सावरकरांच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक

BJP aggressors on Savarkar's issue during winter session
BJP aggressors on Savarkar's issue during winter session

नागपूर ः राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (ता. १६) विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न भाजप आमदारांनी केला. ‘मीपण सावरकर’ अशा आशयाच्या भगव्या टोप्या परिधान करून भाजप आमदारांनी सभागृहात प्रवेश केला, याच मुद्द्यावरून भाजप सदस्यांनी गोंधळ घातला. 

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू झाले. पहिल्याच दिवशी भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून शिवसेना व राहुल गांधी यांना लक्ष्य केले. नियम २३ अन्वये निंदाव्यंजक प्रस्ताव आणि ५७ अन्वये कामकाज बाजूला ठेवून या मुद्द्यावर बोलण्याची परवानगी फडणवीस यांनी या वेळी मागितली. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन व सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव झाल्यानंतर बोलण्याची सूचना केली. या वेळी अध्यक्ष उभे राहून बोलत असताना सत्ताधारी सदस्यांनी विरोधी बाकावरून केलेल्या शाब्दिक घोषणाबाजीवर आक्षेप घेतले. 

विशेषतः शिवसेना प्रतोद सुनील प्रभू व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यात या वेळी शाब्दिक चकमक झाली. अध्यक्षांच्या निवेदनानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन व अभिनंदनपर प्रस्तावाचे कामकाज झाले. त्यानंतर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी बोलण्याची अनुमती मागितली. त्या वेळी अध्यक्षांनी स्वा. सावरकर यांच्याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केलेली मते कामकाजात येणार नाहीत, असे निर्देश दिल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला. या वेळी कामकाज दहा मिनिटे तहकूब करण्यात आले.

पुन्हा कामकाज सुरू झाले त्या वेळीदेखील विरोधी पक्षनेत्यांनी स्वा. सावरकर यांनी कोलूच्या बैलाप्रमाणे अत्याचार सहन करून देशाच्या स्वांतत्र्याच्या लढ्यात योगदान दिले, असे असताना त्याबाबत कामकाजातून उल्लेख वगळण्याचे आदेश कसे देण्यात आले यावर आक्षेप घेतले. त्यावर अध्यक्ष पटोले यांनी सभागृहाचे कामकाज नियमाने चालविण्यासाठी मला सहकार्य करा, असे आवाहन केले. मात्र, विरोधी सदस्यांनी आक्रमकपणे घोषणाबाजी सुरू केली. त्या गदारोळात सत्ताधारी बाजूने शासकीय कामकाज सुरू करण्यात आले. वित्तमंत्री जयंत पाटील यांनी आकस्मिकता निधीत वाढ करण्याबाबतचा अध्यादेश पटलावर मांडला. त्यानंतर सन २०१९-२० च्या १६,१२० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या पटलावर ठेवल्या. 

अध्यक्षांनी या गदारोळातच तालिका सभापती म्हणून संजय रायमूलकर, धर्मरावबाबा अत्राम, यशोमती ठाकूर, कालिदास कोळंबकर यांच्या नावांची घोषणा केली. मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांनी गोंधळातच त्यांच्या विभागाचे अध्यादेश पटलावर मांडले. त्यानंतर अध्यक्षांनी माणिकराव महादेवराव सबाणे आणि अशोक कल्याणराव तापकीर या दिवंगत सदस्यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव मांडला. त्यानंतर सभागृहातील गोंधळाचे वातावरण निवळले.

विधानसभेत संविधान उद्देशिका  वाचन; सरन्यायाधीशांचा गौरव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन विधानसभेत केले. ते म्हणाले, की भारतीय प्रजासत्ताकाच्या ७०व्या वर्षात नागपूर येथे भरलेल्या १४ व्या विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ होत आहे. त्या वेळी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी वाचन पूर्ण केले. नागपूर करारानुसार होणाऱ्या या अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून सहकार्य अपेक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सभागृहात सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. 

महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्यामुळे अभिमानाने ऊर भरून आला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैतन्य मिळेल, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत व्यक्त केली. मूळचे नागपूरचे असलेले शरद बोबडे यांचे अभिनंदन नागपूरच्याच अधिवेशनात करता आले हा दुर्मीळ योगायोग असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. सध्या शरद ऋतू सुरू असल्याचा उल्लेख करीत हा ऋतू म्हणजे नवचैतन्याचा असून सरन्यायाधीश बोबडेंच्या रूपाने नवचैतन्य येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्या. बोबडे यांनी प्रयत्न केले आहेत. सरन्यायाधीशपदाच्या कारकिर्दीत ते अन्नदात्याला नवचैतन्य मिळवून देतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, की शरद जोशी यांच्या कर्जमुक्तीच्या लढ्यात कायम शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारे वकील म्हणून त्यांनी कोणतेही शुल्क न घेता कायम न्यायासाठी संघर्ष केला, त्यामुळे न्यायालयात लाखो शेतकऱ्यांना नादारीचे अर्ज दाखल करून कर्जमुक्त करण्याचे अनोखे पहिले आंदोलन राज्यात यशस्वी झाले. मुख्यमंत्री यांच्यासारखेच ते देखील वन्यप्राणी आणि वनसंवर्धनाच्या विषयात रस घेणारे आहेत, असे फडणवीस यांनी आवर्जून सांगितले. 

अभिनंदनाच्या प्रस्तावात बोलताना फडणवीसांनी सावरकरांचा उल्लेख करण्याचे चातुर्य दाखवले. ते म्हणाले, न्या. बोबडेंचे घराणेच कायद्याचे व न्यायाचे कामकाज करणारे आहे. सरन्यायाधीशांचे आजोबा व वडीलही विख्यात कायदेपंडित होते. त्यांनी कधीही बेकायदा कृत्याचे समर्थन केले नाही. अशा घरात स्वातंत्र्यवीर सावरकर हे नागपूरला येऊन राहिले होते. याचा उल्लेख करीत फडणवीस म्हणाले, की बोबडेंच्या घरालाही स्वातंत्र्यवीरांचे महत्त्व मान्य होते. 

‘मीपण सावरकर’ विधानसभेतील पहिल्या दिवसाच्या कामकाजाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे सावरकरांच्या मुद्द्यावरून झाली. सभागृहाबाहेर राहुल गांधींचा निषेध करणाऱ्या घोषणा देत भाजप सदस्यांनी निदर्शने केली. सभागृहातही ‘मीपण सावरकर’ अशा घोषणा लिहिलेल्या भगव्या टोप्या घालून भाजपचे सर्व आमदार आले होते. त्यात काँग्रेस- राष्ट्रवादीतून आलेले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, बबनराव पाचपुते अशांनी या टोप्या घातल्याने ते लक्षवेधी ठरले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com