण्यात यावे. - जितेंद्र बिडवई, बळिराजा कृषी विज्ञान मंडळ, गोळेगाव, ता. जुन्नर, जि. पुणे
bat
bat

पुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास असलेली पारंपरिक मोठ्या वृक्षांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने वटवाघळांनी आपला मोर्चा आता द्राक्ष बागांकडे वळविला आहे. द्राक्षाचा हंगाम सुरू झाला असून, द्राक्षमण्यांमध्ये गोडी आल्याने आता वटवाघळांकडून द्राक्षाचा फडशा पाडला जात आहे. गेल्या १० -१५ वर्षांपासून सुरू असलेले नुकसान दिवसेंदिवस वाढत असल्याने द्राक्ष उत्पादकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तर वटवाघळांपासून बागा वाचविण्यासाठीचा खर्चदेखील वाढत आहे.  वटवाघळांचा सर्वाधिक फटका जुन्नर तालुक्यातील गोळेगांव येथील द्राक्ष बागांना बसत आहे. या परिसरात निर्यातक्षम द्राक्ष बागासुमारे ५०० हेक्टरवर असून, वटवाघळांकडून एका रात्रीत द्राक्ष फस्त करण्याबरोबरच न पिकलेली द्राक्ष कुरतडून टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण दररोज सुमारे ६० ते ७० किलोपर्यंत आहे. यामुळे ७० ते ८० रुपये किलोचा दर मिळणारी द्राक्षांना १० ते २० रुपये दर मिळत आहे. यामध्ये मोठ्याप्रमाणावर नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  गोळेगांवसह तालुक्यातील नारायणगाव, खोडद, आर्वी, गुंजाळवाडी परिसरातील द्राक्षांचे देखील नुकसान होत आहे. असेच प्रकार जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड परिसरात देखील होत असून, याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, वटवाघळांच्या बचावासाठीच्या उपाययोजनांचा जाळ्या, साड्या लावण्याचा खर्च वाढत आहे. देशी वृक्ष नष्ट होत असल्याने वटवाघळे द्राक्षांवर येत आहेत. वटवाघळांची वस्तीस्थाने, अधिवास हा वड, उंबर, पिंपळ, नंदृक, आंबा, जांभूळ, सिंदी, ताडी, माडी या फळझाडांवर असतो. मात्र, ही मोठी झाडे दिवसेंदिवस कमी होत असल्याने, वटवाघळांची वस्तीस्थाने नष्ट होऊ लागली आहेत. याचा परिणाम वटवाघळे द्राक्षांवर येण्यास सुरू झाला आहे. वटवाघळांना त्यांचे पारंपरिक जंगली झाडांवरील खाद्य मिळत नसल्याने त्यांनी आता आपला मार्चा द्राक्षांवर वळविला असून, हे प्रमाण दिवसेंदिवस वाढणार आहे, असेही वटवाघळाचे अभ्यासक डॉ. महेश गायकवाड यांनी सांगितले.  वन्यजीव कायद्यात समावेश नाही  वटवाघळांच्या द्राक्ष खाणाऱ्या प्रजातींमध्ये राऊजेटस लेसनालटी, सायनोपटेरीस पिंक्स आणि फ्लायिंग फोक्स या तीन फळ खाणाऱ्या प्रजाती असून यामधील पहिल्या दोन या फक्त द्राक्ष फस्त करताना दिसत आहेत. तर फ्लाईंग फॉक्स ही फक्त आंबा, जांभूळ, पेरू, चिक्कू प्रकारच्या उंच झाडांवरील फळे खातात. मात्र, या जाती वन्यजीव कायद्यानुसार शेड्युल्ड ४ मध्ये असणारे त्या संरक्षित जाती नसून, कुरतडणाऱ्या प्रजाती असून मानवासाठी धोकादायक नाहीत. त्यामुळे त्यांच्यापासून होणारे नुकसान हे भरपाईसाठी पात्र नसल्याने शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही असे वटवाघळाचे अभ्यासक डॉ. महेश गायकवाड यांनी सांगितले.   या करा उपाययोजना  द्राक्ष पिकल्यानंतर शेतात धूर केल्यास वटवाघळ शेतात येत नाहीत, मात्र द्राक्ष शेतीला वास जास्त असल्यामुळे वटवाघळे जास्त आकर्षित होतात. वटवाघळांपासून द्राक्ष वाचविण्यासाठी पिकाभोवती जुन्या साड्यांचे कुंपण घातल्यास नुकसान टाळता येईल. भविष्यात वन्यजीव मानवी वस्तीसह शेतीकडे येऊन नुकसान करणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी शासनाने उपाययोजना करणे नितांत गरजेचे आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com