‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हान

दूध दर
दूध दर

पुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला विस्तार पाहून सहकारी व खासगी दूध प्रकल्पचालकांची चिंता वाढली आहे. “अमूलची घोडदौड कशी रोखावी, याचा मार्ग आम्हाला सापडलेला नाही. त्यात पुन्हा डीलर कमिशन हीच एक मोठी डोकेदुखी बनली आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली.  गुजरातमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संघांनी स्थापन केलेला ‘अमूल’ हा डेअरी क्षेत्रातील सर्वांत मोठा काॅर्पोरट ब्रॅंड बनला आहे. ‘अमूल’ची २०१८ मधील उलाढाल ३० हजार कोटींची होती. २०१९ मध्ये ती ३३ हजारांच्या पुढे गेली. यंदा उलाढाल ४० हजार कोटींपर्यंत नेण्याचे आक्रमक उद्दिष्ट ‘अमूल’ने ठेवले आहे.  ग्राहकांकडून मिळवलेल्या एक रुपयांपैकी ८० पैसे शेतकऱ्यांना देण्याचे धोरण अमूलला सतत आघाडीवर ठेवते आहे. राज्यात अलीकडेच खरेदीदर वाढविण्याचे धाडस अमूलने दाखविले. यातून दुधाची पळवापळवी वाढण्याची भीती राज्यातील डेअरीचालकांना वाटते.  “अमूल, मदर डेअरी, पतंजली या ब्रॅंडकडून राज्यातील खासगी व सहकारी अशा दोन्ही डेअरींसमोर आव्हान उभे केले आहे. राजकीय पाठबळ मिळवून या कंपन्या राज्यात पाय पसरत आहेत. त्यात सर्वांत जास्त धोका आम्हाला अमुलचा वाटतो. अमुलसमोर लहान डेअरीचालकांचा अजिबात टिकाव लागणार नाही. त्यामुळे राज्य शासनाने हस्तक्षेप केला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया एका डेअरीचालकाने दिली.  डेअरीक्षेत्रातील अभ्यासकांच्या मते, “शेतकऱ्यांना अमुलने जादा दर देत राज्यात खळबळ उडवून दिली आहे. २९ सीएलआरचेच (करेक्टेडे लॅक्टोमीटर रीडिंग) दूध अमूल स्वीकारते. यात एसएनएफ ८.५ मिळतोच. संकलनात १०० टक्के शीतकरण, उत्पादकांना वाढीव दर देण्याचे धोरण अमूलने ठेवले आहे. राज्यातील छोट्या डेअरीचालकांना अशी सर्व गुणवत्तापूर्ण स्पर्धा करणे परवडत नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.” ‘अमूल’ला टक्कर देता येणार नाही ‘गोकुळ’, ‘चितळे’ अशा काही निवडक डेअरींनी सतत बदलते स्वरूप ठेवत विश्वासार्हता ठेवली आहे. मात्र, बहुतेक ठिकाणी कमी गुणवत्तेचे दूध स्वीकारणे, पावडर टाकणे, शेतकऱ्यांना कमी दर देणे, डीलर कमिशन भरपूर ठेवल्याने पेच तयार झाला आहे. त्यामुळे या स्थितीत आपण ‘अमूल’शी टक्कर देऊ शकत नाही, असेही मत अभ्यासकांनी व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com