बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (कनेक्शन कट) कारवाई करण्याचा इशारा महावितरणने राज्
ताज्या घडामोडी
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे रक्षण करा
मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता, सुपीकता टिकून ठेवण्यासाठी मातीतील जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धन करणे प्रत्येक शेतकऱ्यांचे कर्तव्य आहे.
परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता, सुपीकता टिकून ठेवण्यासाठी मातीतील जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धन करणे प्रत्येक शेतकऱ्यांचे कर्तव्य आहे. त्यासाठी रासायनिक खतांच्या संतुलित वापरावर भर द्यावा लागेल, त्यासोबतच तणनाशकांचा गरजेपेक्षा जास्त वापर टाळावा लागेल. मातीतील जैविक घटकांच्या योग्य पोषणासाठी सेंद्रिय निविष्ठांचा वापर प्राधान्याने करावा लागेल, असे प्रतिपादन असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदा आणि कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सय्यद इस्माईल यांनी केले.
जागतिक मृदानिमित्त संवाद साधला असता डॉ. इस्माईल म्हणाले, की जागतिक अन्न व कृषी संघटनेतर्फे (एफएओ) विशिष्ट थीम घेऊन दरवर्षी मृदा दिनापासून वर्षभर जमिनीच्या आरोग्याबद्दल जनजागृती केली जाते. या वर्षी (२०२०-२१) मातीची सजीवता जपण्यासाठी, जैवविविधतेचे रक्षण करा (Keep Soii Alive, Protect Biodiversity) हे घोषवाक्य आहे. मातीचा पाच सें.मी. थर तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. विविध घटकांमुळे मातीच्या सुपीकतेवर परिणाम होत आहे. रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे पिकांना नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचा पुरवठा करणाऱ्या जिवाणूंची संख्या घटत आहे. तणनाशकांच्या गरजेपेक्षा अधिक वापरामुळे उपयुक्त बुरशी तसेच जिवाणूंची संख्या कमी होत असल्याचे आढळून आले आहे. पंजाब, हरियाना या राज्यांत जमिनीतील सूक्ष्म जिवांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.
‘‘मातीतील विविध प्रकारच्या जैविक घटकांवरच जमिनीची सुपीकता, पिकांची उत्पादकता अवलंबून आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा संतुलित वापर, तणनाशकांचा किमान वापर करावा लागेल. मशागतीचे तंत्र देखील बदलावे लागेल. शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खते वापरावी लागतील. सेंद्रिय घटक तसेच पिकांचे अवशेष, काडीकचरा गाडल्यास जमिनीतील सर्व सू्क्ष्म जिवाणूंना खाद्य मिळते. त्यांचे योग्य पोषण होते,’’ असेही डॉ. इस्माईल यांनी
सांगितले.
भावी पिढीसाठी काम करा
जमिनीतील जैवविधतेचे रक्षण, संवर्धन करणे आवश्यक आहे. अन्यथा, भविष्यात सर्वांना विविध विपरीत परिणामांना सामोरे जावे लागेल. भावी पिढ्यांसाठी सुपीक जमीन व स्वच्छ पर्यावरण देणे आताच्या पिढीचे कर्तव्य आहे. पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी या घटकासोबत जैविविधतेचे संवर्धन हेच जागतिक मृदा दिनाचे प्राधान्य आहे, असे डॉ. इस्माईल यांनी सांगितले.
- 1 of 1025
- ››