चार वर्षांमध्ये एकदा तरी ‘हळद पिवळे करून जातेय’, अशी एक म्हण शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे.
अॅग्रो विशेष
सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतील भूपिंदरसिंग मान यांचा राजीनामा; सरकार दबावात
सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांबाबत स्थापन केलेल्या समितीच्या सदस्यपदाचा भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपिंदरसिंग मान यांनी गुरुवारी (ता. १४) राजीनामा दिला.
नवी दिल्ली ः सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांबाबत स्थापन केलेल्या समितीच्या सदस्यपदाचा भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपिंदरसिंग मान यांनी गुरुवारी (ता. १४) राजीनामा दिला. शेतकरी नेत्यांनी समिती सरकार धार्जिणी असल्याचा आरोप करत समितीसमोर जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे समितीचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात आज (ता. १५) चर्चेची नववी फेरी होणार आहे.
भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपिंदरसिंग मान यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीचे सदस्यत्व सोडले आहे. समितीवर त्यांची निवड केल्याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. ‘‘केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांविषयी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या चार सदस्यीय समितीत माझी निवड केल्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो.
मी स्वतः एक शेतकरी आणि संघटनेचा नेता आहे. त्यामुळे सध्या शेतकरी संघटना आणि सामान्य नागरिकांच्या मनातील भीती आणि भावना लक्षात घेऊन मी देशातील शेतकरी आणि पंजाबसाठी कोणतेही दिलेले किंवा देऊ केलेल्या पदाचा त्याग करण्यास तयार आहे. त्यामुळे समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. मी सदैव शेतकरी आणि पंजाबसोबत उभा राहीन,’’ असे मान यांनी म्हटले आहे.
आजच्या बैठकीकडे लक्ष
सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन करून केलेली मध्यस्थी आणि मान यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर आज (ता. १५) शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात नववी बैठक होत आहे. यात बैठकीत शेतकरी नेते काही मुद्द्यांवर सहमती दाखवत आंदोलन मागे घेतात की कायदे रद्द करण्याच्या आपल्या मागण्यांवर ठाम राहणार आणि सरकार शेतकऱ्यांसमोर वाटाघाटीसाठी कोणते पर्याय ठेवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे केवळ देशाचेच नाही तर जगाचे लक्ष लागून आहे.