स्ट्रॉबेरीच्या पट्ट्यात निळ्या भाताचा प्रयोग 

महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरीच गोडवा देशभर पोहोचला असून, आता या तालुक्यात इंडोनेशियातील निळ्या भाताची प्रायोगिक तत्त्वावर लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे.
blue rice
blue rice

सातारा : महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरीच गोडवा देशभर पोहोचला असून, आता या तालुक्यात इंडोनेशियातील निळ्या भाताची प्रायोगिक तत्त्वावर लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली बिरमणी (ता. महाबळेश्‍वर) येथे या प्रयोगाचा प्रारंभ नुकताच झाला. 

महाबळेश्‍वर तालुक्यातील उपक्रमशील कृषी पर्यवेक्षक दीपक बोर्डे यांनी महाबळेश्‍वरच्या मातीत नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बिरमणी येथे प्रकाश मोरे यांच्या शेतात निळा भात हे पीक घेण्यात आले आहे. कृषी उपसंचालक विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड यांच्या हस्ते भाताच्या निळ्या वाणाची पेरणी करण्यात आली. वाडा कुंभरोशी, बिरवाडी, भोसे, दानवली, पांगारीतील शेतकरीही हे उत्पादन घेणार आहेत. या वेळी दीपक बोर्डे यांनी निळ्या भाताच्या वाणाविषयी माहिती दिली. हे वाण इंडोनेशिया देशातील आहे. आसामच्या काही शेतकऱ्यांनी या निळ्या भाताच्या वाणाची लागवड केली होती. २०१८ मध्ये नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तीन किलो निळ्या भाताचे बियाणे लावले होते. त्यापासून दोन वर्षांत १४ क्विंटल बियाणे उत्पादित केले. त्यातील या वर्षीच्या बियाण्यातील ५० किलो बियाणे महाबळेश्‍वर तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

हा निळा भात खाण्यासाठी पौष्टिक आहे. पंचतारांकित हॉटेलात या वाणाला मोठी मागणी असते. उंची जास्त व दणकट बुंधा असल्याने वाऱ्याने तो पडत नाही. एकरी २० ते २५ पोते साळ निघते. शिजवल्यावर तो जांभळा दिसतो. त्याची साळ निळी, जांभळी तर तांदूळ गर्द जांभळे व लांबट आहेत. आसाम, मणिपूर, पंजाबमध्ये निर्यातक्षम तांदळात त्याची गणना होते. निळ्या भाताच्या पेरणीच्या वेळी तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, कृषी अधिकारी श्री. दळवी, मंडल कृषी अधिकारी गोपाल बुधावले, कृषी सहायक रोहन निगडे, रणजित शिंदे, वामन मोरे, प्रदीप मोरे, गणपत मोरे, गोपीचंद घाडगे, सुभाष मोरे, सुरेंद्र मोरे, शरद मोरे व मंगला मोरे उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com