पुण्यात भीमथडी जत्रेस प्रारंभ

Bhimathadi Jatres started; A feast of tradisional food
Bhimathadi Jatres started; A feast of tradisional food

पुणे ः अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने पुणे कृषी महाविद्यालय मैदान, सिंचननगर (रेंजहिल कॉर्नर) येथे भीमथडी जत्रेस बुधवार (ता. १८) पासून सुरुवात झाली आहे.

या जत्रेचे विठ्ठल-रुख्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगाव, संत नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास, देहू संस्थानचे अघ्यक्ष मधुकर महाराज मोरे, संत एकनाथ महाराजांचे वंशज योगेश पालखीवाले, संत ज्ञानेश्वर महाराजांचे वंशज कृष्णराव चोपदार यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. तर या वेळी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, भीमथडीचे आयोजक सुनंदा पवार, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्ष अर्चना घारे आदी उपस्थित होते.

भीमथडी जत्रा मागील तेरा वर्षांपासून पुण्यात अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संस्थेच्या वतीने भरवली जाते. या वर्षीदेखील ग्रामीण संस्कृती व शहरांचा साधलेला एक संवाद म्हणून भीमथडी जत्रा नावारूपाला आली आहे. शंभर वर्षांपूर्वीचे खेडे कसे होते. त्यांचे जिवंत चित्रण मागील आठ भीमथडी जत्रेत दाखविण्यात आले. 

या वर्षी पिंगळा, वासुदेव, ज्योतिषी, नंदीबैल, कुंभार, बुरूड, जागरण, गोंधळी, पोतराज, मरीआईचे भक्त, आदिवासी कला, तारफा, सनई चौघडा, अशा अनेक कला व कलाकारांचा सहभाग आहे. तसेच, ग्रामीण भागातील खाद्य परंपरा शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही प्रकारचे स्टॉल आहेत. घुट हुलग्याचे माडगे, मांडे, धपाटे, मोदक, पुरणपोळी, पिठलं-भाकरी अशा भीमथडी स्पेशल गावरान जेवणाचा तडका अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी दिली.

या वर्षीच्या भीमथडी जत्रेतील आकर्षण ः  महाराष्ट्राची संस्कृती म्हणून जगभर पंढरपूरची वारी प्रसिद्ध आहे. या संस्कृतीचे संवर्धन म्हणून भीमथडीमध्ये वारीच्या संकल्पनेचा विचार करण्यात आला. निष्ठेची, सेवेची, श्रद्धेची, कला, संस्कृती, अध्यात्माचे दर्शन व्हावे, या उद्देशाने पंढरीच्या वारीच्या माहिती प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

भीमथडीमध्ये काय पाहता येणार ः भीमथडी सिलेक्ट ः देशभरातील पारंपरिक कारागिरांनी बनविलेल्या हातमाग कापड, हस्तकला वस्तू, ग्रामीण कलाकार यांनी बनविलेल्या अनेक नावीन्यपूर्ण वस्तूंचे अनेक स्टॉल आहेत. भीमथडी आॅरगॅनिक ः पश्चिम घाटातील मध, तांदूळ, कडधान्य, गावरान धान्य, सेंद्रिय पद्धतीने पिकविलेली फळे व भाजीपाला, फळ प्रक्रिया केलेले पदार्थ आहेत.  खाद्य महोत्सव ः शाकाहारी जेवणासह हुलग्याचे माडगे, पिठलं-भाकरी, मांडे, जळगावचं भरीत-भाकरी असे अनेक गावरान पदार्थ या जत्रेत उपलब्ध आहेत. मांसाहारी जेवण ः ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनविलेले चुलीवरचे मटण, चिकन, मासे असे पदार्थ उपलब्ध आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com