औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख क्विंटल मक्याचे चुकारे बाकी

औरंगाबाद : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर शेतकऱ्यांच्या १ लाख ५६ हजार क्विंटल मक्याचे चुकारे शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे.
bill of 1.5 lakh quintals of maize left in Aurangabad, Jalna district
bill of 1.5 lakh quintals of maize left in Aurangabad, Jalna district

औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर शेतकऱ्यांच्या १ लाख ५६ हजार क्विंटल मक्याचे चुकारे शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. कोरोनामुळे आर्थिक समस्यांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना चुकारे मिळण्याची प्रतीक्षा आहे.

प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यात ७८३२ शेतकऱ्यांपैकी  ५९६६ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीचे एसएमएस पाठविण्यात आले होते. त्यापैकी केवळ ३८६९ शेतकऱ्यांकडील १ लाख १४ हजार ४३६ क्विंटल मका खरेदी झाली.  जालना जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या ५६१० शेतकऱ्यांपैकी केवळ ३८७७ शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष खरेदीचे संदेश आले. त्यापैकी केवळ १९५२ शेतकऱ्यांकडील ७३ हजार ३५४ क्विंटल मका खरेदी झाली होती. त्यांपैकी जालना जिल्ह्यातील ७२७ शेतकऱ्यांना त्यांच्या २५ हजार ४९१ क्विंटल ५५ किलो मक्याचे चूकारे अदा करण्यात आले. तर, अजूनही जवळपास ४७ हजार ८६३ क्विंटल मक्याचे चुकारे त्यांना मिळणे बाकी आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात मक्याचे चुकारे मिळण्याची स्थिती अत्यंत बिकट आहे. जिल्ह्यात ३८६९ शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या १ लाख १४ हजार ४३६ क्विंटल मक्यापैकी केवळ १९३ शेतकऱ्यांना त्यांच्या ५५४५ क्विंटल मक्याचे चुकारेच अदा करण्यात आले. तब्बल १ लाख ८ हजार क्विंटल मक्याचे चुकारे ३६०० वर शेतकऱ्यांना मिळणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मका उत्पादक वाऱ्यावर 

मका खरेदीला मिळालेल्या ३१ जुलै पर्यंतच्या मुदतवाढीला दीड दिवसाचा कालावधी शिल्लक असतानाच पुन्हा एकदा मका खरेदी थांबली होती. राज्यासाठी दिलेला लक्षांक पूर्ण झाल्यामुळे पोर्टल बंद पडून ही खरेदी थांबली होती. त्यावेळी औरंगाबाद व जालना जिलह्यातील  केंद्रांवर जवळपास ६८६ शेतकरी मका विक्रीच्या प्रतिक्षेत होते. शेतकरी वाहनांसह अनेक केंद्रांवर ठाण मांडून होते. परंतु, शासनाकडून कोणताही निर्णय न झाल्याने मका उत्पादकांना वाऱ्यावर सोडण्यात आले. त्यामुळे खासगी बाजारात १२५० रुपये प्रतिक्विंटने मका विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. 

कन्नड येथील केंद्रावर मका खरेदी न झाल्याने निराश होऊन परत आलो. ४१ क्विंटल मका ११०० रुपये भावाने विकावा लागला. हमाली वजन काटा प्रति क्विंटल २० रुपये कटला. नाचनवेल ते कन्नड भाडे २५०० रुपये व दोन मुक्काम भाडे १४०० रुपये व इतर खर्च ५०० रुपयांचा भुर्दंड मला बसला. - रावसाहेब शिंदे, मका उत्पादक नाचनवेल ता. कन्नड जि.औरंगाबाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com