भूषा विकासापासून कोसो दूर

भूषा विकासापासून कोसो दूर
भूषा विकासापासून कोसो दूर

भूषा , जि. नंदुरबार ः दिवस सोमवारचा (ता. १ ऑक्‍टोबर). वेळ सकाळी साडेसहाची. युवक, युवती, कच्चा रस्ता तुडवत गावातून येत होते. काही जण पशुधन चराईसाठी घेऊन जाताना दिसले. नर्मदा नदीनजीक एका झोपडीसमोर चिमुकले खेळत होती. त्यांचे कपडे मळके, फाटके. लागलीच बच्चेकंपनी झोपडीत गेली. एक चिमुकली घरातून डोकावून पाहत होती. त्यांच्या हलाखीच्या स्थितीची पदोपदी जाणीव होत होती. अर्थातच भूषा गावची ही स्थिती विकास, डिजिटलायझेशनचे दावे या संदर्भात प्रश्‍नचिन्हच जणू उपस्थित करीत होती.  आदिवासीबहुल भूषा (ता. धडगाव) नंदुरबारपासून सुमारे १६० किलोमीटवर आहे. गुजरातमधील नर्मदा नदीवरील सरदार सरोवरबाधित गाव असल्याने अनेकांचे स्थलांतर झाले. ज्यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्या, त्यांचे रेवानगर (ता. तळोदा) येथे पुनर्वसन झाले. आता गावात ४० ते ५० जण आहेत. हातपंप व काही सोलर दिवे झोपड्यांसमोर दिसतात. गावाच्या आजूबाजूला सातपुडा पर्वताच्या उत्तुंग रांगा. उदय व नर्मदा नदीचा संगम येथेच आहे. नर्मदा नदीपलीकडे मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशातील अलिराजपूर जिल्ह्यातगल काही गावे नर्मदा नदीच्या पलीकडे आहेत. गावात जेमतेम १२ झोपडीवजा घरे दिसली. आपापल्या शेतात सर्वांचे वास्तव्य.  नर्मदेत नाव वल्हवत एक गृहस्थ आला. त्याला मराठी भाषा फारशी समजत नव्हती. जत्या पुट्या पावरा, असे नाव त्याने सांगितले. तो म्हणाला, ‘‘मी सावऱ्या दिगर गावचा. मासेमारी करतो. सात मुले आहेत. शेती दोन एकर. कापसाचीही लागवड करतो. कापूस विकायला शहादा (जि. नंदुरबार) येथे जावे लागते.’’ मग त्याची मासेमारीची लगबग सुरू झाली. तीन जण एक बोट घेऊन नर्मदा नदीकडून आले.  पैकी एकाने आपले नाव वसंत पावरा सांगितले. तो म्हणाला, ‘‘माझी जमीन सरदार सरोवरच्या बुडीत क्षेत्रात गेली. मी भूषा गावचाच रहिवासी. मी स्थलांतर केले नाही. या बोटीवर मला चालक म्हणून शासनाने नेमले आहे. नर्मदेच्या पलीकडे मध्य प्रदेशातील अलिराजपूर जिल्ह्यातील आंबाडा, डुखुडा, सकरजा, अंजनबारा, बिचाडा या गावांमधील काही जण मासेमारीसाठी नर्मदेवर येतात. जगण्यापुरते कमवून घेतो.’’  नर्मदा नदीत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत तरंगता दवाखाना दिसला. तो बंद होता. आठवड्यातून दोन-तीनदा हा दवाखाना सुरू असतो. अंगणवाडी सेविका व इतर कर्मचारी या दवाखान्यात भेटतात, असे या कुटुंबीयांनी सांगितले.  रस्ता आणि वीज पोचली नाही  मग नर्मदा काठावर वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली. महिलांना मराठी समजत नव्हती. त्या आपल्या मायबोलीत (आदिवासी बोली) बोलत होत्या. त्यांचे घर कौलारू.  युवकाला मराठी बऱ्यापैकी समजत होती. त्याने आपले नाव सागर सांगितले. तो म्हणाला, गावात अजून पक्का (डांबरी) रस्ता नाही. आम्ही  नदीतूनच पाणी आणतो. दोन एकर शेती आहे. आम्हाला जमिनीचा पट्टा मिळाला नाही.  त्याचे वडील रेवान्या टिड्या पावरा. त्यांनाही मराठीतून फारसे कळत नव्हते. ते म्हणाले, ‘‘आमच्या  गावात वीज आलेली नाही. आमची कोरडवाहू शेती आहे. ज्वारी, मका, तूर ही पिके घेतो. पशुधन आहे. पावसाळ्यातच पिके येतात. जमिनीमुळे गाव सोडत नाही.’’  ना रेंज ना मोबाईल गावात एका टेकडीवर आरोग्य केंद्र आहे. त्याची दैनावस्था झालेली. गावात एकच किराणा दुकान. संचालक जितेंद्र म्हणाला, ‘‘मी माळ या गावचा. १२ वीत शिक्षण घेत आहे. येथे व्यवसाय करतो. सायंकाळी निघून जातो.’’ मग विनोद वसावा भेटले. म्हणाले, ‘‘मी नर्मदा विकास प्राधिकरणच्या बोटवर चालक आहे. जेव्हा साहेब येतात तेव्हा त्यांना घेऊन नर्मदा नदीत जातो.  ते केव्हा येतात याची मला माहिती नसते. कोणत्याच दूरसंचार कंपनीचे नेटवर्क नाही. माझ्याकडे मोबाईल आहे, पण त्याचा उपयोग नाही. मी मूळचा गुजरातमधील राजपिपला (जि. नर्मदा) गावचा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com