भीमा नदीचे पात्र पडले कोरडे

भीमा नदीचे पात्र कोरडे पडले आहे
भीमा नदीचे पात्र कोरडे पडले आहे

कडूस, जि. पुणे  ः कडूस (ता. खेड) परिसरातील भीमा नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे ठणठणीत पडले आहे. यामुळे भीमेच्या पाण्यावर अवलंबून असलेली परिसरातील सुमारे अडीच हजार एकर शेती व नदीकाठच्या गावांच्या पाणी योजना धोक्‍यात आल्या आहेत. चारा पिकांबरोबरच जनावरांना पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळणे मुश्‍कील झाल्याने उन्हाळ्याची दाहकता प्रकर्षाने जाणवू लागली आहे.

मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. यामुळे कडूस आणि परिसराला फेब्रुवारी महिन्यातच शेतीसाठी पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली. चासकमान धरण अस्तित्वात नसतानाही कडूसच्या डांगले शिवारालगतच्या भीमा नदी पात्रातील बेडक्‍या डोहातील पाणी कधीच आटत नव्हते, परंतु यंदा एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच येथील पात्र कोरडे ठणठणीत पडले आहे. याचा परिणाम भीमानदी काठालगतच्या शेती शिवारावर व जनजीवनावर झाला आहे.

भीमेचे पात्र कोरडे पडल्याने भीमेच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेतातील चारा पिके व टोकेवाडी, गोलापूर, आगरमाथा, सायगाव, वेताळे, दोंदे, वडगाव, राजगुरूनगर, चांडोली या नदीकाठच्या गावांच्या व वाड्या-वस्त्यांच्या पाणी योजना धोक्‍यात आल्या आहेत. जनावरांच्या पाण्यासह नागरिकांना पिण्याच्या तसेच दैनंदिन वापराच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे.

बेडक्‍या डोह आटला  परिसरातील सुमारे दोन ते अडीच हजार हेक्‍टर शेती बेडक्‍या डोहातील पाण्यावर अवलंबून आहे. पात्रात खडखडाट झाल्याने ही पिके जळू लागली आहेत. जनावरांचे पाण्यावाचून हाल होऊ लागले आहेत. हिवाळी हंगामात चासकमान धरणातून शिरूर तालुक्‍यासाठी सलग शंभर दिवसाच्या आवर्तनाद्वारे पाणी सोडण्यात आले होते, या वेळी धरणातील पाणीसाठा वेगाने कमी झाला होता. सलग शंभर दिवसांच्या एकाच आवर्तनाऐवजी पंचेचाळीस दिवसांची दोन आवर्तने दहा दिवसांचे अंतर ठेवून केली असती तर सध्याची पाणी समस्या महिनाभर लांबवता आली असती, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शेतकऱ्यांना व जनावरांना सोसावा लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com