कामगंध सापळा
कामगंध सापळा

कामगंध सापळ्यांचा जळगावात काळाबाजार

‘एमएआयडीसी’च्या निर्देशानुसार कामगंध सापळ्याची किंमत २७ रुपये व त्यातील लूरची किंमत १७ रुपये, अशी निश्‍चित केली आहे. बाजारात खासगी कंपन्या त्यांची विक्री करीत आहेत. कृषी विभागाकडून सापळ्यांची विक्री सुरू नाही. कृषी विभागाने १५०० हेक्‍टरवर गुलाबी बोंड अळीसंबंधीचा मास ट्रॅपिंगचा कार्यक्रम घेतला आहे. जिल्ह्यात जनजागृतीही आम्ही करीत आहोत. - संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

जळगाव ः खते, बियाण्यानंतर आता जिल्ह्यात कापसावरील गुलाबी बोंड अळीसंबंधीच्या कामगंध सापळ्यांचा काळाबाजार सुरू आहे. शिवाय शेतकऱ्यांचा बोंड अळीसंबंधीच्या कीडनाशके, सापळे आदींवरचा एकरी चार हजार रुपयांपर्यंतचा खर्च यंदा वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ लाख ११ हजार ९७४ एकर क्षेत्र कापूस पिकाखाली आहे. यातील किमान १० लाख एकरवर गुलाबी बोंड अळीसंबंधीचा एकरी चार हजार रुपये खर्च वाढल्याचे लक्षात घेतले, तर कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड एकट्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसणार असल्याचा अंदाज आहे.  महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाच्या (एमएआयडीसी) निर्देशानुसार गुलाबी बोंड अळीसंबंधीच्या सापळ्याची किंमत २७ रुपये व त्यातील २१ दिवस मुदतीच्या लूरची किंमत १७ रुपये अशी असावी. परंतु, जिल्ह्यात सापळ्यांचे (लूरसह) दर ३५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत आहेत. फक्त एकाच बड्या कंपनीचे सापळे मध्यंतरी विकले जात होते. अलीकडे स्थानिक कंपन्यांनी हे सापळे निर्मिती व विक्रीचा सपाटा लावला आहे.  एका कापूस पिकातील तज्ज्ञाने दिलेल्या खात्रीलायक माहितीनुसार या सापळ्यांचे गौडबंगाल सुरू आहे. त्यांच्या वेगवेगळ्या किमती व दर्जा लक्षात घेता ते किती उपयोगाचे ठरतील, हा प्रश्‍न आहे. जामनेर तालुक्‍यातील एका शेतकऱ्याला या सापळ्यांच्या काळ्याबाजाराचा वाईट अनुभव आला. तो या सापळ्यांसाठी वणवण फिरला. शेवटी एक सापळा १०० रुपयात आणण्याची वेळ त्याच्यावर आली, असा मुद्दा त्यांनी ‘ॲग्रोवन’सोबत शेअर केला.  सापळेनिर्मिती व विक्री करून मोठा फायदा करुन घेण्याचा प्रकार काही कंपन्या करीत असतानाच कृषी विभाग मात्र त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत आहे. कृषी विभागाने गुलाबी बोंड अळीसंबंधी जिल्ह्यातील १५ तालुक्‍यांमध्ये साडेचार लाख हेक्‍टर कापसाखालील क्षेत्रापैकी १५०० हेक्‍टरवर मास ट्रॅपिंगचा कार्यक्रम सुरू केला आहे. या १५०० हेक्‍टरमध्ये हेक्‍टरी २० सापळे मोफत लावले आहेत. तज्ज्ञ, कर्मचारी तेथे नियमित जाऊन मार्गदर्शन करीत आहेत. शिवाय प्रत्येक तालुक्‍यात जनजागृती सुरू आहे. शेतकरी बैठका घेऊन मार्गदर्शन केले जात असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. कृषी विभागाने १५०० हेक्‍टवर कार्यक्रम हाती घेतला; पण उर्वरित चार लाख ३८ हजार ५०० हेक्‍टर क्षेत्राचे काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.  बोंड अळीचा एवढा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे की, पीक ५० ते ५५ दिवसांचे असतानाही अनेकजण कामगंध सापळे लावत आहे. कोरडवाहू कापूस उत्पादकांनीही दोन फवारण्या केल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे. पूर्वहंगामी कापूस उत्पादकांच्या काही ठिकाणी तीन फवारण्या झाल्या आहेत. फवारणीमध्ये बोंड अळीला रोखण्यासंबंधीची किडनाशके मिसळावी लागत आहेत. शेवटपर्यंत चार फवारण्या घ्याव्या लागतील. कामगंध सापळे व फवारण्यांचा मिळून जवळपास चार हजार रुपये एवढा खर्च यंदा कापूस उत्पादकांचा वाढला आहे. पुढे काय रिझल्ट मिळेल, याबाबत कोणतीही खात्री नाही. कारण चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा भागात ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पूर्वहंगामी कापसाच्या शेतात कामगंध सापळे लावले आहेत. त्या सापळ्यांमध्ये काही शेतांचा अपवाद वगळता बोंड अळीसंबंधीचे पतंग अजून सापडलेले दिसत नाहीत. मग हे सापळे निकृष्ट आहेत की आणखी काही गडबड झाली आहे, हा मुद्दाही तज्ज्ञ, शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत आहेत. 

