गडहिंग्लज परिसरात सोयाबीनवर निळा भुंगा

गडहिंग्लज परिसरात सोयाबीनवर निळा भुंगा

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : सध्याच्या काळात सततच्या बदलत्या हवामानामुळे सोयाबीनवर निळा भुंगा, तर उसावर हुमणीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. जून महिन्याच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. उगवणही चांगली झाली; परंतु महिन्यातील २० दिवसांहून अधिक काळ पावसाने ताण दिला. ऊन आणि रिमझिम पावसामुळे किडींना पोषक हवामान तयार झाले. त्यामुळे सोयाबीनवर निळ्या भुंग्यासह पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला.

कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत झालेल्या निरीक्षणातून किडींचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. भुंगेरे ही कीड कोवळी पाने कुरतडून खाते. पाने जाळीसारखी होतात. लवकर नियंत्रित न झाल्यास कीड पिकाची पाने, शेंडे, फुले, शेंगा खाते. तालुक्‍यातील इंचनाळसह पूर्व भागातील खणदाळ, नांगनूर, कडलगे आदी भागांतील उसामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव दिसत आहे. इंचनाळ येथे माळ भागातील ३० शेतकऱ्यांच्या सुमारे २५ एकरमधील उसामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. या भागात होलोट्रेकिया सिरॅटा या प्रजातीची हुमणी दिसते.

सोयाबीन आणि ऊस क्षेत्राला भेट देऊन कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी उपाययोजना केल्यास कीड वेळेवर नियंत्रणात येईल. - डॉ. नंदकुमार कदम, उपविभागीय कृषी अधिकारी.

या वर्षी माळरानातील खोडवा उसामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे ऊस वाळत आहे.   - बबन पाटील, शेतकरी, इंचनाळ.

उपाययोजना ः निळा भुंगेरा ः ही कीड ही पाने कुरतडते, त्यामुळे रोपाला फुटवे कमी येतात. नियंत्रण ः क्लोरपायरिफॉस २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी रोपांच्या बरोबरीने जमिनीवर देखील करावी.

हुमणी नियंत्रण ः क्लोरपारिफॉस एक लिटर किंवा इमिडाक्लोप्रिड अधिक फिप्रोनील हे संयुक्त कीटकनाशक १६० ग्रॅम किंवा फ्युबेंडीयामाइड २५० मि.लि. प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण एक एकरसाठी आहे. फवारणी पंपाचा नोझल काढून सरीतील उसाला आळवणी करावी. खोडवा ऊस किंवा भरणी केलेली असेल तर पहारीने नाळे मारून त्यामध्ये कीटकनाशकाची आळवणी करावी. सध्याच्या काळातील हवामान पाहता चंदगड, गडहिंग्लज, कोल्हापूरच्या काही भागात उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. संपर्क ः डॉ. पांडुरंग मोहिते (कृषी महाविद्यालय, कोल्हापूर) ९५११२६५४२१,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com