असे करा घाटेअळीचे जैविक व्यवस्थापन

Biological management of pod borer
Biological management of pod borer

घाटेअळी नियंत्रणासाठी सातत्याने रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला गेल्यास त्यामध्ये प्रतिकारकता विकसित होऊ शकते. परिणामी विषाणूजन्य कीटकनाशकांचा वापर केल्यास नियंत्रणासोबतच पर्यावरणपूरकही ठरू शकते. एच.एन.पी.व्ही. या विषाणूमुळे घाटेअळ्या रोगग्रस्त होतात. हा विषाणू अळीच्या पचनसंस्थेतून रक्तात शिरकाव करतो. पेशी केंद्रात त्याची वाढ होते. परिणामी अळीचे खाणे बंद पडते. या विषाणूंची वाढ अळीच्या चरबी आतील त्वचा, मेंदू, श्वसन संस्था तसेच स्नायू संस्था इत्यादींच्या पेशीमधील केंद्रकात होते. या रोगामुळे मृत झालेल्या अळ्या तोंड खालच्या बाजूस व मागील भाग थोडा प्रसरण पाऊन फांदीस चिटकल्याचे दिसते. लहान अळी कमी विषाणू प्रादुर्भावानेही मृत होते. मात्र, जसजशी घाटेअळी मोठी होते, तसे एच. एन.पी. व्ही. विषाणूस प्रतिकारक्षमता वाढते. त्यामुळे अळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेपर्यंत या विषाणूजन्य कीटकनाशकांचा वापर करावा. एच.एन.पी.व्ही. हा विषाणू घाटेअळीपुरता मर्यादित हानिकारक आहे. दुसऱ्या कोणत्याही गटातील कीटकांसाठी अपायकारक नाही. विशेषतः प्रमुख परोपजीवी कीटक, मित्र कीटकांसाठी आणि अन्य प्राण्यांसाठीही सुरक्षित आढळला आहे. विषाणू टिकण्याची क्षमता

  • विषाणू प्रखर सूर्यप्रकाशामुळे कार्यहीन होतो. हे विषाणू प्रयोगशाळेत शीतगृहात दोन ते चार वर्षापर्यंत साठवता येतत. त्याचप्रमाणे फवारणीमध्ये सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी करण्यासाठी नीळ वापरण्याची शिफारस केली जाते.
  • नियंत्रणासाठी वापर करताना.. .

  • या विषाणूचा वापर कापूस, तूर, हरभरा, सूर्यफूल, टोमॅटो इत्यादी पिकावरील घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी करता येतो. विषाणूचा फवारणीद्वारे वापर केल्यानंतर अळीमध्ये रोग निर्माण होऊन, ती मरण्यासाठी चार ते सहा दिवस लागतात.
  • फवारणीचे प्रमाण

  • एच. एन. पी. व्ही. विषाणूजन्य कीटकनाशक १० मिली अधिक नीळ १० ग्रॅम आणि एक अंड्याचा पांढरा बलक याचे मिश्रण प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. हेक्टरी १५० ते २०० लिटर द्रावण वापरावे.
  • संपर्कः डॉ. भैयासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८ (विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, ता. गेवराई, जि. बीडअंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com