जनावरांच्या जैवसुरक्षेबाबत जागरूक रहा

जनावरांना आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचाराचा खर्च वाढतो. हे लक्षात घेऊन आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. पशुपालन करताना मानवी तसेच जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने जैवसुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे झाले आहे.
The cow herd should be fenced for animals protection.
The cow herd should be fenced for animals protection.

जनावरांना आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचाराचा खर्च वाढतो. हे लक्षात घेऊन आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. पशुपालन करताना मानवी तसेच जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने जैवसुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे झाले आहे. पशुपालन करताना आजही बरेच जण जैव सुरक्षेला फारसे महत्त्व देत नाहीत. यामुळे वेगवेगळ्या जनावरांमधून (उदा-  गाय, म्हैस, पशुपक्षी, उंदीर इत्यादी) बरेच संसर्गजन्य आजार एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला, मानवापासून जनावरांना आणि जनावरांपासून मानवाला होऊ शकतात. याला झुनोटिक आजार म्हणतात. जैवसुरक्षा म्हणजे माणसांचे तसेच जनावरांचे वेगवेगळ्या सांसर्गिक आजारापासून संरक्षण करण्यासाठी विविध पद्धतींचा वापर. आपल्या गोठ्यात येणारी उपकरणे, वाहने, गोठ्याला भेट देणाऱ्या व्यक्ती, गोठ्यामध्ये येणारी नवीन जनावरे, उपचारासाठी येणारे पशुतज्ज्ञ यांच्यापासून काहीवेळेला योग्य लक्ष न दिल्यास आजाराचा संसर्ग  होऊ शकतो.  वैचारिक जैव सुरक्षा 

  •  जनावरांचा गोठा मानवी लोकवस्तीपासून जास्तीत जास्त दूर ( किमान ३ किलोमीटर) रहदारीच्या रस्त्यांपासून दूर असावा. 
  •  गाय, म्हैस,शेळी, मेंढी  यांचा गोठा तसेच  कुक्कुटपालन शेडमध्ये पुरेसे अंतर असावे. 
  • वेगवेगळ्या लोकांच्या गोठ्यामध्येही पुरेसे अंतर असणे आवश्यक आहे. 
  • रचनात्मक जैवसुरक्षा  

  • गोठ्याची रचना करताना जैवसुरक्षेबाबत नियोजन आवश्यक आहे.  
  • गोठ्याची रचना आणि परिसर हा स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण सहजपणे करता येण्यासारखा असावा.
  • गोठ्यामध्ये जी जनावरे आजार किंवा इतर कारणामुळे मृत्यू पावली असतील तर त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावावी. एक मोठा खड्डा घेऊन त्यामध्ये मृत जनावराला खोल पुरावे. त्यावरती चुन्याची पावडर पसरून तो परिसर तार कंपाउंड करून बंद करावा. जेणेकरून जनावरांना त्या भागामध्ये प्रवेश करता येणार नाही, त्यापासून कोणत्याही आजाराचा संसर्ग होणार नाही.
  • गोठ्याची रचना ही पक्षी, उंदीर, घूस, सरपटणारे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक व माश्या यांच्यापासून संरक्षण करणारी असावी.
  • भेट देण्यासाठी येणाऱ्या लोकांना गोठा बघण्यासाठी आणि भेटण्यासाठी एखाद्या विशिष्ट खोलीची सोय करावी. जेणेकरून हे लोक आपल्या जनावरांच्या अनावश्यक सानिध्यात येणार नाहीत.
  • गोठ्यामध्ये काम करणारे कामगार, भेट देणारे लोक, कुटुंबातील सदस्य, स्वतः मालक व इतर लोकांनी जनावरांच्या गोठ्यामध्ये फिरण्यासाठी ठरावीक ड्रेस घालावा.
  • गोठ्यात नव्याने येणारी जनावरे कमीत कमी २१ ते ३० दिवस विलगीकरण कक्षात ठेवावीत.यासाठी   मुख्य गोठ्यापासून विशिष्ट अंतरावर विलगीकरण कक्षाची सोय करावी.
  • खाद्य, खुराक, चारा, वेगवेगळी उपकरणे ही जनावरांच्या मुख्य गोठ्यापासून वेगळी ठेवावीत.  
  • गोठ्याला योग्य पद्धतीने कुंपण करावे,त्यामुळे कोणीही थेट गोठ्यामध्ये येणार नाही. 
  • जनावरांच्या गोठ्यामध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळ वहाने आणि लोकांसाठी कमीत कमी ३ फूट रुंद व ६ फूट लांब असे एक फूट बाथ तयार करावे. त्यामध्ये निर्जंतुकीकरणाचे द्रावण किंवा चुन्याची पावडर पसरावी. गोठ्यामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी प्रवेशद्वारातील फुटबाथमधूनच गोठ्यामध्ये येतील याची काळजी घ्यावी.
  • आजारी पडलेली जनावरे इतर सशक्त जनावरांपासून वेगळी  ठेवावीत. यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. 
  • गोठ्यापासून विशिष्ट अंतरावर शास्त्रीय पद्धतीने शेणखत  साठवण्याची सोय असावी.
  • कार्य जैवसुरक्षा 

