बेशिस्त म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध व्हा, गर्दी टाळा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवलेली असूनही लोक विनाकारण झुंबड करून खरेदी करताना दिसत आहेत, हे अत्यंत चुकीचे असून बेशिस्त म्हणजे संकटाला निमंत्रण आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे, सावध व्हावे, गर्दी टाळावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवलेली असूनही लोक विनाकारण झुंबड करून खरेदी करताना दिसत आहेत, हे अत्यंत चुकीचे असून बेशिस्त म्हणजे संकटाला निमंत्रण आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे, सावध व्हावे, गर्दी टाळावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच, पुन्हा एकदा जिद्द, संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे युद्ध आपण नक्की जिंकू असा विश्वास राज्यातील जनतेला दिला आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट प्रसारणाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी बुधवारी (ता.१) संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. अन्नधान्य वितरणाची साखळी व्यवस्थित सुरू लॉकडाऊन नंतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी माणसे आणि यंत्रणा एकत्र करताना थोडा वेळ लागला त्यामुळे जनतेला थोडा त्रास झाला. त्यासाठी दिलगिरी व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, आता ही वितरण साखळी सक्षमपणे कार्यान्वित झाली आहे. येत्या एक दोन दिवसात हा प्रश्न पूर्णपणे सुटेल. राज्यात जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची अजिबात कमी नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, त्यासाठी गर्दी करू नये.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नाही महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली नसल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोना संकटापाठोपाठ आर्थिक संकट येऊ नये, राज्याची आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून हे वेतन टप्प्या टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार हे पहिल्यांदा दिले जातील, त्यामुळे वेतन कपात होईल ही भीती कुणीही मनात बाळगू नये, गैरसमज करून घेऊ नये.

रुग्ण बरे होत आहेत ही समाधानाची बाब राज्यात चाचणी केंद्र वाढले आहेत, त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे असे असले तरी अजून आपण काळजी घेतली तर विषाणूचा हल्ला परतवून लावू शकतो या स्थितीत आहोत, धोका आहे पण त्यामुळे घाबरून जाऊ नये, गर्दीही करू नये असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याचे समाधान व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या यादीत सुरुवातीला जे देश नव्हते त्या देशातून जे नागरिक- पर्यटक आले, त्यांनी कोणतीही माहिती न लपवता पुढे यावे, लक्षण आढळली तर पटकन उपचार करून द्यावेत कारण योग्य वेळी उपचार झाले तर जीव वाचू शकतो हे ही या दरम्यान स्पष्ट झाल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

थंड पेय, थंड सरबत यापासून दूर राहा मुख्यंमत्री ठाकरे यांनी खासगी डॉक्टरांना दवाखाने बंद न ठेवण्याचे आवाहन केले. सर्दी खोकला आणि तापाची लक्षणे असलेले रुग्ण सरकारी दवाखान्यात पाठवा परंतु इतर रुग्णांना वैद्यकीय सेवा द्या, घाबरून जाऊ नका असेही मुख्यंमत्री ठाकरे यांनी सांगितले.  मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला वातानुकूलित यंत्रणा (एसी) न लावण्याची सूचना केली. तसेच थंड पाणी, थंडपेय, थंड सरबत यापासून थोड्याकाळासाठी दूर राहा, ॲलर्जी टाळा, साधं पाणी प्या, यामुळे नेहमीच्या पद्धतीने होणारे सर्दी पडशासारखे आजार तुम्ही दूर ठेवू शकाल असे ही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

१ हजार केंद्रात दोन लाख स्थलांतरितांना सुविधा संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला असल्याने  इतर राज्यातील कामगार, मजूर  यांनी स्थलांतर करणे ताबडतोब थांबवावे असे सांगितले असूनही लाखो लोक स्थलांतर करताना दिसत असल्याची चिंता व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्यासाठी राज्यात जवळपास १ हजार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत तर आजघडीला दोन- सव्वादोन लाख स्थलांतरित लोक, मजूर यांची तिथे व्यवस्था करण्यात आली आहे, इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील कामगार-मजूरांची ही ती राज्ये व्यवस्था करत आहेत, प्रत्येकजण माणुसकीचा धर्म पाळत आहेत, त्यांना अन्न, औषधं याचा पुरवठा केला जात आहे हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गणवेशधारी डॉक्टर योद्ध्याप्रमाणे भासले नायडू रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेस शी आपण बोललो, त्यावेळी ते गणवेशधारी योद्ध्यासारखे दिसत होते. अत्यावश्यक सेवेत काम करणारे सर्व कर्मचारी, बेस्टचे ड्रायव्हर, एस.टीचे ड्रायव्हर, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार, या सगळ्यांचे मला खूप कौतुक वाटते अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या कामाचा गौरव केला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com