भंडारदरा धरण दहा दिवस आधीच भरले

भंडारदरा धरणातील साठा
भंडारदरा धरणातील साठा

नगर  : धोधो पडणारा पाऊस व सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून खळाळणारे, ओढे-नाल्यातून वेगाने वाहणारे पाणी शेंडी (ता. अकोले) येथील भंडारदरा धरणात येत आहे. पाटबंधारे विभागाने धरण भरल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केलेले नसले तरी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विचार करता यंदा साधारण दहा दिवस आधीच भरले आहे. मात्र ३१ जुलैपर्यंत धरणातील पाणीपातळी ९.१७ टीएमसीवर स्थिर ठेवणार आहेत. त्यानंतर धरण भरल्याचे पाटबंधारे विभागाकडून तांत्रिकदृष्ट्या जाहीर केले जाईल.

अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात सध्याही जोरदार पाऊस कोसळत आहे. भंडारदरा धरणही दहा दिवस आधी भरत असल्याने जायकवाडीत पाणी साठवणीसाठी फायदा होणार आहे. या धरणात सध्या दर दिवसाला साधारण अर्धा टीएमसी पाणी येत आहे. सोमवारी (ता.२३) सकाळी धरणाच्या ‘स्पिल-वे’मधून प्रवरा नदीत ११ हजार ६३६ क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात होता. दुपारी तो कमी करून ८३६२ क्‍युसेक केला आहे.

नाशिक, ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आणि सह्याद्री डोंगराच्या कपारीत असलेल्या भंडारदरा धरणाचा नगर जिल्ह्यातील शेतीला लाभ होतो. धरण भरल्यावर त्यातील पाणी जायकवाडीसाठी सोडले जाते. त्यामुळे नगरसह मराठवाड्यातील लोकांचे या धरणातील पाणीसाठ्याकडे लक्ष असते. दरवर्षी साधारण १५ ऑगस्टपर्यंत हे धरण निश्‍चित भरते. यंदा नगर जिल्ह्याच्या अनेक भागात पुरेसा पाऊस नसला तरी भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने दहा दिवस आधीच (२१ जुलैला) धरणाच्या ‘स्पिल-वे’मधून मोठा विसर्ग सुरू केल्याने हे धरण भरल्याचे स्पष्ट झाले.

११.०३ टीएमसी एकूण क्षमता असलेल्या भंडारदरा धरणामध्ये ३१ जुलैपर्यंत ९.१७ टीएमसीवर पाणीपातळी स्थिर ठेवली जाणार असून त्यानंतर धरण भरल्याचे तांत्रिकदृट्या जाहीर केले जाणार आहे. असे असले तरी आतापर्यंत धरणातून दीड टीएमसीपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग झालेला आहे.

भंडारदरा धरण ३० वर्षांत २५ वेळा भरले भंडारदरा धरण गेल्या तीस वर्षांत आतापर्यंत २५ वेळा भरले. १९८७, १९८९, १९९५, २०००, २०१५ या वर्षी मात्र धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यातही जुलै महिन्यात धरण भरण्याची ही तिसरी वेळ आहे. पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन धरणातील पाणीपातळी स्थिर ठेवली जाते.

भंडारदरा परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भातखाचरे तुडुंब भरली आहेत. सर्वत्र पाणी वाहत आहे. त्यामुळे परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. धरण परिसर आणि आजूबाजूचे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. यंदा धरण लवकर भरल्याने यापुढे सुट्यांच्या काळात पर्यटकांची अधिक गर्दी असेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com