‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखा

१२ ते १४ मे दरम्यान निसर्गाच्या दणक्याने ६० ते ७० टक्के आंबा गळाला होता. आता गुरुवारी रात्री आलेल्या वादळाने झाडावर एकही फळ राहिले नाही. विमा कंपनी आणि प्रशासन याची दखल घ्यायला तयार नाही. — गवनाजी अधाने, शेतकरी, विरमगाव, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद.
cyclone
cyclone

पुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात शेतीपिकांचे, शेडनेट, पॉलिहाऊस, पशुधनाचे गोठे, पोल्ट्री शेडचे मोठे नुकसान झाले. आंबा, केळी, नारळ, द्राक्ष, डाळिंब बागांना तडाखा बसला. तर, ऊस, मका, कारले, दोडका, टोमॅटोसह भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसला. कोकण, उत्तर महाराष्ट्रासह, उत्तर मध्य महाराष्ट्रातील पॉलिहाऊस शेती उद्ध्वस्त झाली.    पुणे जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. शेती पिकांचे, शेडनेट, पॉलिहाऊस, जनावरांच्या गोठ्यांचे, कुक्कुटपालन शेडचे मोठे नुकसान झाले. सातारा जिल्ह्यात पिकांसह झाडे, घरांना फटका बसला. फलटण तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांना वादळ, पावसाने झोडपून काढले. वादळामुळे विजेचे पोल, घरावरील पत्रे तसेच उभी असलेली पिके आडवी झाली. कारले, दोडका, टोमॅटोसह वेलवर्गीय पिके, ऊस, केळी, आंबा आदींचे मोठे नुकसान झाले. आंब्याची फळगळती जमिनीवर आंब्याचा सडा पडला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. रत्नागिरी जिल्‍ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यात वेगवान वाऱ्यामुळे आंबा, नारळ, पोफळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. तर, घरांची छते उडून गेली. दापोली तालुक्यातील कजिवली येथील मनोहर चव्हाण यांच्या काजू, आंब्याच्या झाडांचे मोठे नुकसान झाले. हर्णे बंदराजवळील नाडे गावातील सुमारे ८० घरांचे या वादळात नुकसान झाले. पाजपंढरीतील दोन जण जखमी झाले. आगरवायगणी तील वीरेंद्र येलंगे यांच्या बैल, तर आंजर्लेतील राजेश बोरकर यांची गाय मृत झाली. आंजर्लेतील मंगेश महाडिक याच्या सुमारे ४८ कोंबड्या मृत पावल्या. आवाशी येथील ६ घरांचे नुकसान झाले.  नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शेती, चारापिकांचे नुकसान झाले. मांडवे गावात घरांचे व गोठ्यांचे पत्रे उडाले. बिरेवाडीत डाळिंबांच्या बागांचे नुकसान झाले. नेवासा तालुक्यात सोनईत बाळासाहेब गडाख यांच्या पॉलिहाऊसचे अडीच लाखांचे, बाळासाहेब दरंदले यांचे दीड लाखांचे, दत्ता सोनवणे यांचे एक लाखापेक्षा अधिकचे नुकसान झाले. लांडेवाडी, हिंगणी येथे पॉलीहाऊसमधील फुलपिकांचेही नुकसान झाले.  नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे फळबागांचे अतोनात नुकसान झाले. फळबागांसह उसाची पिके आडवी झाली. द्राक्ष, डाळिंब, केळी बागांसह उभ्या उसाला फटका बसला. सिन्नर औद्योगिक वसाहतींना वादळाचा फटका बसला. नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागात बोराळे येथे बी.डी राजपूत यांची काढणीसाठी आलेली केळी बाग जमीनदोस्त झाली. राहुरी येथे विजेच्या धक्‍क्‍याने महिला ठार झाली. निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे, थेरगाव परिसरात उसाचे पीक आडवे झाले. पिंपळगाव बसवंत परिसरात तीन मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. द्राक्ष बागांमध्ये खरड छाटणीनंतर ज्या बागांना नवीन पालवी फुटून काडी तयार होत आहे, त्या नवीन काड्या बाधित झाल्या. बागलाण तालुक्यातील भाक्षी येथील शेतकरी गोरख रौदळ यांची डाळिंब बाग वाऱ्यामुळे उन्मळून पडली. चांदवड तालुक्यातील दह्याने येथे जीवन बाळासाहेब भवर यांची द्राक्षबाग वाऱ्याच्या तडाख्यात लोखंडी अँगल वाकल्याने आडवी झाली. येवला तालुक्यातील बुधवार (ता.३) रोजी पोल्ट्री शेडचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात गेल्या सोसाट्याच्या वारा होता. पंढरपूर तालुक्यातील बार्डी येथील दशरथ बनकर यांच्या काढणीस आलेल्या अडीच एकरच्या खरबुजाचा प्लॅाट पूर्णपणे खराब झाला. कूसूर (ता.दक्षिण सोलापूर) भागात काही घरावरील पत्रे उडाले. कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यात काही ठिकाणी आंबा, फणस गळून पडले. गोठा व शाळांचे पत्रे उडून जाण्याच्या घटना शाहुवाडी तालुक्यात घडल्या. सांगली जिल्ह्यात २६५ हेक्‍टर द्राक्ष बागांचे, १० हेक्‍टर भाजीपाला, तर २५ हेक्‍टरवरील उसाचे नुकसान झाले. मात्र, हा पाऊस हळद, भात आणि सोयाबीन पिकासह ऊस पिकाला उपयुक्त ठरणार आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी केसर आंब्यांच्या बागांचे मोठे नुकसान झाले. गंगापूर तालुक्यातील रायपूर येथे वादळामुळे विजेची तार तुटून पडल्याने त्यामधून लागलेल्या शॉकमुळे जवळपास २६ मेंढ्यांना जीव गमवावा लागला. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पाऊस झाला. या पावसाचा चांगला फायदा येत्या हंगामासाठी होणार आहे. पेरणीपूर्व मशागतीला गती येणार आहे.

पिकांना मोठा फटका

  • राज्यभरात पाऊस आणि वादळामुळे भाजीपाल्याला फटका
  • पुणे, नगर जिल्ह्यांत पॉलिहाऊस शेती उद्ध्वस्त
  • मराठवाड्यात केसर आंब्याचे मोठे नुकसान
  • नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब बागा झाल्या आडव्या
  • कोल्हापुरात आंबा, फणसाची फळगळ
  • रत्नागिरीत आंबा, काजू, फणस बागांचे नुकसान
  • ‘केसर’चे मोठे नुकसान मराठवाड्यात जवळपास १९ हजार हेक्‍टरवर केसर आंब्यांच्या बागा आहेत. यंदा नैसर्गिक संकटांमुळे आधीच केसरचे उत्पादन लांबणीवर पडले.  या संकटातून वाचलेला केशर हाती येईल अशी आशा होती. परंतु निसर्ग चक्रीवादळामुळे झालेला पाऊस आणि सुसाट्याच्या वाऱ्यामुळे केसर आंबा उत्पादकांची आशा निराशेत बदलली. त्यामुळे यंदा केसर उत्पादन हाती लागेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे मराठवाड्यातील केर उत्पादक यंदा मोठ्या संकटात सापडले आहेत.    100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलेली ठिकाणे  अलिबाग 108, माणगाव 140, पेण 160, पोलादपूर 145, तळा 117, चिपळूण 102, दापोली 125, लांजा 131, मंडणगड 130, वैभववाडी 108, भुसावळ 106, गगनबावडा 185, इगतपुरी 106, नाशिक 144, सिन्नर 111, महाबळेश्वर 187,  राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये : (स्रोत - हवामान विभाग) :  कोकण : कुलाबा ५०, संताक्रूझ २५, जव्हार ७०, पालघर, ४०, विक्रमगड ४५, वाडा ५१, खलापूर ७३, मुरुड ७५, पनवेल ६४, रोहा ९४, उरण ५०, गुहाघर ७७, हर्णे ८७, खेड ७६, राजापूर ८७, रत्नागिरी ५३, संगमेश्वर ७३, देवगड ४७, दोडामार्ग ४३, कणकवली ५५, कुुुडाळ ५४, मालवण ५७, सावंतवाडी ५९, अंबरनाथ ४५, कल्याण ४०, शहापूर ७५, उल्हासनगर ६८. मध्य महाराष्ट्र : अकोला ९१, कोपरगाव ४९, संगमनेर ५५, श्रीरामपूर ४०, धुळे ४७, गिधाडे ४१, साक्री ७२, शिरपूर ६३, सिंदखेडा ४६, अमळनेर ४६, चाळीसगाव ४२, चोपडा ४९, दहिगाव ६०, धरणगाव ४०, एरंडोल ४६, जामनेर ६२, पारोळा ४२, यावल ७०, चांदखेड ८५, पन्हाळा ५८, राधानगरी ६५, शाहूवाडी ६६, नंदूरबार ५९, नवापूर ४०, शहादा ४८, चांदवड ४९, देवळा ८७, दिंडोरी ७०, गिरणा धरण ७३, कळवण ७१, मालेगाव ७२, निफाड ५७, सटाना ८७,सुरगाणा ६५, येवला ५३, खेड ७६, पुणे शहर ४३, जवळी मेढा ८०, पाटण ८०, सातारा ५७, वाई ४५. मराठवाडा : कन्नड ३८, वैजापूर ३९, जाफराबाद ४८. विदर्भ : धरणी ४०, मोर्शी ४२, परतवाडा ३२, जळगाव जामोद ७८, मलकापूर ३८, नांदुरा ३०, कुरखेडा ३६, करंजलाड ८४, मालेगाव ६८, मंगरूळपीर ८४, मनोरा ७४, रिसोड ३४, वाशीम ७७.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com