बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेना

बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेना
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेना

बोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात शुक्रवारी (ता. ७) काटापूजन व मका खरेदीचे आयोजन केले होते. याबाबत फलकही लावण्यात आला होता. ऐनवेळी अधिकारी व पदाधिकारी काही कामानिमित्त येऊ शकले नाहीत. यामुळे पूजन रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र बारदान, गुदाम उपलब्ध नाही. मका खरेदी केंद्र सुरू करण्याची शासनाची मानसिकता नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

 मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश महिनाभरापूर्वीच देण्यात आले आहेत. मात्र अधिकाऱ्यांचा उदासीनतेमुळे बोदवडला मुहूर्त मिळत नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. काटापूजनासाठी तहसीलदार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना बोलाविले होते.

तहसीलदार शासकीय कामानिमित्त बाहेरगावी, तर श्री. पाटील यांच्या काकूंचे निधन झाल्याने ते येऊ शकले नाहीत. यासाठी हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. मात्र खरेदी केंद्र सुरू करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे शेतकरीवर्गाकडून सांगण्यात आले.

कोण काय म्हणाले? ॲड. रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की मका खरेदी केंद्र एक महिन्यापूर्वी सुरू व्हायला पाहिजे होते. काटापूजनासाठी शासकीय अधिकारी किंवा राजकीय पुढारीच पाहिजे असे नाही. एखाद्या शेतकऱ्याकडून काटापूजन करून केंद्र सुरू करता येईल. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिल वराडे यांनी सांगितले की, बारदान व गोडाऊन अजून मिळाले नसल्याने काटापूजन व मका खरेदी पुढे ढकलली.

बोदवड तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील म्हणाले, की बोदवडला व्यापाऱ्यांना गुदाम मिळते. शासनाला का मिळत नाही. तहसीलदार शासकीय अधिकारात गोडाऊन घेऊ शकतात. मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मानसिकताच नाही. शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. दुष्काळी परिस्थिती असूनही दिरंगाई केली जात आहे.

नावाला खरेदी केंद्र सुरू करू नका शहरात गेल्या महिनाभरापासून मका ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी टाळाटाळ होत आहे. फक्त नावाला केंद्र सुरू करू नका. चारशे- पाचशे क्‍विंटल माल घ्यायचा. नंतर खरेदी केंद्र बंद करायचे व व्यापारीवर्गाचे चांगभलं करायचे, अशी स्थिती बोदवड तालुक्‍याची होऊ नये, अशी अपेक्षाही शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com