दक्षिण महाराष्ट्रात शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपची रसद

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : दक्षिण महाराष्ट्रातून शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपचे नेते जिवाचे रान करीत आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा या तीन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी घेतली आहे. येथे शिवसेनेच्या उमेदवारांचा सामना महाआघाडीच्या उमेदवारांशी होत आहे. तीनही मतदारसंघ आव्हानात्मक असल्याने शिवसेनेने येथे फार ताकद लावलेली नाही. त्यामुळे पाटील हे कोल्हापूर-साताऱ्यात शड्डू ठोकून बसले आहेत.

शिवसेना-भाजप युतीमध्ये कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत. तीनही मतदारसंघ आघाडीला अनुकूल असल्याने शिवसेना विजयासाठी मेहनत घेताना दिसत नाही. कोल्हापुरात दिवाकर रावते वगळता शिवसेनेचा राज्यस्तरावरील अन्य प्रभावी नेता फिरकलेला नाही. त्यामुळे शिवसेना उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपने घेतली आहे. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पश्चिम महाराष्ट्र वगळता संपूर्ण महाराष्ट्राने साथ दिली होती. आता मोदी लाट ओसरली आहे. उत्तरप्रदेशात समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आल्याने भाजपला तेथे गेल्या निवडणुकीतील निकालाची पुनरावृत्ती करणे शक्य वाटत नाही. त्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य भाजप नेत्यांना दिले आहे. त्यामुळे भाजपने दक्षिण महाराष्ट्राची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवली आहे. पाटील हे सातत्याने तीनही मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरत आहेत.

कोल्हापुरात महाआघाडीचे धनंजय महाडीक आणि महायुतीचे संजय मंडलिक यांच्यात मुख्य लढत आहे. कोल्हापूरचे पालकमंत्रिपद भूषवत असलेल्या पाटील यांनी गेल्या साडेचार वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे जाळे विणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश आले नाही. कोल्हापूर मतदारसंघात शिवसेना-भाजपचे आमदार आहेत. या राजकीय शक्तीच्या बळावर पाटील यांनी कोल्हापूरचे आव्हान स्वीकारले आहे. महाआघाडीतील अंतर्गत संघर्षाचा फायदा मंडलिक यांना मिळवून देण्याचा पाटील यांचा प्रयत्न आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे राजू शेट्टी आणि शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यात सामना आहे. शेट्टी हे २००९ पासून हातकणंगले मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधीत्व करीत आहेत. गेल्या दोन निवडणुकीत ते भाजपसोबत होते. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शेट्टी यांनी भाजपसोबतचे राजकीय संबंध संपुष्टात आणले. राजू शेट्टी यांची लोकसभेची हॅट्‌ट्रीक रोखण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीतून आलेल्या धैर्यशील माने यांना मैदानात उतरविले आहे. हातकणंगले मतदारसंघात भाजपचा एक आणि शिवसेनेचे तीन आमदार आहेत. या आमदारांना सोबत घेऊन चंद्रकांत पाटील माने यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. हातकणंगले मतदारसंघात त्यांनी सभा, कार्यकर्ता बैठकींचा धडाका लावला आहे.

सातारा मतदारसंघ हा महायुतीच्यादृष्टीने सर्वात प्रतिकूल मतदारसंघ. येथे आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेनेने माथाडी कामगार संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उदयनराजे भोसले यांना टक्कर देणे सोपे नसल्याने या मतदारसंघाची जबाबदारी शिवसेनेच्या कोणत्याही बड्या नेत्याने घेतलेली नाही. शिवसेनेचे स्थानिक नेते नितीन बानुगडे पाटील हे सातारची खिंड लढवत आहेत. बानुगडे यांच्या मर्यादा लक्षात घेऊन चंद्रकांत पाटील यांनी येथे लक्ष घातले आहे. त्यांनी नरेंद्र पाटील यांच्यासाठी भाजपची फौज कामाला लावली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com