निर्यातदार व्हा... पण शेतकऱ्यांचा विश्वासघात नको : परिषदेतील सूर

agriculture produce export
agriculture produce export

पुणे: शेतमालाची निर्यात आता पूर्णतः ‘बिझनेस माइंड’नेच करावी लागेल. सायंकाळी आपल्या खिशात चार पैसे आलेच पाहिजेत, असे ‘बिझनेस’चे अर्थशास्त्र आपल्याला शिकून घ्यावे लागेल. त्यासाठी अभ्यास आणि चिकाटी लागेल. मात्र, यशस्वी निर्यातदार बनत असताना शेतकऱ्याची फसवणूक होता कामा नये, असा सूर राष्ट्रीय कृषी निर्यात परिषदेत व्यक्त करण्यात आला.  मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चरने (एमसीसीआयए) पुण्यात आयोजित केलेली ही एक दिवसीय परिषद यशस्वी ठरली. परिषदेतील मंथनामुळे अनेक अभ्यासू शेतकरी तरुणांनी यशस्वी निर्यातदार होण्याचा संकल्प केला. या परिषदेचे सारे श्रेय नाबार्डचे माजी अध्यक्ष उमेशचंद्र सरंगी, कृषी निर्यात विभागाचे सल्लागर गोविंद हांडे, एमसीसीआयचे अध्यक्ष प्रदीप भार्गव व  महासंचालक प्रशांत गिरबाने यांना द्यावे लागेल. शेतमाल निर्यातदार डॉ. तन्मन्ना चतुर्वेदी यांनी निर्यातीमधील विविध अडचणी सांगत जास्तीत जास्त अभ्यास केल्याशिवाय निर्यात सुरू करू नका, असा सल्ला देत सोप्या टीप्स दिल्याने उद्योजक खूश झाले होते.  शेतकऱ्यांचा रुपयादेखील ठेवू नका ः कांचन  महाग्रेप्स व सीआयएचचे अध्यक्ष सोपान कांचन यांनी यशस्वी निर्यातदार होण्याचा मंत्र दिला. ‘‘एका रात्रीत नफेवाला निर्यातदार होता येणार नाही. निर्यातच काय पण कोणताही धंदा सेट व्हायला किमान पाच वर्षे लागतात. मग नफा हळूहळू होतो. प्रत्येक गोष्टीत शास्त्र आहे. शेती हे शास्त्र असल्याने तुम्ही आधी ज्या फळाची निर्यात करता आहात त्याची शरीराची रचना समजावून घ्या. निर्यात करायची म्हणजे नेमके काय करायचे, भारतामधील नियमावली, आयातदाराच्या देशातील नियमावली, ग्राहकांचा कल, बाजारपेठेची व्यवस्था, प्लॅन्ट क्वारंटाईन, फायटो, रेसिडयू अशा अनेक विषयांचा अभ्यास करावा लागेल,’’ असा सल्ला त्यांनी दिला.  ‘‘आम्ही युरोपातील बागा फिरलो. तेव्हा काही जण आम्हाला बागांमध्ये येऊ देत नव्हते. तेथील एकाने आम्हाला सांगितले होते की तुम्ही (भारतीय) जर खराब द्राक्ष जागतिक बाजारात पाठविले तर त्याचा परिणाम आमच्या मालावर देखील होईल. त्याने आम्हाला प्रतिष्ठा राहील असा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. आम्ही देखील द्राक्षात यशस्वीपणे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक तसेच उत्पादक निर्यातदार (ग्रोव्हर एक्स्पोर्टर्स) ताकदीने उभे राहिले. महाग्रेप्स यशस्वी ठरली ती केवळ शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने. पहिले दोन वर्षे तर आम्हाला एक रुपयाबाबत विचारले गेले नाही. त्यातून पुढे निर्यात वाढत गेली. तुम्ही देखील शेतकऱ्यांचा विश्वासघात न करता निर्यात करा. प्रसंगी तोटा सहन करावा पण शेतकऱ्यांचा एक रुपया बाकी ठेवू नये,” असे सांगत श्री. कांचन यांनी शेतकऱ्यांची असलेली घट्ट नाळ दाखवून दिली.  