कृषिकर्जावर बड्या कंपन्यांचा डल्ला

कृषी उद्योगाच्या क्षेत्रात असलेल्या अनेक बड्या कंपन्या कृषिकर्ज या संवर्गातून कर्ज घेतात. शेतीमालाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायात असणाऱ्या रिलायन्स फ्रेशसारख्या अनेक कंपन्या कृषी उद्योग कंपन्यांच्या वर्गवारीत येतात. त्या कृषिकर्जाच्या नावाखाली गोदामांची बांधणी किंवा तत्सम कारणांसाठी कर्ज घेतात. - किरण कुमार वीसा, संस्थापक, रयतू स्वराज्य वेदिका
कृषिकर्जावर बड्या कंपन्यांचा डल्ला
कृषिकर्जावर बड्या कंपन्यांचा डल्ला

नवी दिल्ली ः एकीकडे शेतकऱ्यांना लाखभर रुपयांचे कर्ज मिळवताना नाकीनऊ येत असताना काही मंडळींच्या बाबतीत मात्र सरकारी बॅँका भलत्याच उदार झाल्याचे उघड झाले आहे. सरकारी बॅंकांनी २०१६ मध्ये देशभरातील केवळ ६१५ खातेदारांना तब्बल ५८ हजार ५६१ कोटी रुपयांचे कृषिकर्ज उदारहस्ते वाटप केले. म्हणजे सरासरी एका खातेदाराच्या वाट्याला जवळपास ९५ कोटींचे कर्ज आले. इतके प्रचंड कर्ज बॅंकांकडून अलगद पदरात पाडून घेणारे हे भाग्यवान शेतकरी कोण, याचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती हाती आली.  बॅंकांनी शेतकऱ्यांच्या नावाखाली चक्क बड्या कंपन्यांना कृषिकर्जाची खैरात केल्याचे स्पष्ट झाले आहे. `दि वायर` या ऑनलाइन न्यूज पोर्टलने या बनवाबनवीचा पर्दाफाश केला आहे.   `दि वायर`ने माहितीच्या अधिकारात भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून मिळवलेल्या माहितीमध्ये कृषिकर्ज वाटपाचे हे वास्तव उघड झाले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी सुलभ पतपुरवठा व्हावा, या हेतूने कमी व्याजदाराने कृषिकर्ज दिले जाते. तसेच या कर्जासाठीच्या अटी आणि निकषही तुलनेने शिथिल असतात. सध्या शेतकऱ्यांना चार टक्के दराने कृषिकर्ज दिले जाते. नेमक्या याच बाबीचा फायदा लाटण्यासाठी बड्या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या नावाखाली स्वस्तात कोट्यवधींची कर्जे पदरात पाडून घेतली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने २०१४-१५ मध्ये कृषिकर्जासाठी ८.५ लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती. २०१८-१९ साठी ती तरतूद ११ लाख कोटींच्या घरात गेली. `दि वायर`ला भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील मोठा हिस्सा शेतकऱ्यांना नव्हे तर कृषी व्यवसाय आणि उद्योगातील बड्या कंपन्यांच्या वाट्याला आला. गोदामे, शीतगृहे उभारणी, ॲग्री क्लिनिक्स आणि ॲग्री बिझनेस सेंटर्सची उभारणी यासारख्या कामांसाठी शंभर कोटी रुपयांपर्यंत कर्ज वाटण्यात आले आहे. प्राधान्य क्षेत्र कर्जपुरवठा धोरणानुसार बॅंकांनी त्यांच्या एकूण कर्जपुरवठ्यापैकी १८ टक्के कर्जपुरवठा कृषी क्षेत्रासाठी करणे बंधनकारक आहे. तसे निर्देश रिझर्व्ह बॅंकेने दिलेले आहेत. परंतु बॅंका त्यातून बड्या कंपन्या आणि कॉर्पोरेट्सना मोठमोठी कर्जे देत असल्याने लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकत नाही. असे निरीक्षण वीसा यांनी नोंदवले.  शेतकऱ्यांच्या नावाखाली बड्या कंपन्यांना स्वस्त दरात कृषिकर्जे देण्याचा हा प्रकार म्हणजे शुद्ध फसवणूक असल्याचे मत कृषी धोरण अभ्यासक डॉ. देवेंद्र शर्मा यांनी व्यक्त केले. ‘‘शंभर-शंभर कोटी रुपयांचे कर्ज मिळत असलेला हा कुठल्या प्रकारचा शेतकरी आहे? हा सगळा देखावा आहे. मुळात शेतकऱ्यांच्या नावाखाली उद्योगांना कर्ज देण्याचे कारणच काय? असे शर्मा म्हणाले. ‘‘ शेतकऱ्यांच्या नावाखाली कंपन्यांना कर्जे वाटण्यात बॅंकांचीही सोय असल्याचे शर्मा यांनी नमूद केले. ते म्हणाले, ``शंभर कोटीचे कर्ज एकाच कंपनीला देणे सोपे आहे. तेच कर्ज जर शेतकऱ्यांना द्यायचे असेल तर त्या कामासाठी कमीत कमी २०० लोकांची आवश्यकता भासेल. मनुष्यबळ वाचवण्यासाठी आणि (प्राधान्य क्षेत्र कर्जपुरवठ्याचे) १८ टक्क्यांचे उद्दिष्ट सहजरीत्या गाठण्यासाठी बॅंका शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांना कर्जे देतात.``   दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनमोहनसिंग सरकारच्या कार्यकाळातही कृषिककर्ज वाटपासाठी हेच धोरण अवलंबण्यात आले होते. २०१५ मध्ये ६०४ खातेदारांना ५२ हजार १४३ कोटी रुपयांचे कृषिकर्ज वाटप करण्यात आले होते. एका खातेदाराच्या वाट्याला सरासरी ८६.३३ कोटी रुपयांचे कर्ज आले होते.   कृषिकर्जाच्या बाबत होत असलेली फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणारे कर्ज आणि कृषी उद्योग-व्यवसायातील कंपन्यांना देण्यात येणारे कर्ज यांची एकमेकांपासून फारकत करण्याची गरज असल्याचे मत देवेंद्र शर्मा यांनी व्यक्त केले. आपण या आशयाची सूचना केंद्रीय अर्थमंत्र्यांना केली होती, पंरतु त्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांची शुध्द फसवणूक   शेतकऱ्यांच्या नावाखाली बड्या कंपन्यांना स्वस्त दरात कृषिकर्जे देण्याचा हा प्रकार म्हणजे शुद्ध फसवणूक आहे. शंभर-शंभर कोटी रुपयांचे कर्ज मिळत असलेला हा कुठल्या प्रकारचा शेतकरी आहे? हा सगळा देखावा आहे. मुळात शेतकऱ्यांच्या नावाखाली उद्योगांना कर्ज देण्याचे कारणच काय? मनुष्यबळ वाचवण्यासाठी आणि (प्राधान्य क्षेत्र कर्जपुरवठ्याचे) १८ टक्क्यांचे उद्दिष्ट सहजरीत्या गाठण्यासाठी बॅंका शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांना कर्जे देतात, असे मत कृषी धोरण अभ्यासक डॉ. देवेंद्र शर्मा यांनी व्यक्त केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com