agriculture news in marathi, bjp alliance win assembly election, mumbai, maharashtra | Agrowon

सत्ता महायुतीचीच

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जे ठरले आहे, त्यानुसार आम्ही पुढे जाणार आहोत, पुढचे सरकार महायुतीचे होणार याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत जनतेचे मोठे समर्थन आम्हाला  मिळाले आहे, राज्याच्या सर्वच भागांत आमची कामगिरी चांगली राहिली आहे. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुंबई  : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक निकालातून पुन्हा एकदा राज्यात भाजप-शिवसेना महायुतीचेच सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. २८८च्या विधानसभेत भाजप आणि शिवसेनेला बहुमतासाठी आवश्यक १४४ पेक्षाही जास्त जागांवर विजय मिळाला आहे. मात्र भाजप-सेनेला २०१४ चे संख्याबळ टिकवता आलेले नाही. युतीच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका भाजपला बसला असला तरी राज्यात भाजपच पहिल्या क्रमांकावर राहिला आहे, शिवसेनेने याहीवेळी दुसरे स्थान कायम ठेवले आहे. 

सेनेच्या जागांमध्ये किंचित घट झाली आहे. तिकडे विरोधकांच्या गोटात राष्ट्रवादीने अर्धशतकाच्या पुढे गरुडभरारी घेत भरीव कामगिरी दाखवली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या पदरात तब्बल पंधरा अधिकच्या जागा पडल्या आहेत. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. काँग्रेस मात्र चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे. काँग्रेसने आधीचे संख्याबळ टिकवले आहे, ही त्यांच्यासाठी जमेची बाब ठरली आहे.  

दरम्यान, युतीच्या सरकारमधील सात विद्यमान मंत्र्यांना जनतेच्या असंतोषाचा सामना करावा लागला आहे. यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे, अनिल बोंडे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अर्जुन खोतकर, संजय ऊर्फ बाळा भेगडे,  यांचा समावेश आहे. तसेच, सत्तेच्या मोहापायी काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजप-शिवसेनेत गेलेल्या बहुतेक आयाराम-गयारामांना जनतेने साफ नाकारले आहे.

राज्यभरात सर्वत्र सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. सुरवातीला पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम यंत्रांची मोजणी सुरू झाली. सकाळी साडेआठ वाजल्यापासून निकालाचे कल बाहेर येऊ लागले. दहापर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होऊ लागले. महायुतीची बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू होती. तर दुपारपर्यंत राज्यात भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता पुन्हा येणार हे स्पष्ट झाले. मात्र, हे होत असताना भाजप-शिवसेनेने जो सव्वादोनशे जागा जिंकण्याचा दावा केला होता तो फोल ठरला होता. 

विशेषतः भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशाने विरोधकांना गळाला लावण्याचे अवलंबलेले धोरण, मित्रपक्षांच्या उमेदवारांनाही भाजपच्या कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवण्याची केलेली सक्ती हे सगळे बूमरँग भाजपवरच उलटल्याचे दिसून येते. महायुतीला या निवडणुकीत मोठ्या बंडखोरीनेही ग्रासले होते. अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे बंडखोर उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे होते. काही ठिकाणी हे बंडखोर विरोधकांना जाऊन मिळाले होते. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला. युतीच्या बंडखोरांना थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न दोन्ही पक्षांकडून अगदी शेवटपर्यंत झाला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे २०१४ मध्ये सर्वाधिक १२३ जागा जिंकणाऱ्या भाजपचे घोडे या वेळी शंभरच्या आसपासच घुटमळत राहिले. 

भाजपचे स्वबळाचे मनसुबे तर उद्‌ध्वस्त झालेच शिवाय जागांमध्येही मोठी घट झाली. भाजपला जवळपास वीस जागा गमवाव्या लागल्या. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांची दिग्गज फौज प्रचारात उतरवूनही पक्षाला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही, किंबहुना गेल्यावेळचे संख्याबळही टिकवता आलेले नाही. तसेच कलम ३७० चा मुद्दाही महाराष्ट्रातील जनतेच्या गळी उतरवणे भाजपला जमलेले नाही. दैनंदिन खाण्या-पिण्याचे वांदे असताना राष्ट्रवादाच्या राजकीय भूमिकेने पोट कसे भरणार हा प्रश्न जनतेलाही पडला असण्याची शक्यता आहे. भाजपच्या विकासाच्या स्वप्नांनी सुद्धा जनतेचा भ्रमनिरास केल्याचे दिसून येते. अर्थव्यवस्था रसातळाला गेली असताना फक्त स्वप्नरंजन करणे परवडणारे नाही याची अनुभूती जनतेला झाली असावी अशी शक्यता आहे.

