नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण दे
अॅग्रो विशेष
कोटा अदलाबदल सवलतीचा राज्यातील कारखान्यांना फायदा
साखर कारखान्यांना निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने साखर निर्यात योजनेत लवचिकता आणली. देशातील कोणत्याही कारखान्यांना निर्यातीचा कोटा व स्थानिक विक्रीचा कोटा अदलाबदल करण्याची मुभा दिली होती.
कोल्हापूर : साखर कारखान्यांना निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने साखर निर्यात योजनेत लवचिकता आणली. देशातील कोणत्याही कारखान्यांना निर्यातीचा कोटा व स्थानिक विक्रीचा कोटा अदलाबदल करण्याची मुभा दिली होती. या योजनेचा फायदा राज्यातील साखर कारखान्यांना होत आहे. राज्यातील कारखान्यांनी गेल्या पंधरा दिवसांत दोन लाख टन कच्च्या साखरेचे नव्याने करार केले आहेत. कंटेनर, जहाजांची अनुपलब्धता असतानाही कारखान्यांनी हे करार केले आहेत.
गेल्या योजनेमध्ये जे कारखाने अपेक्षित निर्यात करणार नाहीत त्यांचा कोटा इतरांना देण्याच्या सूचना होत्या. यंदा जाहीर झालेल्या योजनेत सरकारने बदल केले. जर एखाद्या साखर कारखान्याला स्थानिक बाजारात साखर परवडत असेल आणि दुसऱ्या कारखान्याला निर्यात करणे फायदेशीर ठरत असेल, तर दोन्ही कारखान्यांनी परस्पर सहमतीने केंद्राने दिलेले स्थानिक व निर्यातीचे कोटे अदलाबदल करण्याची सवलत शासनाने दिली होती. कुठल्याही मार्गाने साखरेची विक्री व्हावी हाच उद्देश या मागचा होता. याला राज्यातील साखर कारखान्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन लाख टन साखरेचे करार केले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून जागतिक बाजारात आयात, निर्यातीचे प्रमाण कमी जास्त झाले आहे. बाहेरील देशात भारतात येणाऱ्या शेतीमालासह अन्य वस्तूंमध्येही घट झाली आहे. यामुळे भारतातून बाहेर जाणाऱ्या शेतीमालासाठी जहाजे कंटेनर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. या प्रतिकूल परिस्थितीतही साखरेचे निर्यात करार होत आहेत. ही समाधानाची बाब असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.
‘एमएसपी’वाढीचा निर्णय नाहीच
कारखान्यांनी साखरेच्या ‘एमएसपी’त वाढ करावी, अशी मागणी केंद्राकडे केली असली तरी केंद्र मात्र या मागणीकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक कारखाने निर्यात योजनेचा लाभ घेण्यासाठी साखर निर्यात करण्याकरिता पसंती दाखवत असल्याचे चित्र असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. यातून कोटा अदलाबदल सवलतीला पसंती मिळत आहे.
जागतिक बाजारात गतीने चढ-उतार
साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक बाजारात मागील पंधरा दिवसांत साखरेच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहे. दहा दिवसांपूर्वी रिफाइन साखरेला असणारा सरासरी प्रति टन ४८५ डॉलरचा दर सध्या ४५० डॉलर इतका खाली आला आहे. असे असले तरी भारतीय साखर कारखानदारांच्या दृष्टीने ही एक फायद्याची संधी आहे. गेल्या आठ दिवसांत पांढऱ्या साखरेला निर्यातीला सरासरी २७००० ते २७५०० रुपये प्रति टन एक्स मिल हा दर मिळाला आहे. आज कच्या साखरेला रुपये २६५०० ते २७००० प्रति टन दर मिळत आहे. वरील दराशिवाय निर्यात अनुदान रुपये सहा हजार प्रति टन याचा विचार करता साखर कारखान्यांना ३३००० रुपयांच्या आसपास साखरेचा दर मिळणे अपेक्षित आहे.
प्रतिक्रिया
निर्यातीसाठी सध्या बंदरावर प्रतिकूल परिस्थिती असली तरी केंद्राच्या अनुदानाचा विचार करता साखर निर्यात करणे कारखान्यांना फायदेशीर ठरेल. स्थानिक बाजारात अजूनही उठाव म्हणावा तसा नाही. यामुळे साखरेचे सध्या किमान करार झाले तरी कंटेनर व जहाजे उपलब्धतेबाबतची परिस्थिती सुधारल्यानंतर साखर गतीने देशाबाहेर जाऊ शकेल. आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी जास्त असले अनुदान मिळणार असल्याने भारतीय साखरेसाठी ते फायद्याचेच ठरेल.
- अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार