परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
अॅग्रो विशेष
भिवापुरी मिरची संकटात
विदर्भातील संत्रा देशात जसा प्रसिद्ध आहे, तशीच भिवापूरची मिरचीही जगप्रसिद्ध आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, उमरेड, कुही या तालुक्यांत मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
नागपूर : विदर्भातील संत्रा देशात जसा प्रसिद्ध आहे, तशीच भिवापूरची मिरचीही जगप्रसिद्ध आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, उमरेड, कुही या तालुक्यांत मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र आजघडीला जिल्ह्यात खरीप हंगामात केवळ दीडशे ते दोनशे हेक्टरवरच मिरचीची लागवड होत आहे. यासाठी शेतकरी पारंपरिक पद्धतीप्रमाणे दरवर्षी बियाणे साठवून ठेवत असतात. मात्र हायब्रीड मिरचीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने शेतकरी आता या मिरची लागवडीला पसंती देत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. यामुळे भिवापुरी मिरचीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
जगात मान्यता असलेल्या भिवापुरी मिरचीचे लागवड क्षेत्र सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात होते. परंतु पारंपरिक लागवड आणि कीड-रोगामुळे मिरचीचे उत्पादन व क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. यावर शासन व कृषी शास्त्रज्ञ गंभीर असून, भिवापुरी मिरची ‘जीआय टॅग’ (भौगोलिक मानांकन) प्राप्त आहे. या मिरचीचे उत्पादन व क्षेत्र वाढविण्यासंबंधात नागपुरातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत संशोधन करण्यात येत आहे.
काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी हायब्रीड मिरचीच्या लागवडीकडे कल केल्यामुळे भिवापुरी मिरचीचे क्षेत्र आपसूकच घटत चालले आहे. याचे कारण म्हणजे संकरित (हायब्रीड) मिरचीच्या उत्पादनाच्या तुलनेत भिवापुरी मिरचीचे उत्पादन घटत चालले आहे. आजही भिवापुरी मिरचीला पूर्वीप्रमाणेच मागणी आहे. परंतु उत्पादनच कमी असल्यामुळे नागरिक हायब्रीड मिरची खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे.
भिवापुरी मिरचीची उत्पादकता वाढविण्यासाठी चांगले बियाणे निर्माण करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू आहे. यासाठी कृषी विद्यापीठाच्या वतीने महाराजबाग स्थित परिसरातील बागेमध्ये प्लॉट (लागवड) तयार करून त्यावर संशोधन सुरू आहे.
पुढील दोन वर्षांनंतर या मिरचीचे शेतकऱ्यांच्या शेतावरही प्लॉट टाकून तेथे थोड्या जागेवर लागवड करण्यात येणार आहे. याशिवाय मिरचीच्या लागवडीसाठी त्याचे अनन्य साधारण महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
भिवापुरी मिरची जगभर प्रसिद्ध आहे. परंतु ‘खर्च अधिक व उत्पादन क्षमता कमी’ यामुळे शेतकऱ्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली आहे. या मिरचीची उत्पादन क्षमता व गुणवत्ता वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून भिवापुरी मिरचीवर संशोधनाची गरज असल्याचे सुधीर पारवे यांनी कृषिमंत्री भुसे यांना पटवून देत सोबतच मिरचीवर प्रक्रिया करणारे मोठे उद्योग स्थापन करण्याची आवश्यकता विशद केली.
तीन-चार वर्षांत याचे परिणाम दिसून येतील
विद्यापीठाच्या वतीने संशोधन करण्यात येत असून, लवकरच चांगले परिणामही दिसून येतील. चांगले परिणाम दिसून येताच शेतकरी हायब्रीड मिरची सोडून भिवापुरी मिरचीच्या लागवडीकडे वळतील. तीन-चार वर्षांत याचे परिणाम दिसून येतील. यामुळे त्यांना चांगले अर्थार्जनही होईल, असा विश्वास विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई यांनी व्यक्त केला आहे.
प्रतिक्रिया
संकरित मिरचीच्या तुलनेत भिवापुरी मिरचीचे उत्पादन निश्चितच कमी असल्याने शेतकरी आता भिवापुरी मिरचीची लागवड करण्यासाठी इच्छुक नाहीत. या मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु ‘जीआय टॅग’ असलेल्या विदर्भातील या मिरचीची लुप्त होत चाललेली ओळख वाचविण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने संशोधन करण्यात येत आहे.
- डॉ. डी. एम. पंचभाई, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, नागपूर
- 1 of 674
- ››