बायोसिरप तंत्रामुळे इथेनॉल उद्योगाचे अर्थकारण बदलणार

नाशीवंत ऊसरस चोवीस तासदेखील टिकत नसल्याने इथेनॉल उद्योगासमोर मोठी समस्या उभी ठाकली होती. मात्र आता पुण्याच्या ‘प्राज’ कंपनीने अथक परिश्रमातून विकसित केलेल्या ‘बायोसिरप’मुळे ऊसरस वर्षभर टिकून राहणार आहे.
Bio-syrup technology will change the economy of the ethanol industry
Bio-syrup technology will change the economy of the ethanol industry

पुणे ः उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करता येते; मात्र नाशीवंत ऊसरस चोवीस तासदेखील टिकत नसल्याने इथेनॉल उद्योगासमोर मोठी समस्या उभी ठाकली होती. मात्र आता पुण्याच्या ‘प्राज’ कंपनीने अथक परिश्रमातून विकसित केलेल्या ‘बायोसिरप’मुळे ऊसरस वर्षभर टिकून राहणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळण्याचे संकेत मिळत आहेत. 

‘प्राज इंडस्टिज लिमिटेड’चे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी वार्ताहरांना या तंत्राबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की प्राजच्या तंत्रज्ञानामुळे आता रसावर विशिष्ट प्रक्रिया करता येते. त्यामुळे रसाचे रूपांतर दीर्घकालीन टिकवणक्षमता असलेल्या पाकात (सिरप) होते. या तंत्राचे स्वामित्वहक्क (पेटंट) ‘प्राज’कडे आहेत. या तंत्रज्ञानामुळे साखर कारखान्यांच्या नियोजनाला आधार मिळेल. यामुळे वर्षभर इथेनॉल तयार करता येईल. त्यातून कारखान्यांचे अर्थकारण सुधारेल.’’

कराडमधील जयवंत शुगर्समध्ये ‘प्राज’ने पहिला पथदर्शी बायोसिरप प्रकल्प उभारला. वर्षभर साठवलेल्या साखर पाकातील शर्कराघटक अजिबात कमी झाला नसल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या आठवड्यात बायोसिरपच्या उद्घाटनासाठी स्वतः साखर आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित होते. ‘‘देशात अतिरिक्त साखरेचा साठा ६० लाख टनांचा झाला आहे. या साठ्यामुळे साखर कारखान्यांचा पैसा अडकून आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. मात्र बायोसिरपने इथेनॉलचा व्यावसायिक मार्ग आता शाश्‍वत केला आहे. जागतिक साखर उद्योगाचे अर्थकारणदेखील यातून बदलू शकते,’’ असे आयुक्तांचे म्हणणे आहे.

‘बायोसिरप’ बघण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर तसेच साखर उद्योगातील मान्यवर उपस्थित होते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) या तंत्राला मान्यता दिली आहे. ‘प्राज’च्या म्हणण्यानुसार, अतिरिक्त साखर उत्पादन रोखण्यासाठी केंद्र सरकारने ऊस रसापासून इथेनॉलनिर्मिती करण्यास परवानगी दिली आहे. मात्र साखर कारखान्यांना केवळ हंगाम सुरू असेपर्यंतच इथेनॉलचे उत्पादन करणे शक्य होत असे. बायोसिरपने ही अडचण कायमची दूर केली आहे.

शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला बळकटी मिळेल साखर कारखान्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळवून देण्याची क्षमता ‘प्राज’च्या बायोसिरपमध्ये आहे. आता ‘‘कुठेही, केव्हाही इथेनॉल’ सुलभपणे उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. भारताने इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याच्या ध्येय ठेवले आहे. ते लवकर साध्य होईल. बायोसिरप तंत्राविषयी आता जगभरातून विचारणा होते आहे,’’ असे डॉ. प्रमोद चौधरी यांनी आनंदाने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com