शेतकरी समृद्धी हेच ध्येय : शिंदे  ‘‘राज्यातील फळ निर्यातीचा पाया महाग्रेप्सने रचलेला आहे. शेतकरी स्वतःच लागवड ते विक्री या साखळीत जागतिक बाजारात यशस्वीपणे शाश्वत व्यवसाय करतील अशी या चळवळीची धारणा होती. आम्ही त्याच ध्येयाने सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची बांधणी करीत आहोत. अमूलच्या रचना आणि संकल्पनेप्रमाणेच शेतकरी समृद्धी हेच आमचे अंतिम ध्येय आहे,” असे भावना ‘सह्याद्री’चे शिल्पकार विलास शिंदे व्यक्त केली. त्यामुळे या राष्ट्रीय परिषदेला आलेल्या प्रत्येकाला आपले अंतिम ध्येय काय आहे, याची जाणीव विलासरावांच्या मनोगतामधून करून दिली गेली.   ‘‘सह्याद्री फार्मर्स प्रोडयुसर कंपनीचा २०११ ला प्रवास सुरू झाला. आम्ही ५०० कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. आधी केवळ शेतकरी सभासदांच्या ५५ कोटींच्या भागभांडवलावर काम सुरू झाले होते. आता साडेसहा हजार शेतकरी बांधवांसह आम्ही ४५० कोटींचा टप्पा आता पार पाडला आहे,’’ अशी माहिती श्री. शिंदे यांनी देताचा परिषदेने टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. आता ब्लॉक चेन राबविणारी सह्याद्री ही देशातील पहिलीच शेतकरी उत्पादक कंपनी ठरणार आहे.  द्राक्ष निर्यातीत भारतात पहिल्या क्रमांकावर असलेली आजची ‘सह्याद्री’कशा अवस्थेतून गेली याचे बिकट अनुभव श्री. शिंदे यांनी निर्यातदारांना सांगितले. ‘‘२००४ मध्ये मी अशा अवस्थेत होतो की शेतीत सर्व तोटा होत आर्थिक फटके बसल्याने कुठेतरी नव्या आव्हानाकडे उडी घेण्याचा प्रयत्न करीत होतो. प्रत्येक शेतकरी आज एका सापळ्यात अडकलेला आहे. मी देखील या सापळ्यात होतो. मी त्यातून बाहेर पडलो आणि आता इतर शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सह्याद्रीची बांधणी अजूनही करतो आहे. आपले शेतकरी कष्टाळू आहेत. त्यांना दिशा दिल्यास किमान दोन लाख कोटीचा उद्योग फलोत्पादनात उभा राहू शकतो,’’ असा विश्वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.   कारवाईच्या जाळ्यात अडकू नका ः कुलकर्णी  स्कालर ट्रेडिंग कंपनीचे संचालक श्रीपाद कुलकर्णी म्हणाले ‘‘शेतमाल विम्याशिवाय अजिबात निर्यात करू नका. कागदपत्रे व्यवस्थित ठेवली नाही तर कायदेशीर कारवाईच्या जाळ्यात अडकू शकता. कमिशनवर व्यवसाय करणाऱ्या कोणत्या विदेशी कमिशन एजंट किंवा संस्थेचे व्यवहार तपासून घ्यावे. निर्यात प्रणाली पूर्णतः समजावून घ्यावी, पॅकेजिंग, गुणवत्ता मानकं, काढणीचे तंत्र, पुरवठा साखळी, कंटेनरची वाहतूक याची सखोल माहिती घ्यावी. आधी तुम्ही थेट निर्यात न करता आधी देशांतर्गत काम करा. देशांतर्गत असलेल्या निर्यातदारांना आधी तुम्ही माल पुरवण्याचा अनुभव घेतल्यास तुम्हाला पुढे निर्यात करण्याची क्षमता आलेली असते.’’ ‘‘नव्याने निर्यात सुरू करण्यापूर्वीच आपण आपला माल कोण विकत घेणार अशी शंका व्यक्त करतो. मात्र, जगभरात भरपूर बायर किंवा आयातदार आहेत. तुम्हाला खात्रीचे आयातदार शोधावे लागतील. त्यांच्यापर्यंत पोचावे लागेल. त्यासाठी जागतिक प्रदर्शन, ट्रेड फेअर, परिषदांमध्ये सहभागी व्हावे लागेल,’’ असाही आग्रह त्यांनी धरला.  