गेल्यावेळी ६३ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला या वेळी तो आकडा कायम टिकवता आलेला नाही. शिवसेनेच्या जागांमध्ये किंचितशी घट झाली आहे. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदी बसविण्यासाठी जास्तीत जास्त जिंकण्याचे शिवसेनेचे स्वप्नही भंगले आहे. तरी सुद्धा आगामी विधानसभेत शिवसेनेचे राजकीय महत्त्व वाढलेले पाहायला मिळणार आहे. मात्र, दुपारनंतरच्या निकालात महायुतीला बहुमतापर्यंत पोचण्यासाठी मोठा संघर्ष करायला लागल्याचे पाहायला मिळाले.
युतीच्या पाच दिग्गज मंत्र्यांनाही मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. जनतेच्या तीव्र असंतोषाचा फटका त्यांना बसल्याचे दिसून येते. यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, मंत्री प्रा. राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अर्जुन खोतकर, संजय ऊर्फ बाळा भेगडे यांचा समावेश आहे. तसेच सत्तेचे लोणी चाखण्यासाठी आघाडीतून भाजप-शिवसेनेत गेलेल्या बहुतेकजणांना जनतेने साफ नाकारले आहे. 

परळीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली. यात धनंजय मुंडे यांनी बाजी मारली. या मतदारसंघात अखेरच्या टप्प्यात धनंजय मुंडेंविरोधात झालेला कथित बदनामी पसरवणारा प्रचारही पंकजांना तारू शकला नाही. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशी वल्गना करणाऱ्या पंकजा मुंडे यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या काळात राज्यात चिक्की घोटाळा गाजला होता.

कर्जत-जामखेडमध्ये विद्यमान मंत्री प्रा. राम शिंदे यांना नवख्या रोहित पवार यांनी अस्मान दाखवले. शरद पवार यांचे नातू असलेल्या रोहित पवारांवर आयात उमेदवार म्हणून टीका झाली. मात्र, ते सर्व टीकाटीप्पण्णीला पुरून उरले. शरद पवार यांच्या करिष्यामुळे मंत्री शिंदे स्वतःची जागा टिकवू शकले नाहीत. रोहित पवार यांनी दोन-तीन वर्षांपासून मतदारसंघात चांगली बांधणी केली होती. त्याला अपेक्षित फळ मिळाले. त्याशिवाय राज्यमंत्री विजय शिवतारे, अर्जुन खोतकर, संजय ऊर्फ बाळा भेगडे यांचाही पराभव झाला. उमेदवारीसाठी भाजपत गेलेल्या माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील  यांना याहीवेळी पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेंकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.

दरम्यान, निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्षित ठरवलेल्या विरोधीपक्षांनी मोठी मजल मारली. विशेषतः शरद पवारांनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढला. त्याचे अपेक्षित परिणाम निकालात दिसून आले. पवारांनी दोन्ही पक्षांमध्ये मोठी जाण आणली, असे म्हटले तर वावगे होणार नाही. राष्ट्रवादीच्या संख्येत मोठी भर पडली. राष्ट्रवादीला गेल्यावेळच्या तुलनेत तब्बल पंधरा जागा अधिकच्या जिंकता आल्या आहेत. 

राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास ३० जागा जिंकत हा पक्षाचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले. विशेष म्हणजे, पोटनिवडणुकीत सातारा लोकसभेची जागाही राष्ट्रवादीने जिंकली आहे. राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील याठिकाणी मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. भाजपच्या उदयनराजे यांचा याठिकाणी दणदणीत पराभव झाला. काँग्रेसनेही एकाकी खिंड लढवत आपआपले गड कायम राखले. किंबहुना गेल्यावेळपेक्षा काही जास्तीच्या जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. महायुतीला बंडखोरांच्या समस्येने ग्रासले असताना इकडे काँग्रेस आघाडीच्या गोटात मात्र एकमेकांना मदत करण्याचे धोरण पाहायला मिळाले. त्याचा फायदाही विरोधकांच्या जागा वाढण्यात झाल्याचे दिसून येते. गेल्यावेळी ऐंशीच्या घरात असलेल्या विरोधकांच्या जागा या वेळी शतकापर्यंत पोचल्या आहेत.

प्रतिक्रिया

पक्षांतराला जनतेने पाठिंबा दिला नाही. सत्ता येते, सत्ता जाते. मात्र जमिनीवर पाय ठेवावे लागतात. सत्तेचा उन्माद आलेल्या लोकांना जनतेने जागा दाखवली. जे काही निवडणूक निकाल समोर आले त्यावरुन हेच चित्र दिसते आहे. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसवले आहे. आम्ही त्याचा स्वीकार करतो.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
 
लोकसभा निवडणुकीवेळी सत्तेत समसमान वाटा देण्याचा फॉर्म्युला ठरला होता. त्याची अंमलबजावणी करायला हवी. त्यानंतरच सत्तास्थापनेचा दावा करण्यात येईल.जागावाटपात समजून घेतले, आता सत्तावाटपात समजून घेणार नाही. मात्र सत्तेसाठी वेडेवाकडे पर्याय स्वीकारणार नाही
-  उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख.


इतर अॅग्रो विशेष
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...
मुगावर काय फवारायचे?अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
दूध दर आंदोलनाचा राज्यभर एल्गारपुणे: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व...
पीकविमा नोंदणीत महाराष्ट्राची आघाडीपुणे: डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा...