`दहा गावांमध्ये दुःखाचा महापूर...
`दहा गावांमध्ये दुःखाचा महापूर...

दहा गावांमध्ये दुःखाचा महापूर...

भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमधील अग्निकाडांत विविध गावांतील दहा नवजात शिशूंचा मृत्यू झाल्याने या गावांमध्ये दुःखाचा महापूर आला आहे.

नागपूर ः भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमधील अग्निकाडांत विविध गावांतील दहा नवजात शिशूंचा मृत्यू झाल्याने या गावांमध्ये दुःखाचा महापूर आला आहे. रुग्णालय प्रशासनाने काही तासांच्या आतच पालकांच्या हातात दोन ते तीन दिवसांच्या नवजात शिशूंचे मृतदेह दिले. हे शव घेऊन जाताना प्रत्येकाचे डोळे अश्रूंनी डबडबले होते.  एकाच वेळी दोन, तीन नव्हे तर दहा बाळांचे मृतदेह पिवळसर कपड्यात लपेटून पालकांच्या स्वाधीन केले. हे दृश्य बघून येथील उपस्थितांचाही बांध फुटला. थरथरत्या हातात आपापल्या चिमुकल्यांचे मृतदेह घेऊन रुग्णवाहिकांमध्ये बसत असताना पीडितांचा आक्रोशाने मन हेलावून गेले. रुग्णवाहिका नजरेआड होईपर्यंत रुग्णालय परिसरात जमलेल्या त्या गर्दीच्या नजरा दूर झाल्या नाही. 

धीर देण्यासाठी गाव जमा  भोजपूर टोली सोनझरी वस्तीतील गीता विश्वनाथ बेहरे यांच्या दोन महिन्याच्या लेकीचा आगीत होरपळून मृत्यू झाला. कमी वजन असल्याने बाळाला अतिदक्षता विभागात ठेवले होते. ती बरी होत असल्याने आता लेकीच्या बारशाचे वेध वडिलांना लागले होते. आई गीता बाळाला पाजण्यासाठी रोज रुग्णालयात जात होती. आज बाळाला पाजून आल्यानंतर काही तासांमध्येच लेकीच्या मृत्यूची वार्ता आली. एकुलती एक लेक दगावल्याने सारे कुटुंब शोकाकुल झाले. टोलीला भेट दिली असता, चिमुकलीच्या आई वडिलांना धीर देण्यासाठी गाव जमा झाला होता. वस्तीत स्मशान शांतता होती. येथील वातावरण निःशब्द होते. घरासमोर गर्दी होती, परंतु कोणीही एकमेकांशी संवाद साधत नव्हते. साऱ्यांच्या डोळे डबडबले होते. आई गीताशी संवाद साधण्याचा प्रयत्न करताच तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. 

दहा गावांवर शोककळा  हीच स्थिती साकोली जिल्ह्यातील उसगावात होती. येथील हिरकन्या हिरालाल भानारकर यांची काही दिवसांची मुलगी अग्निकांडात होरपळली. श्रीनगर पहेला गावातील योगिता विकेश धुळसे यांच्या मुलाची जीव गेला. त्यांचेही पहिलेच बाळ होते. जांब तालुक्यातील मोहाडी गावातील प्रियंका जयंत बसेशंकर, गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनीतील सुषमा पंढरी भंडारी, टाकला येथील दुर्गा विशाल रहांगडाले, उसरला येथील सुकेशिनी धर्मपाल आगरे, सितेसारा आलेसूर येथील कविता बारेलाल कुंभारे, रावणवाडी येथील वंदना मोहन सिडाम या सर्वांनी त्यांचे कन्यारत्न गमावले. 

अनाथ जीव दगावला  ज्याचे कोणी नाही, त्याच्यावर कोणाची तरी सावली असते. चार दिवसांपूर्वी भंडारा शहरात एका उच्चभ्रू वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यावर एका युवकाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात कापडात गुंडाळलेला हा जीव दिसला होता. पोलिसांच्या मदतीने बाळाला भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णालयात दाखल केले. मात्र या अनाथ लेकराचे आयुष्य क्षणभंगूर ठरले. अग्निकांडात होरपळून मृत्यू झालेल्या नऊ मुलींमध्ये हा एकमेव मुलगा होता. या मुलाच्या माता-पित्याचा शोध पोलिस घेत होते. जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत या चिमुकल्याची ओळख पटली नाही. यामुळे रुग्णालयाच्या नोंदवहीत त्याच्या मृत्यूची नोंद ‘अज्ञात’ अशी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com