मातीचं सोनं करणारे भवरलाल जैन...

मातीचं सोनं करणारे भवरलाल जैन...
मातीचं सोनं करणारे भवरलाल जैन...

“बळीवंत आम्ही, मातीतला दास धरलेली कास, मरणाची” प्रसिद्ध साहित्यिक श्रीकांत देशमुख यांच्या कवितेतील या ओळींमध्ये‘शेतकऱ्यांचा जन्मही मातीत झाला. मातीचा दास म्हणून सेवा करतो आणि मृत्यूही मातीतच होतो. ही जीवनरीत उत्कटतेने व्यक्त होते. याप्रमाणेच डॉ. भवरलाल जैन तथा मोठेभाऊ यांनी जळगाव जिल्ह्यातील वाकोदसारख्या छोट्याशा गावातून शेतीच्या माध्यमातून अवघ्या ब्रह्मांडाला गवसणी घातली. मातीतून सोने उगविणाऱ्या मोठ्याभाऊंनी मातीचेच सोने केले. कृषिक्षेत्रात विविध प्रयोग, संशोधन करीत असताना ‘शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू' यावे हिच त्यांची आंतरिक इच्छा आणि तळमळ होती. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून कृषिक्षेत्राची कास धरत आदर्श कार्यसंस्कृतीच्या आगळ्यावेगळ्या श्रमसंस्कारासह जैन इरिगेशनचा विस्तार सातासमुद्रापार केला. २५ फेब्रुवारीला त्यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांना अभिवादन... डॉ  भवरलाल जैन यांनी मातृप्रेरणेतून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जैन इरिगेशनची मुहूर्तमेढ रोवली. रॉकेलचा व्यापारापासून सुरवात झालेला प्रवास पपईच्या चिकापासून पपेनची निर्मिती, पीव्हीसी पाईप, ठिबक तुषार सिंचन, बायो एनर्जी, सौर कृषी पंप असा सगळा प्रवास विलक्षणच. मनुष्य, प्राणी, वनस्पती, हवा, निसर्ग या सर्वांना सांभाळून समाजाच्या प्रत्येक घटकांशी बांधीलकी जोपासत सर्वसमावेशक विकास साधण्याची किमया कर्मयोगी मोठ्याभाऊंनी केली. भारतीय संस्कारातील मूल्यांना आधुनिकतेची जोड देत मोठ्याभाऊंनी जैन इरिगेशनमधील सहकाऱ्यांना कठोर परिश्रमाची शिकवण दिली. कठोर परिश्रम, संशोधन अन्‌ गुणवत्तेच्या जोरावर जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचे जीवनमान समृद्ध करणाऱ्या भूमिपुत्रांच्या हिताचा विचार हाच त्यांचा ध्यास होता. मोठ्याभाऊंनी दूरदृष्टीतून शेती, शेतीपूरक उद्योग, जैन हिल्सवरील पाणलोट क्षेत्र, गिरणा नदीवरील कांताई बंधाऱ्यासह उजाड टेकड्यांवर हिरवाई, वनराई फुलवली. ‘हिरवाईने नटलेली माझी सृष्टी हेच माझे वैभव आहे!’ असे म्हणणाऱ्या कर्मयोगी मोठ्याभाऊंचे नाते मातीच्या माध्यमांतून ब्रह्मांडाशी होते. ब्रह्मांडातील तेजस्वी, तपस्वी अवघे विश्व प्रकाशमय करणाऱ्या सूर्याप्रमाणे असलेले मोठ्याभाऊंचे कार्य, विचार, संस्कार, आजही जैन कुटुंबीय व सहकारी जपत आहेत. पाणी, वीज, सूर्य शक्तीचे महत्त्व भाऊंनी ओळखले. भाऊंनी सौर ऊर्जेवर चालणारा कृषी पंप जैन इरिगेशनच्या शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांकडून तयार करून घेतला. यामुळे दुर्गम भागातही अल्पभूधारक शेतकऱ्यांना आपल्या शेतात फळबागा फुलविता आल्यात. सर्वसामान्य शेतकरी जर मोठा झाला तरच मी मोठा होईल, ही व्यापक भूमिका त्यांनी मनाशी पक्की बांधली होती. आर्थिकदृष्ट्या शेतकरी मजबूत व्हावा यासाठी फळप्रक्रिया उद्योग उभारले. पांढऱ्या कांद्याच्या माध्यमातून करार शेतीचे पथदर्शी मॉडेल भाऊनी मांडले. गुणवत्ता, विश्वास आणि पारदर्शकता या जीवनमूल्यांचा आदर्श पेरत करार शेतीच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यात भाऊंचा सिंहाचा वाटा आहे.उतीसंवर्धनात बायोटेक्नॉलॉजीचे महत्त्व ओळखून सर्वात मोठी लॅब भाऊंनी उभारली. टिश्युकल्चर केळीच्या ग्रॅण्ड नाईन या व्हरायटीने शेतकऱ्यांचे जीवनमान बदलून गेले. यासह डाळिंब, स्ट्रॉबेरी, मोसंबी टिश्युकल्चर रोपांमुळे   शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग गवसला. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान, संशोधनाची माहिती व्हावी, यासाठी जैन हिल्स येथे जैन गुरुकुल प्रशिक्षण केंद्र, तालुका स्तरावर कृषितज्ज्ञ, कृषी विद्यापीठांशी करार, ‘भूमिपुत्र’ आणि ‘कृषितिर्थ’ हे कृषिक्षेत्राला वाहिलेले मासिके भाऊंच्या प्रेरणेतून सुरू आहेत. शेती, शेतकऱ्यांप्रती भाऊंचे असलेले प्रेम, जिव्हाळा, आपुलकी दिसते. विद्येला विनयाची, साधनेला सातत्याची, विचाराला आचाराची, श्रद्धेला बुद्धीची, सुखाला शांतीची, संकल्पाला सिद्धीची, सौंदर्याला शालीनतेची आणि प्रतिष्ठेला सेवेची साथ-संगत लाभते तेव्हाच पद्मश्री डॉ.भवरलाल जैन यांच्यासारखे कृतज्ञ भूमिपुत्र घडतात. त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. - देवेंद्र पंढरीनाथ पाटील मीडीया विभाग, जैन इरिगेशन सिस्टीम्स,जळगांव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com