सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर !

सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर !
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर !

कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज सायंकाळी आजोबा येऊन बसतात. येताना अगदी व्यवस्थित येतात. मंदिराच्या कट्ट्यावर बसून इतरांशी छान मोजकेच बोलतात; पण तास दोन तास झाले, की आपण घरी परतायचं आहे हेच विसरतात. त्यांना नाव, पत्ता विचारला, तरी ते मख्खपणे फक्त आपल्या चेहऱ्याकडे बघत राहतात. एक गोष्ट चांगली, की हे आजोबा विठ्ठल मंदिरात बसलेले असतात, हे त्यांच्या घरच्यांना माहीत असते. त्यामुळे घरातले कोणी तरी येऊन त्या आजोबांना घेऊन जातात.  हे आजोबा म्हणजे, अल्झायमर या आजाराचे एक उदाहरण. पण वयाच्या पासष्ट, सत्तरीनंतरचे अनेकजण अशा लक्षणांनी, आजारांनी ग्रस्त आहेत. बघता बघता व्यवस्थित असताना अचानक दीर्घकाळासाठी किंवा अल्पकाळासाठी काहीच न आठवणे किंवा नेमके न आठवल्यामुळे असंबद्ध वागणे असे या आजाराचे स्वरूप आहे. ज्या घरात सत्तर - पंचाहत्तरीचे वृद्ध आहेत, त्या बहुतेक घरांत या आजाराचे वास्तव्य आहे. पूर्णपणे मेंदूच्या हालचालीशी संबंध असलेला हा आजार केवळ व्यक्तिगत पातळीवर नव्हे; तर सामाजिक पातळीवरदेखील त्याचे परिणाम करणारा आहे. 

साधारण सत्तर वयानंतर 25 टक्के वृद्धांना आणि 85 वयानंतर 80 ते 90 टक्के वृद्धांना हा आजार येऊन भिडतो. मेंदूचे कार्य व्यवस्थित ठेवणारा ऍसिटील कोलीन हा द्रव कमी झाल्याने आजाराची लक्षणे जाणवू लागतात. अनेकजण आपले नाव, पत्ताच विसरतात. एखाद्या व्यक्तीला मोबाईल करायचा म्हणून मोबाईल हाती घेतात; पण कोणाला रिंग करणार होतो, तेच एका क्षणी विसरून जातात.  एखाद्या कामासाठी ते बाहेर पडतात; पण दुसरीकडेच जातात. समोरच्या व्यक्तीला ते ओळखतात; पण त्याचे नावच त्यांना आठवत नाही. हे काहींच्या बाबतीत दीर्घकाळ, तर काहींच्या बाबतीत अल्पकाळ असते; पण त्या अवधीत त्यांच्याकडून विसंगत वर्तन होते.

कुटुंबात विसंवाद होतो. घरातील समजून घेणारे असतील तर ठीक, नाही तर वृद्धांना हिडीसफिडीस होते. त्यामुळे वृद्धांची मानसिकता आणखी बिघडते. वृद्धांचे डोके फिरले असे म्हणण्यापर्यंत नातेवाइकांची मजल जाते; पण वस्तुस्थिती वेगळी असते. या आजारात वृद्ध आपली स्मृती हरविणार हे गृहीत धरूनच त्यांच्या कुटुंबीयांनी त्या वृद्धांना सांभाळून घेणे, हेच या परिस्थितीत महत्त्वाचे असते. 

या आजारावर 100 टक्के बरे करणारे औषध नाही; पण आजाराला रोखणे आपल्या हातात आहे. मेंदूची कार्यक्षमता चालू राहावी म्हणून वृद्धांनी वाचन, संगीत, खेळ, करमणूक, अध्यात्म, व्याख्यान यांत मन रमविले तर हा आजार बऱ्यापैकी रोखता येतो. पण मेंदू गंजून जाईल, असे ढिम्म वर्तन दैनंदिन व्यवहारात राहिले, तर हा आजार विशिष्ट वयानंतर येऊन भिडणार आहे. त्यामुळे अशा ज्येष्ठांच्या बाबतीत कुटुंबीयांनीही सजग राहावे.  - डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर, मेंदू विकार उपचारतज्ज्ञ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com