कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद पवार

कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस चर्चा व्हायला पाहिजे होती. ही विधेयके एका झटक्यात मंजूर करण्याची आवश्यकता नव्हती. तसेच एकीकडे, मार्केट खुले असल्याचे विधेयकात म्हणायचे व दुसरीकडे कांदा निर्यात बंद करायची हा देखील मोठा विरोधाभास आहे, अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
Big Contradiction in Agriculture Bills: Sharad Pawar
Big Contradiction in Agriculture Bills: Sharad Pawar

मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस चर्चा व्हायला पाहिजे होती. ही विधेयके एका झटक्यात मंजूर करण्याची आवश्यकता नव्हती. तसेच एकीकडे, मार्केट खुले असल्याचे विधेयकात म्हणायचे व दुसरीकडे कांदा निर्यात बंद करायची हा देखील मोठा विरोधाभास आहे, अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

मंगळवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच या विधेयकाविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसभेमध्ये कृषीविषयक तीन विधेयके मांडण्यात येणार होती व त्यावर तीन दिवस चर्चा होणे आवश्यक होते. या बिलांबाबत चर्चाही होऊ न देता, सदनाचे कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न उपसभापती करत आहेत, असे वाटत होते. सदनाच्या नियमांबाबत सदस्य काय सांगत आहेत, हे ऐकून घेण्याची तसदीही उपसभापतींनी घेतली नाही. विधेयकांवर चर्चा करण्याच्या सदस्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणत, उपसभापतींनी आवाजी मतदान घेतले आणि आततायीपणाने ही विधेयके मंजूर केली. सभापतींचे चुकलेच, असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले.

श्री. पवार पुढे म्हणाले की, कृषी विधेयके एका झटक्यात मंजूर करण्याची आवश्यकता नव्हती. जी विधेयके मंजूर केली आहेत, त्यामध्येही मोठ्या प्रमाणात विरोधाभास आहे. कॉर्पोरेट सेक्टर मार्केट कमिटीमार्फत शेतकरी देशभरात कोठेही माल विकू शकेल, असे एका विधेयकात म्हटले आहे. मात्र, त्यात नवीन काहीच नाही. आताही नाशिकची द्राक्षे, कोकणातील हापूस देश-विदेशात कोठेही विकता येतोच. एकीकडे, मार्केट खुले असल्याचे विधेयकात म्हणायचे आणि दुसरीकडे कांदा निर्यात बंद करायची हा देखील मोठा विरोधाभास आहे. या सर्व विधेयकांवर हवी तशी चर्चा होऊ शकली नाही, उपसभापतींनी ती होऊ दिली नाही, असे म्हणत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यसभेत राष्ट्रवादी दिसली नाही, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता या शेतकरी बिलावर राज्यसभेत प्रफुल पटेल व लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येविषयी बोलताना पवार म्हणाले की, कोणाच्याही आत्महत्येमुळे मला दुःख वाटते. मात्र, एका आत्महत्येवरून तीन महिने एवढी गंभीर चर्चा सुरू असल्याचे पाहून आश्चर्य देखील वाटत आहे. देशात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणे बरोबर नसल्याचे शरद पवार म्हणाले आहेत.

एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन सभागृहात घडलेल्या प्रकाराचा निषेध म्हणून आज काही सदस्य अन्नत्याग करणार आहेत. यामध्ये मीदेखील सहभागी होणार असून, आदर्श विचारांना तिलांजली देण्याच्या सदनातील प्रकाराचा आपण निषेध नोंदवणार असल्याचे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात जो निर्णय दिला, त्याबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. विधिमंडळात जे आरक्षण दिले ते टिकवता आले पाहिजे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची गरज आहे. गेल्या दोन दिवसांपासून याबाबत बैठका सुरू आहेत, त्यामुळे दिल्लीला जाता आले नाही. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रस

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com