वडनेर बुद्रुक येथे बिबट्याची दहशत

वडनेर बुद्रुक येथे बिबट्याची दहशत
वडनेर बुद्रुक येथे बिबट्याची दहशत

नगर : लघुशंकेसाठी पहाटे साडेपाचच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या वडनेर बुद्रुक (ता. पारनेर) येथील ज्येष्ठ महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्देवी मृत्यू झाला. राधाबाई कारभारी वाजे (वय ६९) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. घरापासून अगदी दोनशे फुटांवर त्यांच्यावर हल्ला झाला. 

घरातून बाहेर गेलेली आई बराच वेळ झाला तरी पुन्हा आली नाही म्हणून त्यांचा मुलगा दत्तात्रेय वाजे यांनी बाहेर येऊन त्यांचा शोध घेतला. त्या वेळी दत्तात्रेय यांना घरापासून २०० फूट अंतरावर त्यांचा मृतदेह दिसला. दत्तात्रेय यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली. 

वडनेर बुद्रुक व वाजेवाडी शिवारात गेल्या २५ दिवसांपासून तीन बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यापूर्वी त्या भागातील गणपत येवले, रामभाऊ पवार, भिका येवले, रामदास मेचे, अनिल नऱ्हे, नाना ठोंबरे या शेतकऱ्यांची जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

ग्रामस्थांच्या मागणीवरून या भागात दोन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले. मात्र, बिबटे पकडण्यासाठी वनविभागाने विशेष प्रयत्न केले नसल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. वडनेर व वाजेवाडीसह शिरापूर, म्हस्केवाडी या भागांतही जनावरांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर दहशतीखाली आहे.

यापूर्वी ३ ऑगस्टला परिसरातील शिरापूर येथील द्विग्विजय उचाळे (वय १९) हा युवक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला होता. त्याच्याशी दहा मिनिटे बिबट्याची झटापट सुरू होती. सुर्देवाने आरडाओरडा केल्याने तो वाचला. दरम्यान, ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलिस व वन विभागाचे कर्मचारी पोचले. बिबटे पकडण्यासाठी खास मोहीम हाती घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com