  •  मुख्य प्रवेशद्वारावर हा गोठा जैव सुरक्षा पाळणारा आहे. तसेच जैव सुरक्षे संदर्भात घेतली जाणारी काळजी याची माहिती असणारा फलक लावावा. 
  • गोठ्याला भेट देण्यासाठी येणाऱ्या नवीन व्यक्तीचा जनावरांशी अनावश्यक संबंध टाळावा. गरज पडल्यास त्यांना गोठ्यामध्ये वापरण्यासाठी ठेवलेले स्वच्छ कपडे, मास्क, टोपी आणि गम बूट परिधान करूनच जनावरांजवळ घेऊन जावे. हीच गोष्ट जनावरांच्या उपचारासाठी येणाऱ्या पशुवैद्यकाने पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे.
  • गोठ्यामध्ये काम करणारे कामगार, भेट देणारे लोक, आपल्या कुटुंबातील लोक व इतर  सर्व लोकांना जैवसुरक्षेबाबत शिक्षित करावे.त्यांच्या संपूर्ण नोंदी गोठ्यावर ठेवाव्यात. 
  • गोठा दररोज स्वच्छ करावा. ठरावीक दिवसांनी निर्जंतूक करावा. 
  • गोठ्यामध्ये येणारी नवीन जनावरे कमीतकमी २१ दिवस विलगीकरण कक्षात  ठेवून आणि योग्य निरीक्षणानंतर गोठ्यातील इतर जनावरांबरोबर ठेवावीत.
  • आपल्या गोठ्यावर वापरली जाणारी उपकरणे आणि वस्तू शक्यतो दुसऱ्या जनावरांच्या गोठ्यावरती वापरासाठी देणे कटाक्षाने टाळावे. शक्य नसल्यास त्यांचे निर्जंतुकीकरण केल्याशिवाय परत आपल्या गोठ्यामध्ये आणू नये.
  • जनावरांचे वेळोवेळी बारीक निरीक्षण करून त्यांच्या रोजच्या वागण्यामध्ये कोणताही अनियमित बदल झाला असल्यास त्याचे कारण जाणून घ्यावे. जनावर आजारी असल्यामुळे जर बदल झाला असेल तर त्यांना लगेच वेगळे करून विलगीकरण कक्षामध्ये ठेवावे. जेणेकरून इतर जनावरांना त्याचा संसर्ग होणार नाही.
  • गोठ्यामध्ये वेगळी, अनियमित लक्षणाचे आजार असणारी जनावरे आढळली तर त्याची माहिती संबंधित शासकीय प्रणाली, पशू तज्ज्ञांना द्यावी. जेणेकरून जनावरांमध्ये लाळ्या खुरकूत, देवी व इतर संसर्गजन्य आजार असतील तर त्यावर वेळीच नियंत्रण शक्य होईल. जनावरांना स्वच्छ पाणी पाजावे.
  • गोठ्यामध्ये रोजच्या रोज कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात याची नोंद ठेवावी. भविष्यात एखादा आजार आला तर त्याबद्दल रोजनिशीमध्ये ठेवलेल्या नोंदी पाहून योग्य निदान करणे शक्य आहे.  त्यामुळे उपचार खर्चात बचत होईल. 
  •  जनावरांची वर्षातून एकदा रक्त तपासणी, शेण, लेंडी तपासणी केल्यास विशिष्ट आजारावर नियंत्रण मिळविणे सोपे जाते. पशूतज्ज्ञांच्या सल्यानुसार शिफारशीनुसार लसीकरण आवश्यक आहे. 
  • गोठ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची (उदा - कपडे, मास्क, औषधांच्या बाटल्या ) शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी. व्यायलेल्या जनावरांचा वाराची देखील योग्य विल्हेवाट लावावी.  कारण या गोष्टी आजाराचा संसर्ग पसरवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
  • गोठ्यामध्ये असाध्य आजारामुळे जनावराची मरतुक झाली असेल तर त्या जनावरांचे शवविच्छेदन करून मृत्यूचे कारण समजून घ्यावे. त्यानुसार गोठ्या मधील इतर जनावरांची उपचार पद्धती ठरवावी.
  • गोठ्यामधील अशक्त, रोगट आणि कमी उत्पादन देणाऱ्या जनावरांना वेळोवेळी काढून टाकावे.
  • संपर्क-  डॉ.तेजस शेंडे, ९९७०८३२१०५   (लेखक पशूतज्ज्ञ आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com