बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी सजग राहावे : डवले

बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी सजग राहावे : डवले
बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी सजग राहावे : डवले

अकोला : गेल्या हंगामात गुलाबी बोंड अळी निर्मूलनासाठी चांगले काम झाले. तीच धडाडी याही वर्षात कायम ठेवावी. मक्यावरील लष्करी अळीबाबतही व्यवस्थापनाचे तंत्र विस्तार यंत्रणांनी वेळच्या आत शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे, असे आवाहन राज्याचे कृषी खात्याचे सचिव एकनाथ डवले यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सोमवारी (ता. ८) कापसावरील गुलाबी बोंड अळी व मक्यावरील लष्करी अळी व्यवस्थापनाबाबत कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले होते. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तारसंचालक डॉ. दिलीप मानकर, विभागीय सहसंचालक सुभाष नागरे (अमरावती), रविंद्र भोसले (नागपूर), सीआयसीआरचे संचालक डाॅ. वाघमारे, किटकशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. धनराज उंदिरवाडे आदी उपस्थित होते. विदर्भातील ११ जिल्ह्यांतील कृषी विभागाचे अधिकारी, विद्यापिठाचे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रांच्या विषय तज्ज्ञांनी कार्यशाळेत भाग घेतला.

डवले म्हणाले, ‘‘बीटी तंत्रज्ञान आल्यानंतर सुरवातीच्या काळात यावर बोंडअळी येईल, यादृष्टीने यंत्रणा गाफील होती. परंतु २०१७ च्या हंगामात पोषक वातावरण मिळाल्यानंतर बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा हल्ला झाला. त्यानंतर गेल्या हंगामात सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने यावर नियंत्रण मिळवता आले. शेतकऱ्यांना कमी दिवसांत येणारे वाण खरिपात घेता आल्यास रब्बीत पुन्हा त्याठिकाणी दुसरे पीक पेरता येईल. हा प्रयोग मराठवाड्यात काही जिल्ह्यात सुरू झाला. आता कापूस आणि रब्बीत दुसरे पीक अशा प्रकारचा पीक पॅटर्न शेतकऱ्यांपर्यंत पोचवला पाहिजे.’’

डाॅ. भाले म्हणाले, ‘‘बीटी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण एकाच वर्षात यशस्वीपणे करता आले. गुजरातमध्ये या कामाला पाच वर्षे लागली. विद्यापीठांनी बोंड अळीनियंत्रणाचे तंत्रज्ञान आधीच तयार केले होते. त्याची सर्व यंत्रणांच्या माध्यमातून अंमलबजावणी झाल्याने यश मिळाले. आता मक्यावरील लष्करी अळीबाबतही मोहीम हातात घेणार आहोत. विद्यापिठाचे तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालयातील ‘रावे’चे विद्यार्थी, या सर्वांच्या सहकार्यातून हे काम केले जाईल. शासनाने अनुदान उपलब्ध करून दिल्यास विद्यापीठ फेरोमोन ट्रॅप तयार करून देईल. ते मक्यावरील अळीच्या नियंत्रणासाठीही फायदेशीर ठरतील.’’

व्यवस्थापनाअभावी सर्वच ‘घामाघूम’  सोमवारी अकोल्यात सूर्याचा पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोचला होता. ठाकरे सभागृहातील वातानुकुलीत यंत्रणा ठप्प पडल्याने प्रत्येक जण घामाघूम झाला होता. बाहेर जिल्ह्यातून आलेल्या अधिकाऱ्यांनी आयोजनाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. सभागृहात बसायला जागा नसल्यानेही अनेक जण सभागृहाच्या बाहेर उभे राहून आयोजनावर टीका करीत असल्याचे दिसून आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com