‘ही तर बोंड अळीचे मार्केटिंग करून फसवणूक’ बोंड अळी, बोंड अळी... अशी चर्चा जुलैच्या मध्यातच पसरविली. मी १५ वर्षे पूर्वहंगामी कापसाची शेती करतो. मीदेखील घाबरलो. माझे कापसाचे पीक ५५ दिवसांचे असतानाच मी कामगंध सापळे एकरी सहा या प्रमाणात लावले. सापळे लावून १५ दिवस झाले, पण कुठलाही पतंग वगैरे त्यात अडकलेला नाही. निंबोळी अर्क फवारले. माझे सोडा, पण माझ्या गावाच्या शिवारात इतर शेतकऱ्यांनाही माझ्यासारखाच अनुभव आला आहे. अशा स्थितीत बोंड अळी नाही की सापळ्यांचा दर्जा चांगला नाही, असा मुद्दा माझ्यासमोर उपस्थित झाला आहे. माझा कापूस उत्पादनाचा खर्च एकरी किमान चार हजार रुपयांनी यंदा वाढला आहे. काही शेतकऱ्यांच्या सापळ्यांमध्ये काळ्या रंगाचे लूूर आहेत. हे लूर व सापळे निर्देशानुसार तयार केलेले नाहीत. कारण, काही ठिकाणी हे लूर गुलाबी आहेत तर काही ठिकाणी काळे आहेत. कंपन्यांनी मार्केटिंग करून घेतली, असा दावा कापूस उत्पादक संजय चौधरी (खेडी खुर्द, जि. जळगाव) यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना केला. तर आसोदा (जि. जळगाव) येथील शेतकरी किशोर चौधरी म्हणाले, की कामगंध सापळे व बोंड अळीबाबत ऐनवेळी कार्यक्रम राबविला जात आहे. त्याची वेळ चुकली. शेतकरी खर्च कसा पेलतील.  लूरची गडबड २१ दिवस, ३० दिवस व ४५ दिवस मुदतीचे लूर असे प्रकार काही कामगंध सापळे उत्पादक देत आहेत. परंतु काही कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक - दोन बड्या कंपन्यांचा अपवाद वगळला, तर कुठलीही कंपनी ४५ दिवस मुदतीच्या लूरचे उत्पादन करीत नाही. ४५ दिवस मुदतीचे लूर, अशा थापा मारून काही कंपन्या त्यांची सर्रास विक्री करीत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com