पीककर्ज वितरणात भंडारा जिल्हा बॅंकेची १०० टक्‍के उद्दिष्टपूर्ती

पीककर्ज वितरणात भंडारा जिल्हा बॅंकेचा अटकेपार झेंडा
पीककर्ज वितरणात भंडारा जिल्हा बॅंकेचा अटकेपार झेंडा

भंडारा ः राष्ट्रीयीकृत आणि जिल्हा बॅंका कर्ज वितरणात पिछाडल्या असतानाच भंडारा जिल्हा बॅंकेने यात आघाडी घेत १०० टक्‍के उद्दिष्टपूर्ती केली आहे. ३० ऑगस्टपर्यंत स्वनिधीतून ५८ हजार शेतकऱ्यांना २५१ कोटी रुपयांचे पीककर्ज बॅंकेने दिले आहे. 

जिल्हा बॅंकेला यंदाच्या खरिपासाठी २५० कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार आराखडा तयार करीत नियोजनबद्धरीतीने बॅंकेकडून पीककर्ज वितरणास सुरवात करण्यात आली. राष्ट्रीयीकृत बॅंका जेमतेम पाच टक्‍क्यांवर असताना जिल्हा मध्यवर्ती बॅंक पीक कर्जवाटपात  ५० टक्‍क्‍यांवर पोचली होती. ३० ऑगस्टपर्यंत बॅंकेने उर्वरित ५० टक्‍के उद्दिष्टाची पूर्ती करीत २०५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना, २५१ कोटी रुपयांचे वाटप करून सर्वांनाच सुखद धक्‍का दिला आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या ४६ शाखांसह जिल्ह्यातील ३६८ सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून अगदी वेळेवर पीककर्ज वितरित करण्यात आले. यासाठी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, बॅंकेचे अधिकारी, विविध शाखांचे व्यवस्थापक, सेवा सोसायट्यांचे अध्यक्ष आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 

असे आहे वितरण भंडारा तालुक्‍यात ३७ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापेक्षा अधिक म्हणजे ४० कोटी १७ लाख २६ हजार रुपये वाटण्यात आले. तुमसर तालुक्‍याला ३० कोटी २० लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ३० कोटी ९२ लाख ८८ हजार रुपयांचे वितरण झाले. मोहाडी तालुक्‍यात ४२ कोटी २५ लाख वाटपाच्या उद्दिष्टापैकी ३८ कोटी ३१ लाख, पवनी तालुक्‍यात ३५ कोटी ५० लाखपैकी ३६ कोटी ९६ लाख, साकोलीत ३१ कोटी २५ लाख पैकी ३१ कोटी ५ लाख ५१ हजार, लाखनीमध्ये ३७ कोटी ४६ लाख पैकी ३६ कोटी ९४ लाख १२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. कर्ज उद्दिष्टपूर्तीत राज्यात ही एकमेव बॅंक ठरली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com