शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक : त्योरा मिओरा

शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक : त्योरा मिओरा
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक : त्योरा मिओरा

नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही येत आहे, अशा वेळी जंगलांचे प्रमाण कमी होऊन शेतजमिनींचे प्रमाण वाढत आहे. त्याचे विपरीत परिणाम जंगले, वन्यजीव आणि स्थानिक पर्यावरणावर होत आहेत. सध्या चालू असलेल्या पद्धतीने शेतीचा विस्तार होत गेल्यास जैवविविधता नष्ट होण्याचा धोका समोर आला आहे. शेती करत असताना जैवविविधतेचे संवर्धन केले पाहिजे, असे मत जपान येथील सेंद्रिय शेती अभ्यासक त्योरा मिओरा यांनी मांडले. नाशिक येथे सुरू असलेल्या नवव्या जागतिक कृषी महोत्सवाच्या ''कमी पाण्याची व कमी खर्चाची शेती'' या विषयावर दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. या वेळी नैसर्गिक व जैविक पद्धतीने शेती मार्गदर्शक राजेंद्र भट, गोपालक डॉ. गोपालभाई सुतारिया, आयोजक आबासाहेब मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.  या वेळी श्री. मिओरा म्हणाले, शेती करताना जैवसाखळी जपली जावी. याबाबत सविस्तर ज्ञान मिळवून त्यानुसार उपाययोजना करण्यात याव्यात. शेतीसाठी मधमाशी, फुलपाखरे, साप, गांडूळ, मुंगूस, पशुपक्षी हे सर्व महत्त्वाचे आहे. पारंपरिक शेती पद्धतीमध्ये काही उणिवा आहेत, ज्यामुळे पीक रोगांना लवकर बळी पडते. रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर करण्यापेक्षा सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे.  शेतकरी उत्पादन घेतो, त्याचे आगामी काळात ब्रँडिंग व पॅकिंग करणेदेखील महत्त्वाचे आहे. म्हणून शेतकऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. शेती महाविद्यालये व विद्यापीठातून शेतीचे ज्ञान घेऊन शेती विकसित करणारे विद्यार्थी मोजकेच आहेत. सर्वांना नोकरीमध्ये जास्त रस असतो म्हणून विद्यापीठांनी यावर गांभीर्यपूर्वक विचार करून अभ्यासक्रम व प्रात्यक्षिके ठरविणे महत्त्वाचे आहे, असेही श्री. मिओरा यांनी सांगितले. प्रयोगशीलतेने शेती केल्यास रोजगारवाढीला संधी  आजची नवीन तरुण पिढी शेती करण्यास अजिबात उत्सुक नाही. खेड्यातील तरुण पिढीचा कल शहरात जाऊन रोजगार, नोकरी शोधण्याकडे आहे. शहरात प्रयत्न करून नोकरी मिळाली नाही, तर असे तरुण गावाकडे परत येऊन नाइलाजास्तव शेती व्यवसायात उतरतात, ही खरी समस्या आहे. शेती जर प्रयोगशीलतेने केली, तर रोजगार वाढीला संधी मिळेल, असे श्री. मिओरा यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com