आज शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’

अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आज (ता.८) दुपारपर्यंत `देशव्यापी बंद`ची हाक दिली आहे.
farmers agitation
farmers agitation

पुणे : मोदी सरकारने मंजूर केलेले तीनही कृषी आणि पणन कायदे रद्द करावेत तसेच शेतमालाला कायदेशीरपणे किमान हमीभाव (एमएसपी) मिळावा, या मागणीसाठी अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आज (ता.८) दुपारपर्यंत `देशव्यापी बंद`ची हाक दिली आहे. या `बंद`ला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीसह देशातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष, शेतकरी, कामगार, व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. `बंद`मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. 

‘‘केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी शेतकरी व शेतमजुरांच्या संघटना कडकडीत `बंद` पाळणार आहे. समाजातील सर्व संघटना व राजकीय पक्षांनी यात उतरावे,’’ असे आवाहन भारतीय किसान सभेचे प्रवक्ते डॉ.अजित नवले यांनी केले आहे. "महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईडस् सीडस् डिलर्स (माफदा) असोसिएशनच्या ५० हजार सभासदांनी `बंद`ला पाठिंबा दिला आहे," असे 'माफदा'चे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले.   कडकडीत `बंद` पाळून संताप व्यक्त करू केंद्राने आणलेल्या तीन कृषी आणि पणन विरोधी कायद्याच्या विरोधात दिल्लीत लाखो शेतकरी गेल्या बारा दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. सरकार केवळ चर्चा करीत असून ठोस निर्णय घेतलेला नाही. राज्यातील शेतकऱ्यांना उत्तर भारतातील सीमांवरून पिटाळण्यात आले. त्यामुळे आजचा `बंद` कडकडीत पाळून शेतकरी आपला संताप व्यक्त करतील, असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. मात्र, या `बंद`मध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना सहभागी होत नसल्याचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी जाहीर केले आहे. कायदे रद्द न करता त्यात दुरुस्ती करावी, असे घनवट यांचे म्हणणे आहे.  काही शेतकरी संघटनांनी `बंद` काळात शेतमाल व कृषी संबंधित मालाची वाहतूक रोखण्याचेही घोषित केले आहे. त्यामुळे राज्यभर आज भाजीपाला, फळे, दूध याचा पुरवठा विस्कळित होण्याची शक्यता आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, लातूर, औरंगाबादसह सर्व बाजार समित्या कडकडीत `बंद` राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील बाजार समित्यांमधील व्यापारी, आडते, माथाडी कामगारांचा पाठिंबा आजच्या `बंद`ला आहे. त्यामुळे एकाही बाजार समितीत लिलाव होणार नाही, असे चित्र आहे.  भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेससह माकप, भाकप, समाजवादी पार्टी, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने `बंद`मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष शेतकऱ्यांसाठी एकत्र आले आहेत. अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली २६० शेतकरी संघटनांचा सहभाग या `बंद`मध्ये आहे. कामगार संघटनांनी `बंद`ला पाठिंबा दिला आहे.  राज्यातील बॅंका, औद्योगिक वसाहती, व्यावसायिक संस्था, छोटे-मध्यम व मोठ्या उद्योगांमधील कामकाज ठप्प होईल, अशी अटकळ आहे.

शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार आजच्या `बंद`मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यभर सहभागी होत आहे. तसेच, पक्ष नेते शरद पवार यांनी देशातील विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ उद्या (ता.९) राष्ट्रपतींकडे नेण्याची तयारी सुरू केली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी `बंद`मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देशासाठी राबणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांच्या `बंद`ला जनतेने पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने `बंद`मध्ये सहभागी व्हावे, अशी साद राऊत यांनी घातली आहे.  पोलिस बंदोबस्तात राज्यभर वाढ `बंद`च्या निमित्ताने आज राज्यात ठिकठिकाणी विविध पक्ष व संघटनांना निषेध मोर्चे, चक्काजाम, धरणे आंदोलनाचे कार्यक्रम जाहीर केले आहेत. यामुळे राज्यातील सर्व बाजार समित्या, ग्रामविकास तसेच कृषी संबंधित शासकीय कार्यालयांमधील सेवा विस्कळित होण्याची चिन्हे आहेत. `बंद` काळात अनुचित प्रकार होवू नये यासाठी मध्यरात्रीपासूनच पोलिस बंदोबस्तात वाढविण्यात आला. रेल्वे स्थानके, बसस्थानके तसेच प्रमुख बाजार समित्यांच्या आवारासमोर गस्त वाढविण्यात आली आहे. `बंद`ला यांचा पाठिंबा

  • राजकीय पक्ष ः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, नॅशनल कॉन्फरन्स, सीपीआय (एम), सीपीआय (एमएल), आरएसपी, डीएमके, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, सीपीआय, एआयएफबी.
  • राज्यातील शेतकरी संघटनांचा `बंद`ला पाठिंबा
  • बाजारसमित्या, उद्योग, कारखाने `बंद` ठेवण्याची तयारी
  • व्यापारी, आडते, माथाडी कामगारांचा पाठिंबा
  • `माफदा`च्या ५० हजार सभासदांचा `बंद`ला पाठिंबा. 
  • सरकारी कार्यालये, औद्योगिक कामांवर परिणाम शक्य
  • प्रतिक्रिया `बंद`मधून अत्यावश्यक सेवा वगळली आहे. आम्ही `बंद` शांततेत पाळू. बळिराजाचे आयुष्य धुळीला मिळवणाऱ्या केंद्रीय कायद्यांच्या विरोधात सर्व शेतकरी एकत्र आले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी जनतेने स्वतःहून `बंद` पाळावा अशी आमची विनंती आहे. - राजू शेट्टी,  अध्यक्ष, `स्वाभिमानी`

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com