खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी घट

निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर खाद्यतेल ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आटापिटा चालविला आहे. ग्राहकांचा रोष वाढत असल्याने भांबावलेल्या सरकारने शेतकरी हिताविरोधातील निर्णयांची मालिकाच लावली आहे.
Big drop in soybean prices instead of edible oil prices
Big drop in soybean prices instead of edible oil prices

पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर खाद्यतेल ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आटापिटा चालविला आहे. ग्राहकांचा रोष वाढत असल्याने भांबावलेल्या सरकारने शेतकरी हिताविरोधातील निर्णयांची मालिकाच लावली आहे. ११ सप्टेंबरला खाद्यतेल आयातशुल्कात कपात आणि ८ ऑक्टोबरला खाद्यतेल आणि तेलबियांवर साठा मर्यादा लावण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयांमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळताना दिसत नाही. उलट या निर्णयांमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. सरकारच्या धोरणांमुळे तेलाचे दर खरच कमी झाले का? आणि शेतकऱ्यांना किती फटका बसला याचा आढावा.

सोयाबीन तेलाचा घाऊक दर ११ ऑक्टोबर २०२० रोजी प्रतिकिलो ९४.६२ रुपये होता. तर ११ सप्टेंबर २०२१ला १४७.२५ रुपये आणि ७ ऑक्टोबरला १४५.१० रुपये आणि साठा मर्यादेनंतर ११ ऑक्टोबरला हा दर १४५.८९ रुपयांवर पोहोचला. 

११ सप्टेंबरला खाद्यतेलांच्या आयातशुल्कात साडेपाच टक्क्यांची कपात केली. मात्र ११ सप्टेंबरला सोयाबीन तेलाचे घाऊक दर १५० रुपयांवरून २७ सप्टेंबरला हा दर १५५.८० रुपये किलोवर पोहोचला. म्हणजेच आयातशुल्क कपातीचा दरावर काहीच परिणाम झाला नाही हे स्पष्ट झाले. मात्र ११ सप्टेंबरला देशभरातील बाजारात समित्यांत सोयाबीनचा सरासरी दर ७००० ते ८५०० रुपयांवरून २७ सप्टेंबरला ५००० ते ७००० रुपयांवर घसरला. म्हणजेच या निर्णयामुळे सोयाबीनचे दर घसरले 

आता सरकारने ८ ऑक्टोबरला खाद्यतेल आणि तेलबियांवर साठा मर्यादा लावण्याच्या निर्णयानंतर तेलांचे दर खरच कमी झाले का, हे पाहू. गुरुवारी ७ ऑक्टोबरला घाऊक दर १४५.१० रुपये होता. तर सोमवारी ११ ऑक्टोबरला सोयाबीन तेलाचा घाऊक दर हा १४५.८९ रुपयांवर गेला. म्हणजेच तेलाचे दर हे काहीसे वाढले. तर ७ ऑक्टोबरला बाजारात सोयाबीनचे सरासरी दर ४७०० ते ६५०० रुपयांवरून ११ ऑक्टोबरला ४५०० ते ५५०० रुपयांवर आले. म्हणजेच खाद्यतेल आणि तेलबियांवर साठामर्यादेच्या निर्णयाने तेलाचे दर कमी तर झाले नाही मात्र सोयाबीनचे दर घसरले. 

इतर तेलांच्या घाऊक दरांचा विचार करता, ११ ऑक्टोबर २०२० रोजी भुईमूग तेलाचे दर प्रतिकिलो १४२.१५ रुपयांवरून आता १७३ रुपयांवर पोहोचले आहेत. मोहरी तेलाचे दर ११८.३१ रुपयांवरून १७३.९८ रुपये, सूर्यफूल तेल ११०.१७ रुपयांवरून १६०.७० रुपये, पामतेलाचे दर ८२.२२ रुपयांवरून १२५.२३ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.

गेल्या महिन्यात, ११ ऑगस्ट रोजी खाद्यतेलांच्या घाऊक दरांचा विचार करता शेंगदाणा तेल १७२.७० रुपये प्रतिकिलो होते. मोहरी तेल १६७.२० रुपये, वनस्पती तेल १२६.७१ रुपये, सोयाबीन तेल १४७.२५ रुपये, सूर्यफूल तेल १६५ रुपये आणि पामतेल १२५.६० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात होते.

असे आहेत किरकोळ दर केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत तेलाचे किरकोळ दर ११ ऑक्टोबर २०२० रोजी सोयाबीन तेलाचे दर १२२ रुपये प्रतिकिलो होते. ते २७ सप्टेंबर २०२१ रोजी १५२ रुपयांवर पोहोचले. शेंगदाणा तेल १८४ रुपयांवरून १८८ रुपये, मोहरीतेल १४२ रुपयांवरून १९८ रुपयांवर पोहोचले, सूर्यफूल तेलाचे दर १४१ रुपयांवरून १८४ रुपयांवर, तर पामतेलाचे दर १०६ रुपयांवरून वाढत १२८ रुपयांवर पोहोचले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com