क्वारंटाईन’ व ‘फायटो’चा हवा अभ्यास ः वावरे  राज्याच्या विभागीय प्लांन्ट क्वारंटाईन स्टेशनचे सहसंचालक शिवाजी वावरे यांनी शेतमालाच्या निर्यातीत क्वारंटाईन नियमावली व ‘फायटोसॅनिटरी’साठी असलेली अटी, तपासणी व प्रमाणपत्रे याबाबत बारकाईने अभ्यास करण्याचा सल्ला दिला. निर्यातीला उपयुक्त ठरणारा १०० देशांचा २८७ मालाचा डेटा भारतीय यंत्रणेने तयार केलेला आहे. तसेच, राष्ट्रीय फायटो सॅनिटरी प्रणालीची (एनएसपीएम) मानके देखील तयार करण्यात आली आहेत. निर्यातीसाठी हा डेटा व मानकांचा अभ्यास करावा. त्यामुळे निर्यातीपूर्वीच्या प्रक्रियांची कायदेशीर बाजू कळू शकेल, असे वावरे यांनी स्पष्ट केले.  राज्यात शेतमाल निर्यातपूर्व तपासणी व फायटो प्रमाणपत्र वितरणासाठी एसओपी (मार्गदर्शक कार्यपद्धती) तयार करण्यात आलेली आहेत. फळे भाजीपाला तांदूळ, भुईमूग, कट फ्लॉवर आणि वाळलेल्या मिरचीची निर्यात करण्यासाठी या ‘एसओपी’चा अभ्यास उपयुक्त ठरणार आहे. तथापि, प्रत्येक देशाने शेतमाल आयातीसाठी प्रत्येक मालाकरिता आपली स्वतःची एक नियमावली तयार केलेली असते. त्यामुळे नव्या निर्यातदारांना या नियमावलींचा बारकाईने अभ्यास करावा लागेल, असे क्वारंटाईन विभागाचे म्हणणे होते. पॅकेजिंगचा खास अभ्यास हवा ः लोहारीकर एसडीएफ कंपनीच्या संचालिका व यशस्वी महिला निर्यातदार सोनल लोहारीकर यांनी संत्रा निर्यातीची कथा प्रेरणादायक ठरली. ‘‘भारतीय बचत गटांचे उत्पादने गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम असूनही पॅकेजिंग किंवा प्रेझेंटेशन अभावी मागे पडतात. त्यामुळे निर्यातीत अडचणी येतात. यासाठी प्रत्येक देशामधील ग्राहकांचा कल, पॅकेजिंग आणि मागणीचा काटेकोर अभ्यास अभ्यास हवा. यामुळेच आमची संत्रा निर्यात यशस्वी झाली. बचत गटांना आम्ही फक्त पॅकेजिंगची तंत्रे शिकविली. त्यातून लातूरच्या बचत गटाचे पापड आता ऑस्ट्रेलिया आणि आखाती देशात निर्यात होत आहोत,’’ असे त्या म्हणाल्या.   ‘‘नागपूरमधील संत्रा आता आम्ही एकही फळ खराब न होता यशस्वीपणे निर्यात केले. दुबईत आम्ही संत्राचे पहिले निर्यातदार ठरलो आहोत. यामुळे भारतीय व्यापार महासंचालयाने पत्र पाठवून आमच्या टीमचे अभिनंदन केले आहे. आता आम्ही नागपूरमध्ये संत्रा क्लस्टर तयार केले आहे. रानमेवा असलेले जांभूळदेखील विमानाने निर्यात करतो आहोत. अलीकडे अझरबैझनमध्ये जाऊन आम्ही निर्यातीची संधी शोधली. तेथील सरकारी यंत्रणेने तर आम्हाला शेतीचे निमंत्रणदेखील दिले आहे. आम्ही हळदीचे देखील क्लस्टर देखील तयार करतो आहोत,’’ असे सांगत लोहारीकर यांनी महिला निर्यातदार म्हणून आपले कौशल्य दाखवून दिले.  महाग्रेप्सने लावले निर्यातीचे रोपटे : सरंगी  शेतकऱ्यांना संघटित करून निर्यातीसाठी लागवड ते विदेशी बाजार व्यवस्थेचा पहिला प्रयत्न महाग्रेप्सने तीन दशकांपूर्वी महाराष्ट्रात केला होता. महाग्रेप्सने लावलेले द्राक्ष निर्यातीचे रोपटे आता तीन हजार कोटींच्या उलाढालीपर्यंत वाढले आहे. महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीत महाग्रेप्स व सोपान कांचन यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. विलास शिंदे यांची सह्याद्री कंपनी तर राज्यासाठी पथदर्शक आहे. असे अजून चार विलास शिंदे भविष्यात तयार झाले तर आमच्या परिषदेचा हेतू सफल झाला, असे मी म्हणेन, अशा शब्दांत श्री. सरंगी यांनी परिषदेचा हेतू स्पष्ट केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com