लॉकडाऊनमुळे पानांची लाली गायब 

महिनाभरापासून माझ्या पानमळ्याच्या शेतीला कोणी विचारेना. महिनाभरात जवळपास पन्नास हजाराचे नुकसान माझ्या एकट्याचे झाले. गाव शिवारात साठ ते सत्तर एकरवर पानमळे आहेत. नुकसान मोठे पण भरपाईची काहीच सोय नाही. - अशोक आगे, पानमळा धारक, सोयगाव. जि. औरंगाबाद
betel leaf
betel leaf

औरंगाबाद: मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना या जिल्ह्यातील पान मळ्यांचा गाडा लॉकडाऊनपासून थांबला आहे. शेकडो एकरातील उत्पादित पानांची विक्री ठप्प असल्याने पान उत्पादकांचे लाखोंचे उत्पन्न बुडाले आहे. सोबतच या पानमळ्यांमुळे शेकडो मजुरांच्या हातांना मिळणारे कामही थांबले आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावसह जालना जिल्ह्यातील भारज, पारध, जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा (पानांचे) शेंदुर्णी, बुलढाणा जिल्ह्यातील मासरूळ, चांदई पुणे जिल्ह्यातील निमगाव आदी ठिकाणी शेकडो एकरावर पानमळे अस्तित्वात आहेत. वैयक्तिक व एकत्रितपणे पान मळ्यांची शेती शेतकरी करतात. साधारणतः एक एकराच्या पान मळ्यात चार ते पाच शेतकऱ्यांचा सहभाग असतो. काही ठिकाणी एकरापर्यंत वैयक्तिक पानमळे ही शेतकरी करतात.  औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव परिसरात जवळपास 60 ते 70 तर जालना जिल्ह्यातील भारज व पारध परिसरातही तेवढेच पानमळे असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. दहा गुंठ्याच्या पानं मळ्यातून महिन्याला 20 ते 35 पर्यंत पान बंडल काढणारे शेतकरी या दोन जिल्ह्यात आहेत. एक पान बंडल मध्ये 5 हजार पान असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नागपूर, औरंगाबाद, भुसावळ, अकोला, अमरावती, नाशिक, चांदवड, श्रीरामपूर, आदी पानाच्या मुख्य बाजारपेठा आहेत. जळगावमधील शेंदूर्णी व औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावच्या पानांवर या बाजरपेठांचा डोलारा अवलंबुन असल्याचे जाणकार सांगतात.  श्रीरामपूर, नाशिक, चांदवड या 3 बाजारपेठांमध्ये कडक पानांचीच मागणी असते. त्यामुळे संधी मिळाली तरी पाने जरड झाल्यामुळे केवळ या तीनच बाजरपेठांचा पर्याय राज्यातील पान उत्पादकांसमोर राहणार असल्याचे शेतकरी सांगतात. दहा गुंठ्यांत पासून एकरांपर्यंत पान मळ्याचे क्षेत्र असते. बारमाही चालणाऱ्या पानाच्या मळ्यावर एकरी जवळपास दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. परंतु नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची पानमळा धारकांना कुठलीही भरपाई मिळत नाही. आता लॉकडाऊन'मुळे पान मळ्याची शेती ठप्प आहे. पानांचा व्यापारच ठप्प झाला असून थांबलेल्या या पान मळ्याच्या शेतीत शेकडो मजुरांच्या हातांना मिळणारे कामही बंद झाले आहे.  पानमळ्यांना विमा संरक्षण देण्याची मागणी पानमळा धारकांकडून केली जात आहे. याशिवाय जसे फळबागेला शेततळे दिले जाते तसेच पान मळ्याला पाण्याची गरज लक्षात घेऊन पानमळा शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेततळे अनुदानावर देण्याची मागणीही पानमळा धारक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.  प्रतिक्रिया पानमळ्याला विमा संरक्षण मिळायला हवे. शिवाय शेततळेही मिळालं तर पाण्याची सोय होईल. यावर शेकडो शेतकऱ्यांचं अर्थकारण व मजुरांचो रोजीरोटी अवलंबून आहे.  - देविदास बोडखे, पानमळा धारक, भारज, जि. जालना.  पनामळा धारकांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारनं त्या सोडविण्याची गरज आहे. नैसर्गिक आपत्ती व भरपाईची नसलेली सोय आदी अडचणींमुळे मला पान मळ्याची शेती सोडावी लागली.  - चिंधु आगे, शेतकरी, सोयगाव, जि. औरंगाबाद.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com