दक्षिण महाराष्ट्र-कर्नाटकमधील कारखान्यांची उसासाठी ओढाताण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर(प्रतिनिधी) : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना आता कर्नाटकातील कारखान्यांचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दोन्ही जिल्ह्यांतील कारखान्यांचे शेती विभाग आता हा ऊस आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील कारखान्यांचे अर्थकारण कर्नाटकातील गावांतील उसावरही चालत असल्याने आता कारखान्यांच्या शेती विभागातील कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर ऊस मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक बड्या कारखान्यांना बेळगाव जिल्हा हा मोठा आधार आहे. काही कारखान्यांपासून कर्नाटकची सीमा फक्त पाच ते दहा किलोमीटर इतक्‍याच अंतरावर आहे. यामुळे या भागातील बराचशा उसाने दोन्ही जिल्ह्यातील कारखान्यांचे गाळप होते. चार ते पाच वर्षापूर्वी बेळगाव जिल्ह्यात कारखान्यांची स्थिती चांगली नव्हती. अनेक खासगी कारखाने एखादे बिल देऊन त्या भागातील ऊस उत्पादकांची बोळवण करत. शेतकऱ्यांना हा फरक लक्षात आल्याने बेळगाव जिल्ह्यातील अनेक ऊस उत्पादकांनी महाराष्ट्रातील कारखान्यांशी संपर्क साधून या कारखान्यांना ऊस देण्यास संमती दर्शविली.

कर्नाटकातील अनेक ठिकाणी उसाचे मोठे क्षेत्र आहे. यामुळे एकदा एखाद्या गावात ऊसतोडणी कामगार गेले की पंधरा दिवस त्या गावात ऊस तोडणी चालते. असा अनुभव कारखान्यांचा आहे. यामुळे हे कारखानेही पहिल्या टप्प्यात कर्नाटकातील ऊस गाळपासाठी प्राधान्य देतात. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दोन्ही जिल्ह्यतील सुमारे एक लाख मेट्रिक टन उस कर्नाटकातील कारखान्यांना गेल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

हंगाम लांबल्याचा फटका यंदा किमान आठ ते दहा दिवस हंगाम लांबला, याचा फटका आता दोन्ही जिल्ह्यांतील कारखान्यांना बसत आहे. परतीचा पाऊस लांबल्याने ऊस कर्नाटकातील कारखान्यांना जाणार नाही, हा दिलासा फार काळ टिकला नाही. जिथे संघटनांचे प्राबल्य नाही त्या भागात मोठ्या प्रमाणात कर्नाटकातील कारखान्यांकडे उसाची तोड झाली.

कर्नाटकातील कारखान्यांनी महाराष्ट्रातील कारखान्यांच्या स्पर्धेत उतरत अपेक्षित दर दिल्याने शेतकऱ्यांचाही ओढा राहिला. गडहिंग्लजसारख्या ठिकाणी तर सध्या कर्नाटकातील कारखान्यांनाच तोड देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, कागल शिरोळ, गडहिंग्लज या भागातील, तर सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ, मिरज तालुक्‍यातील ऊस कर्नाटकातील कारखान्यांकडे जात आहे.

यामुळे हा ऊस रोखण्याचे आव्हान कारखान्यांच्या शेती विभागाकडे आहे. कर्नाटकात ऊस जाऊ नये, यासाठी कारखान्यांच्या प्रतिनिधींच्या बैठका गावागावात सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त ऊस कर्नाटकातून आणण्याचे नियोजन सुरू असल्याचे दोन्ही जिल्ह्यांतील कारखान्यांच्या शेती विभागातील प्रतिनिधींनी सांगितले.

दरम्यान, कर्नाटकचा ऊस महाराष्ट्र, तर महाराष्ट्रातील काही कारखान्यांचा ऊसही कर्नाटकात जात आहे. यामुळे दोन्ही कारखान्यांच्या प्रतिनिधींत वादाचेही प्रसंग घडत आहे. नोंद नसलेल्या उसाबाबत तर अक्षरश: पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. यामुळे कर्नाटकातील कारखाने महाराष्ट्रात उस तोड करण्यास आल्यास त्यांना उस कसा मिळणार नाही, याची रणनीती आखली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com